दत्ताजीराव शिंदे - यांच्या मृत्यूने रणदेवताही हळहळली

शिंदे घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे. या घराण्यातील पुरुष व महिला दोघांनीही इतिहासात आपल्या पराक्रमाचे दाखले दिले आहेत.

दत्ताजीराव शिंदे - यांच्या मृत्यूने रणदेवताही हळहळली

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

राणोजी शिंदे, जयाप्पा, दत्ताजी, जोत्याजी, महादजी, तुकोजी, जनकोजी अशी अनेक नावे शिंदे घराण्यात अजरामर आहेत. याच शिंदे घराण्यातील दत्ताजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. जगावे तर शिवरायांसारखे व मरावे तर संभाजी महाराजांसारखे अशी जी म्हण आहे त्यामध्ये दत्ताजी शिंदे यांचे नावही आवर्जून घेण्यासारखे आहे कारण धारातीर्थावर जखमी अवस्थेत त्यांनी काढलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे उद्गार आजही प्रेरणादायी आहेत. 

शिंदे घराण्याचे प्रसिद्ध पुरुष राणोजी शिंदे यांचे दत्ताजी शिंदे हे पुत्र. त्यांच्याकडे कण्हेरखेडची पाटीलकी होती. राणोजींना जयाप्पा, दत्ताजी, जोत्याजी, महादजी व तुकोजी असे पाच पुत्र होते व हे सर्वच पुत्र राणोजींसारखेच पराक्रमी होते. 

राणोजींचा मृत्यू झाल्यावर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयाप्पा यांना जहागीर व सरदारकीची वस्त्रे प्राप्त झाली. मात्र नागोरच्या वेढ्यामध्ये  जोधपूरच्या राजा विजेसिंग याने जयाप्पा यांचा कपटाने मारेकरी घालून खून केला. यावेळी दत्ताजी दुःखाने शोक करू लागले मात्र यावेळी जयाप्पा त्यांना म्हणाले की

"वैरी युद्धास आला आणि तू रडतोस? हे क्षात्रधर्मास उचित नाही. आता मजला काही होत नाही. तुम्ही शत्रू पराभव करावा."

जयाजी शिंदे यांचे हे अखेरचे शब्द म्हणजे दत्ताजींसाठी एक गुरुमंत्रच होता. 

पुढे दत्ताजी व जनकोजी यांनी अनेक युद्धात आपल्या पराक्रमाची शर्थ केली व स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यात आपले योगदान दिले. पानिपतच्या पहिल्या लढाईत प्रबळ अशा शत्रूस सामोरे गेलेले पहिले वीर म्हणजे दत्ताजी शिंदे होय. दत्ताजी शिंदे यांनी लाहोरचा बंदोबस्त केल्यावर मराठ्यांचे वर्चस्व दिल्लीत बसून मराठ्यांचे हाताखाली कायम रहावे लागेल अशी भीती नजीबखानास वाटू लागली. त्यामुळे त्याने एक कट केला व गंगेवर पूल बांधण्याचे आमिष दत्ताजी यांना दाखवले आणि परस्पर अहमदशाह अब्दालीस हिंदुस्थानात येण्याचे आमंत्रण दिले. 

नजीबखानाने अब्दालीच्या मदतीने सुजावर स्वारी करण्याचा बेत केला मात्र जनकोजी यांना हे पटले नाही मात्र गोविंदपंत बुंदेले यांनी या गोष्टीस होकार दिल्यामुळे दत्ताजी तटस्थ राहिले. यानंतर नजीबाने अब्दालीसहित मराठी साम्राज्याच्या शत्रुंची एकजूट केली व अब्दालीस प्रथम दत्ताजी शिंदे यांच्याशी युद्ध करण्यास पाठविले. दत्ताजी व अब्दाली यांची गाठ प्रथम शुक्रतालच्या पुलावर पडली. या लढाईत शिवाजी शिंदे व त्यांचे पुत्र हणमंतराव पडले. यानंतर अब्दाली कुरुक्षेत्रावर आला. तेथे दत्ताजी व अब्दाली  हे समोरासमोर आले. 

खरं तर अब्दालीचे सैन्य व शस्त्रसाठा हा अनेक पटींनी अधिक होता व अशावेळी दत्ताजी यांना जयपुरास निघून जाता आले असते मात्र जयाप्पा याचे ते शब्द लक्षात ठेवून त्यांनी मैदान वीरश्री दाखविण्याचा निश्चय केला व अब्दालीवर तुटून पडले. दत्ताजी यांचे भोईटे, बुंदेले व अंताजीपंत यांना अब्दालीने कैचीत पकडून यमुनेच्या खोऱ्यात लोटले व अनेक सैन्य धारातीर्थी पडले आणि पुढे भयानक प्रसंग उद्भवला तो म्हणजे शुक्रतालवर अब्दाली, अहमदखान बंगश, सुजा व नजीबखान एकत्र आले व मराठ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा धोका निर्माण झाला होता. 

हे सर्व चित्र पाहता भगीरथीबाई यांनी दत्ताजी यांना तात्पुरती माघार घ्यावी अशी विनंती केली मात्र मैदानातून मागे जातील ते मराठे कसले? दत्ताजी यांनी लढण्याचा निर्धार केला यमुना नदीच्या तीरावर दि. १०-१-१७६० साली संक्रांतीचे तिळगुळ वाटून त्यांनी अब्दालीवर हल्ला केला. बदायूच्या घाटावर घनघोर संग्राम झाला मात्र या लढाईत वीरश्री गाजवताना दत्ताजी यांच्या बरगडीत शत्रूची गोळी लागली व ते जखमी होऊन मैदानात पडले.

हे पाहून रोहिल्यांच्या सरदार कुतुबशाह कुटील हास्य करून दत्ताजी यांच्या जवळ आला व विचारले 'पटेल लढेंगे क्या?' अशावेळी या शूरवीराने उत्तर दिले 'बचेंगे तो और भी लढेंगे' या उत्तराने कुतुबशहाचे तोंड बंद झाले मात्र त्याचे शस्त्र चालले व दत्ताजींचा शिरच्छेद करून ते शीर अब्दालीस नजर केले.

दत्ताजी यांचे शीर परत मिळावे यासाठी मराठ्यांनी अयोध्येचा नवाब सुजाउद्दौला याच्या मध्यस्तीने तब्ब्ल तीन लक्ष रुपयांची खंडणी देऊन ते शीर परत मिळवले. यावरून मराठ्यांमध्ये दत्ताजी यांच्याविषयी किती प्रेम होते याची कल्पना येईल. 

दत्ताजी यांचा वीरश्रीयुक्त मृत्यू पाहून साक्षात रणदेवतेसही कौतुक वाटले असेल.