भारत देश - लोकशाहीची गंगोत्री
इंग्रजांकडून आपल्याला लोकशाहीची ओळख झाली अशी समजूत आहे. मात्र ही समजूत साफ चुकीची आहे. भारतामध्ये लोकशाही अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात होती.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. इथली लोकशाही प्रगल्भ आहे. इंग्रजांनी आपल्याला लोकशाहीची देणगी दिली....वगैरे वगैरे गोष्टी नेहमी सांगितल्या जातात. सगळ्याच चांगल्या गोष्टी इंग्रजांनी आपल्याला दिल्या असाही एक गोड गैरसमज असतो. लोकशाहीच्या बाबतीत इतिहासात काही वेगळे आणि आश्चर्यकारक दाखले मिळतात. इ.स.च्या १० व्या शतकात तमिळनाडू इथे चोळांची राजवट होती. चोळ राजे...राजराजा चोळ...तंजाऊर इथलं बृहदीश्वर मंदिर हे सगळं डोळ्यासमोर येतं. चोळांचं जबरदस्त नौदल आणि त्यांनी आपल्या भूमिबाहेर जाऊन जावा-सुमात्रा-इंडोनेशिया इथे जाऊन मिळवलेले विजय हे सगळं आठवतं. चोळ राजसत्ता ही एक बलाढ्य, प्रबळ राजसत्ता होती. आर्थिक सुबत्ता फार मोठी होती. चोळांच्या काळात बांधलेल्या मंदिरावर असंख्य शिलालेख कोरलेले आहेत. हे शिलालेख म्हणजे जणू इतिहासाची पुस्तकेच आहेत. चोळांचा आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेचा खूप मोठा इतिहास या शिलालेखांतून समोर येतो.
चोळांच्या राज्यात हिंडताना खूप नवनवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. आपली लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही समजली जाते.
इंग्रजांकडून आपल्याला लोकशाहीची ओळख झाली अशी समजूत आहे. मात्र ही समजूत साफ चुकीची आहे. भारतामध्ये लोकशाही अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. चोळांच्या काळातले लोकशाहीचे संदर्भ आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतात. चेन्नई पासून ९० कि.मी. वर उत्तरमेरू नावाचं एक गाव आहे. या गावात असलेल्या सुंदरवरदा मंदिरात परांतक चोळ या राजाचा एक फार महत्त्वाचा शिलालेख आहे. ज्यात ग्रामसभेचे सदस्य लोकशाही मार्गाने कसे निवडायचे, यासाठी कोण पात्र असेल, कोण अपात्र असेल याची नोंद केलेली आहे. त्याचबरोबर निवडून दिलेल्या सदस्याने योग्य काम केले नाही तर त्याला परत बोलावण्याचा अधिकार जनतेला होता. इतकी खोलवर रुजलेली लोकशाही चोळांच्या काळात इथे अस्तित्वात होती.
ग्रामसभेसाठी इच्छुक सदस्य हा ३५ ते ७० या वयोगटातील असायला हवा. तो मुळात शिक्षित पाहिजे. त्याला वैदिक साहित्याचे ज्ञान असायला हवे. तो त्या गावचा रहिवासी पाहिजे. त्याची स्वतःची जमीन पाहिजे. त्या स्वतःच्याच जमिनीवर त्याचे स्वतःचे घर पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तो करदाता असायलाच हवा. करदाता नसेल तर त्याला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नव्हता. एका भूर्जपत्रावर त्या सदस्याचे नाव लिहून ते भूर्जपत्र मातीच्या घड्यामध्ये टाकायचे. याला ‘कूडवोलई’ असे म्हटले जायचे. याचा शब्दशः अर्थ ‘भूर्जपत्रांनी भरलेला मातीचा घडा’ असा होतो. सगळ्या ग्रामस्थांसमोर हा घडा उघडला जायचा आणि गावातल्या लहान मुलाला बोलावून एकेक भूर्जपत्र काढायला लावत. ते बाहेर काढले की त्यावर लिहिलेले नाव जोरात उच्चारून ती व्यक्ती निवडून आल्याचे जाहीर करत असत. अशा पद्धतीने ही गुप्तमतदानाची पद्धत होती.
सदस्याचा कालावधी ३६० दिवसांचा असे. एकदा सदस्य झाल्यावर पुढची तीन वर्षे त्याला सदस्य होता येत नसे. तसेच एका सदस्याला आयुष्यात फक्त तीन वेळाच निवडणुकीला उभे राहता येत असे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो सदस्य जर का भ्रष्ट निघाला किंवा त्याने अप्रत्यक्षरीत्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले तर त्याचे सदस्यत्व रद्द व्हायचे. आणि त्याच्या कुटुंबातील पुढच्या सात पिढ्यांना निवडणुकीपासून बाहेर ठेवले जायचे. त्याशिवाय त्याला गावातून गाढवावरून मिरवणूक काढायचा ‘मान’ दिला जायचा !
उत्तरमेरू इथल्या मंदिरावरील शिलालेख याबद्दल अजून बरीच विस्तृत माहिती सांगतात. इतकी जबरदस्त लोकशाही रचना चोळांच्या काळात अस्तित्वात होती. उत्तरमेरू इथल्या मंदिरावर असलेल्या शिलालेखात याचे सविस्तर वर्णन आलेले आहे. तमिळनाडूमधले ज्येष्ठ अभ्यासक पद्मभूषण डॉ. नागस्वामी यांनी या शिलालेखांचा विस्तृत अभ्यास करून अनेक आश्चर्यकारक तथ्ये जगासमोर आणली. शिलालेख आपल्याला इतिहास स्पष्टपणे उलगडून दाखवतात. शिलालेख हा इतिहासाच्या अभ्यासातला अधिकृत पुरावा असतो. लोकशाहीचा उल्लेख करणारा हा शिलालेख म्हणजे चोळांच्या राजवटीचे रत्न म्हणायला हवे. लोकशाहीची बूज राखणारे आणि ती गंगेसारखी निर्मल राहावी यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे चोळ राजे यामुळेच फार श्रेष्ठ ठरतात. आणि म्हणूनच भारत ही लोकशाहीची गंगोत्री आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
- आशुतोष बापट