जगाचा पहिला नकाशा आणि नागोठणे
नागोठण्याची खाडी ही प्राचीन काळापासून पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र होती. येथेून कोकणमार्गे थेट देशाच्या अंतर्गत भागात मालवाहतूक केली जात असे. हे बंदर फक्त स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचे होते. टॉलेमीसारख्या ग्रीक भूगोलतज्ज्ञाने त्याचा नकाशात समावेश केल्याने त्याच्या त्या काळातील जागतिक ओळखीचे महत्त्व अधोरेखित होते.
इतिहास हा केवळ राजे-महाराजांच्या विजय-पराजयाचा नोंदवही नसतो, तर तो भूगोल, व्यापार, संस्कृती, आणि समाजरचनेचा आरसा असतो. आज आपण बोलणार आहोत एका अशा ऐतिहासिक घटनेबद्दल, ज्यात आपल्या महाराष्ट्रातील कोकणातील नागोठणे या ठिकाणाचा उल्लेख जगाच्या पहिल्या नकाशांपैकी एकात आढळतो. हा उल्लेख केवळ एक भौगोलिक बिंदू नाही, तर त्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापारातील नागोठण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा पुरावा आहे.
इ.स. दुसऱ्या शतकातील टॉलेमी आणि त्याचा नकाशा
इ.स. दुसऱ्या शतकात जगप्रसिद्ध ग्रीक भूगोलतज्ज्ञ क्लॉडियस टॉलेमी (Claudius Ptolemy) जगाच्या सफरीवर निघाला होता. त्या काळात महाराष्ट्रात सातवाहनांचे साम्राज्य बहरात होते. टॉलेमीने आपल्या प्रवासादरम्यान अनेक देश, प्रदेश, नद्या आणि बंदरांची नोंद केली. या निरीक्षणांवर आधारित त्याने जगाचा एक सविस्तर नकाशा तयार केला, ज्यामध्ये तत्कालीन भारतातील महत्त्वाच्या व्यापारकेंद्रांचाही समावेश होता.
या नकाशामध्येच पहिल्यांदा नागोठणेचा उल्लेख आढळतो. टॉलेमीने येथे "Nanaguna River" (नानागुना नदी) असा उल्लेख केला आहे. काही अभ्यासकांनी हा ‘नानागुना’ म्हणजे नाणेघाट असा दावा केला असला तरी हा तर्क अचूक मानला जात नाही. कारण नाणेघाट हे घाटमार्ग असून त्यास ‘River’ असा उल्लेख करणे अशक्य आहे. उलट, टॉलेमीने "Nanaguna River" चा उल्लेख दोन वेळा केला आहे, जे नागोठण्याच्या खाडीच्या भौगोलिक स्थानाशी सुसंगत आहे.
नागोठण्याचे प्राचीन महत्त्व
नागोठण्याची खाडी ही प्राचीन काळापासून पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र होती. येथेून कोकणमार्गे थेट देशाच्या अंतर्गत भागात मालवाहतूक केली जात असे. हे बंदर फक्त स्थानिक व्यापाऱ्यांसाठी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांसाठीही महत्त्वाचे होते. टॉलेमीसारख्या ग्रीक भूगोलतज्ज्ञाने त्याचा नकाशात समावेश केल्याने त्याच्या त्या काळातील जागतिक ओळखीचे महत्त्व अधोरेखित होते.
Jean Baptiste Bourguignon d’ Anville याची पुष्टी
टॉलेमीचा उल्लेख केवळ एक ऐतिहासिक योगायोग नसून, त्याची पुष्टी १७५९ साली प्रसिद्ध फ्रेंच भूगोलतज्ज्ञ Jean Baptiste Bourguignon d’ Anville यांनी आपल्या ग्रंथात केली आहे. तो लिहितो –
"Opposite Bombay, near the continent, are the islands named Caranja, overagainst which is the mouth of a river, named Nagotana..."
