सरदार नारोशंकर राजेबहाद्दर - मालेगाव किल्ल्याचे व शहराचे संस्थापक
नारोशंकर हे दिल्लीच्या दुसरा आलमगीर या बादशहाच्या मदतीस जाऊन त्यांनी त्याची मोठी मदत केल्याने दिल्लीच्या बादशहाने त्यांना मालेगाव आणि बाजूच्या इतर सात गावांचे वतन वंशपरंपरेने दिले.
मराठेशाहीतील एक चतुर व पराक्रमी मुसद्दी म्हणून नारोशंकर राजेबहाद्दर प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराचे व भुईकोटाचे संस्थापक म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत.
नारोशंकर यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड असून ते देशस्थ ब्राह्मण होते. त्यांचे वडील शंकराजीपंत दाणी हे सुरुवातीस विजापूर राज्यातील सुभेदाराकडे दिवाण म्हणून काम करीत होते. शंकराजीपंत यांचे निधन गेल्यावर दिवाणपद दुसरीकडे गेल्याने नारोशंकर आणि त्यांच्या कुटुंबाचे हलाखीचे दिवस सुरु झाले आणि त्यांनी सासवड सोडले आणि नाशिक गाठले.
नाशिक येथे येऊन व खूप प्रयत्न करूनही काहीच निर्वाह होत नसल्याने ते वैतागले आणि त्यांनी थेट सप्तशृंगी गाठले आणि अनुष्ठान सुरु केले. सप्तश्रुंगी येथून ते बांदा येथे गेले आणि एका सरदाराकडे रिसालदार म्हणून काम सुरु केले. तेथे सरदारासोबत वाद झाल्यामुळे त्यांनी ती चाकरी सोडली आणि साताऱ्यास आले आणि मल्हारराव होळकर यांच्या सैन्यात सामील झाले.
नारोशंकर यांची हुशारी पाहून मल्हारराव होळकर यांनी त्यांची छत्रपती व पेशव्यांकडे शिफारस करून त्यांना इंदूरचे सुभेदार पद दिले. बाळाजी बाजीराव पेशवेपदी आल्यावर छत्रसाल राजाकडून पेशव्यांना मिळालेल्या मुलुखातील मवास लोकांनी बंड केले त्यावेळी हे बंड मोडण्यासाठी पेशव्यांनी नारोशंकराना पाठवले व नारोशंकर यांनी सुद्धा हे बंड मोडून काढले आणि ओडसे प्रांतातील तब्बल अठरा लाख उत्पन्नाचा मुलुख सर केला.
या कार्यामुळे राज्यातील त्यांचे वजन आणखी वाढून त्यांना झाशी, कोंच आणि कनार या प्रांतांचे सुभेदार पद प्राप्त झाले आणि पुढे त्यांना राजेबहाद्दर हा किताब आणि सरनोबत हे पद प्राप्त झाले.
१७५७ पर्यंत हे पद त्यांच्याकडे होते मात्र काही कारणात्सव मामलतीचा ऐवज पेशव्यांकडे वेळेत न गेल्याने पेशवे त्यांच्यावर नाराज झाले आणि त्यांना पुण्यास बोलावले. पुण्यास जाऊन नारोशंकरानी पेशव्यांना खरी हकीकत सांगितली त्यावेळी पेशव्यांचा राग जाऊन त्यांनी नारोशंकर यांना मोत्यांचा चौकडा बक्षीस दिला. हा चौकडा ते कायम आपल्या कानी घालत त्यामुळे त्यांना नारोशंकर मोतीवाले असे नाव प्राप्त झाले.
कालांतराने नारोशंकर हे दिल्लीच्या दुसरा आलमगीर या बादशहाच्या मदतीस जाऊन त्यांनी त्याची मोठी मदत केल्याने दिल्लीच्या बादशहाने त्यांना मालेगाव आणि बाजूच्या इतर सात गावांचे वतन वंशपरंपरेने दिले. यानंतर त्यांनी मालेगाव या ठिकाणी मोठा भुईकोट उभारला व या कामास दिल्लीहून कारागीर बोलावण्यात आले होते.
१७६१ सालच्या पानिपत युद्धात सुद्धा नारोशंकर यांचा सहभाग होता मात्र या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्याने नाईलाजास्तव दक्षिणेत परत आलेल्या सरदारांमधे नारोशंकर सुद्धा होते.
नारोशंकर यांनी ज्यावेळी मालेगाव येथील किल्ला बांधला त्यावेळी प्रथम त्यांनी घर बांधायची परवानगी पेशव्यांकडून घेऊन किल्ला बांधल्याने पेशव्यांना राग आला आणि त्यात दिल्लीच्या बादशहाचे समर्थन घेऊन हा किल्ला बांधल्याने पेशव्यांनी मालेगाव वर सैन्य पाठवण्याचा विचार केला होता अशी आख्यायिका आहे मात्र महादजी शिंदे यांनी पेशव्यांना थेट सैन्य पाठवण्यास मनाई करून तेथे दोन जासूद पाठवावेत आणि नारोशंकर यांच्याकडून किल्ला स्वाधीन करून घ्यावा असे सांगितले व यानंतर पेशव्यांनी दोन जासूद तेथे पाठवले.
जासूद तेथे आले त्यावेळी किल्ल्यात कार्यक्रम सुरु होता आणि अनेक लोक जमले होते आणि जासूद तेथे गेल्यावर त्यांनी पेशव्यांचे पत्र नारोशंकर यांच्याकडे दिले व मोठा कार्यक्रम असूनही नारोशंकर यांनी शांतपणे ते पत्र वाचले आणि कार्यक्रम रद्द करून सर्व पाहुण्यांना परत पाठवले आणि किल्ला रिकामा करून जासूदांकडे दिला आणि सर्व कुटुंबास सोबत घेऊन किल्ल्याबाहेर जाऊन नदीच्या किनारी तंबू ठोकून त्यात वास्तव्य केले आणि पेशव्यांना पत्र लिहून सांगितले की, आज्ञेप्रमाणे किल्ला जासूदांकडे दिला आहे, किल्ला बांधण्यात यजमानांची थोडी अवज्ञा झाली आहे त्याबद्दल सेवकास क्षमा करावी. आणि किल्ल्याची वास्तुशांती अर्धवट राहिली आहे ती पूर्ण करण्यास परवानगी मिळावी. हे पत्र पाहून पेशव्यांचा राग गेला आणि तो किल्ला नारोशंकर यांचेकडेच ठेवला.
नाशिक येथील नारोशंकर मंदिरात जी महाप्रचंड घंटा आहे तिला नारोशंकर घंटा म्हणून ओळखले जाते व ही घंटा नारोशंकर यांनी पोर्तुगीजांकडून विजयाच्या रूपात आणली होती. या घंटेचा आवाज मोठा असल्याने एखादा मनुष्य मोठ्या आवाजात बोलत असेल तर त्यास नारोशंकरी घंटा असे म्हणायची प्रथा पडली. नारोशंकर यांचा मृत्यू १७७५ साली झाला आणि त्यांच्या वंशजांचे वास्तव्य मालेगाव येथे आहे.