मराठ्यांच्या बंगालवरील स्वाऱ्या

मराठ्यांच्या बंगालवर स्वाऱ्या हा इतिहासातील अतिशय महत्वपूर्ण विषय असूनही दुर्लक्षित आहे. बंगालप्रांती एक नव्हे तर तब्बल चार स्वाऱ्या करून मराठ्यांचा वचक बंगालप्रांती बसवणारे घराणे म्हणजे नागपूरचे भोसले घराणे.

मराठ्यांच्या बंगालवरील स्वाऱ्या
मराठ्यांच्या बंगालवरील स्वाऱ्या

नागपूरकर भोसल्यांचे मूळ पूर्वज म्हणजे मुधोजी भोसले. मुधोजी भोसले हे हिंगणी पाटस या गावाचे पाटील. पुढे मुधोजी शिवाजी महाराजांच्या सैन्यात शिलेदार म्हणून दाखल झाले.

मुधोजी भोसले यांना बापूजी, साबाजी व परसोजी असे तीन पुत्र होते. हे तिघेही शिवाजी महाराजांच्या सैन्यात खूप कर्तबगार म्हणून नावारूपास आले. साबाजी भोसले यांची कर्तबगारी पाहून तिन्ही बंधूना दोन गावे इनाम मिळाली होती.

छत्रपती शाहू महाराजांची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर ते साताऱ्याकडे जात असताना खानदेशात परसोजी त्यांना आपल्या सैन्यासहित येऊन मिळाले मात्र ताराबाईंना असा संशय होता की शाहू हे खरे नसून तोतया असावेत त्यामुळे त्यांनी परसोजी यांचे बंधू बापूजी यांना खातरजमा करण्यास पाठविले. बापूजी व परसोजी जेव्हा भेटले तेव्हा परसोजी यानी त्यांना सांगितले की हे खरोखरच शाहू महाराज आहेत त्यामुळे इतर सरदारांची खात्री पटण्यासाठी आपण दोघेही शाहू महाराजांच्या ताटातच जेऊ. 

यानंतर इतर सर्वांची खात्री पटली की हे शंभूपुत्र शाहू महाराजच आहेत. परसोजी यानी या कामी मोठी कामगिरी बजावल्याने शाहू महाराजांनी राजपद प्राप्त झाल्यावर परसोजी यांना वऱ्हाड प्रांताचे सेनासाहेब सुभा हे पद बहाल केले व तेथून त्यांनी वऱ्हाड, गोंडवन, देवगड आणि चांदे इत्यादी प्रांतावर अमल बसवला.

परसोजी यांना कान्होजी नामक पुत्र असून तो सुद्धा अतिशय पराक्रमी होता. कान्होजी भोसले यांनी आपल्या पराक्रमाने शाहू महाराजांच्या दरबारात आपले वजन वाढवले असले तरीही त्यांना संतान नसल्याने त्यांनी आपले काका बापूजी भोसले यांचा पुत्र रघुजी भोसले यांना दत्तक घेतले. पुढे कान्होजी यांना रामाजी नावाचा पुत्र झाल्याने रघुजी यांच्याकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले त्यामुळे रघुजी नाराज होऊन देवगडचे राजे चांद सुलतान यांच्याकडे गेले व तेथे काही काळ व्यतीत करून वऱ्हाड प्रांतातील आलजपूर सुभे येथे गेले व यानंतर ते साताऱ्यास गेले. 

साताऱ्यास खंडोबल्लाळ चिटणीस यांचे पुत्र गोविंद खंडेराव यांच्या घरी ते सुरुवातीस राहिले. तेथे त्यांची ओळख श्रीपतराव प्रतिनिधी आणि फत्तेसिंग भोसले यांच्याशी झाली. पुढे शाहू महाराजांनी फत्तेसिंग यांना कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले तेव्हा फत्तेसिंग यांनी आपल्या सोबत रघुजी भोसले यांना घेतले. या मोहिमेत एक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी मोहीमा करून रघुजींनी फत्तेसिंग यांना खूप मदत केली. मोहिमेवरून परत आल्यावर फत्तेसिंग यांनी रघुजी त्यांच्या कर्तबगारीची माहिती शाहू महाराजांना दिली तेव्हा ते खूप आनंदित झाले. 

एक दिवस शाहू महाराज रघुजी यांना घेऊन शिकारीस गेले होते त्यावेळी वाघाची शिकार करताना वाघाने थेट शाहू महाराजांवर हल्ला केला तेव्हा रघुजी यांनी शाहू महाराजांना वाघाच्या हल्ल्यातून चपळतेने वाचवले त्यामुळे शाहू महाराजांची रघुजी यांच्यावरील मर्जी खूप वाढली. पुढे काही कारणांमुळे शाहू महाराजांची कान्होजी भोसले यांच्यावरील मर्जी कमी झाली व त्यांनी कान्होजी यांचे सेनासाहेब सुभा हे पद रघुजी यांना दिले. याच रघुजी भोसले यांनी पुढे बंगालवर तीन स्वाऱ्या काढून मराठ्यांचा दरारा निर्माण केला.