तो पुढे सांगतो की टॉलेमीच्या भौगोलिक वर्णनात काही चुका असल्या तरी ‘Nanaguna’ ही नदी प्रत्यक्षात नागोठणे परिसरातील जलमार्गाशी जुळते. त्याच्या मते, नागोठण्याच्या खाडीतून आणि कारंजाच्या आसपासून जाणारे पाण्याचे प्रवाह टॉलेमीच्या वर्णनाशी साधर्म्य दर्शवतात.
शिलाहार राजे आणि नागोठण्याचे महत्त्व
इतिहासात पुढे, शिलाहार राजे नागार्जुन यांच्या कारकिर्दीत कोकण प्रदेश अत्यंत संपन्न होता. मात्र, भाऊबंदकीमुळे कदंब नृपती द्वितीय गुहल्लदेव याने कोकणावर हल्ला केला आणि जनतेवर अन्याय सुरु केला. या संकटातून नागार्जुनाचा पुत्र अनंतदेव याने देशाची मुक्तता केली.
अनंतदेवाच्या कारकिर्दीचा उल्लेख असलेला एकमेव ताम्रपट सापडतो, ज्यात त्याने आपल्या मंत्र्यांना शुर्पारक (सोपारा), चैमुल्य (चौल) आणि नागोठणे या बंदरांवरील करमाफी दिल्याची नोंद आहे.
ताम्रपटातील नोंद :
"महामांडलिक श्रीमदअनंतदेवेन... ठाणे, नागोठाणे, सोपारा तथा चौल इत्यादी बंदरावर येणाऱ्या जहाजांवर कोणताही कर घेऊ नये."
या नोंदीवरून नागोठण्याचे त्या काळातील व्यापारी महत्त्व स्पष्ट होते.
नागोठण्याचे भौगोलिक वैशिष्ट्य
नागोठण्याची खाडी ही समुद्रातून आतपर्यंत पसरलेली असून तिच्याद्वारे अंतर्गत भागात माल पोहोचवणे सोपे होते. त्यामुळे ती समुद्री व्यापारासाठी नैसर्गिक बंदर ठरली. याशिवाय, येथेून मसाले, कापड, मीठ, धातू, तसेच कृषीउत्पादने यांची आयात-निर्यात होत असे.
नागोठणे – एक सांस्कृतिक केंद्र
व्यापाराबरोबरच नागोठणे हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचेही केंद्र होते. परदेशी व्यापाऱ्यांच्या आगमनामुळे येथे विविध संस्कृती, भाषा, व व्यापारपद्धतींचा प्रभाव दिसून येत असे. प्राचीन कोकणातील धार्मिक उत्सव, बाजारपेठा, व हस्तकलेची परंपरा या व्यापारातून अधिक बळकट झाल्या.
टॉलेमीचा उल्लेख – अभिमानाचा वारसा
जगाच्या पहिल्या नकाशात एखाद्या भारतीय गावाचा उल्लेख होणे हीच अभिमानाची बाब आहे. नागोठण्याचा हा उल्लेख आपल्या पूर्वजांच्या व्यापारी कौशल्याची आणि कोकणाच्या धोरणात्मक महत्त्वाची साक्ष देतो. आज नागोठणे एक साधारण गाव असले तरी त्याचा इतिहास जागतिक पातळीवर महत्त्वाचा आहे.
टॉलेमीपासून ते Jean Baptiste d’ Anvilleपर्यंत अनेक भूगोलतज्ज्ञांनी नागोठण्याचा उल्लेख केला आहे. शिलाहारांच्या काळातील ताम्रपटांनी त्याच्या व्यापारी महत्त्वाची पुष्टी केली आहे. या सगळ्या नोंदी एकत्र पाहिल्यास, नागोठणे हे केवळ कोकणातील एक गाव नसून, प्राचीन जागतिक व्यापारनकाशातील एक महत्त्वाचा बिंदू होते.
आज आपण इतिहासाचा पुनर्भेट घेतो तेव्हा, अशा ठिकाणांचा वारसा जपणे आणि त्यांची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.