दुर्गपरिभाषा
प्रथम आपण दुर्ग या संकल्पनेची व्याप्ती समजावून घेऊ. केवळ गिरीमाथ्यावर असणारे तटबुरुजयुक्त बांधकाम व त्यावर असणाऱ्या वास्तू म्हणजे दुर्ग नव्हे. बरेचदा मंडळी केवळ माथ्यावरील अवशेष म्हणजेच दुर्ग समजून आसमंतात असणाऱ्या इतर गोष्टी पाहात नाहीत.- संतोष विष्णू जाधव (पुणे)

लेखमालेला सुरुवात केल्यापासून आपण दुर्गांची उत्पत्ती कशी झाली, वेदकाळ ते अगदी मध्ययुगाच्या अखेरपर्यंत मानसाच्या प्रगती बरोबरच दुर्गबांधणीशास्त्र कसे विकास पावत गेले ते पाहिले. तसेच दुर्गांचे विविध प्रकार व दुर्गांबद्दल माहिती देणारे प्राचीन व मध्ययुगीन साहित्य कोणते याचाही धावता आढावा घेतला. आता या भागापासून आपण प्रत्यक्ष दुर्गाच्या अंतरंगात शिरणार आहोत. आजच्या भागात आपण दुर्गाच्या पायथ्यापासून सुरुवात करून दुर्गात प्रवेश करेपर्यंतचा भाग समजावून घेणार आहोत.
प्रथम आपण दुर्ग या संकल्पनेची व्याप्ती समजावून घेऊ. केवळ गिरीमाथ्यावर असणारे तटबुरुजयुक्त बांधकाम व त्यावर असणाऱ्या वास्तू म्हणजे दुर्ग नव्हे. बरेचदा मंडळी केवळ माथ्यावरील अवशेष म्हणजेच दुर्ग समजून आसमंतात असणाऱ्या इतर गोष्टी पाहात नाहीत. मात्र गिरीदुर्गाची सुरुवात हि गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावांमधून होते आणि बरेचदा एकाच गिरिदुर्गाला पायथ्याच्या विविध दिशाना असणाऱ्या अनेक गावांमधून वाट जात असते.
घेरा - घेरा म्हणजे सोप्या भाषेत गडाचा आसमंत. गडाला चहू दिशेने वेढणाऱ्या गावांचा समावेश या घेऱ्यात होतो. राजगडचा घेरा १२ कोस असल्याचे उल्लेख आहेत. घेरा हा शब्द मुख्यत्वे काही मोठ्या आणि महत्वाच्या किल्ल्यासंदर्भात वापरलेला दिसतो. तांत्रिक दृष्ट्या प्रत्येक गडाला घेरा असेलच असे नाही. मात्र घेरा या शब्दात या गडाच्या रहाळात असणाऱ्या सर्व ग्रामांचा समावेश होतो हे नक्की. ढोबळमानाने गडाचा चढ जेथून सुरु होतो तो गडाचा घेरा असे आपण म्हणू शकतो. रायगड सारख्या गडाचा घेरा पूर्वी कोंझरपाससून सुरु व्हायचा. कोंझर नंतर लगेचच सावंतांची चौकी लागायची. मात्र गाडीमार्ग जेव्हा पाचाड़पर्यंत आला गडाचा घेरा आक्रसला व लोक पाचाड पासून गडाची सुरुवात मानू लागले. आता तर चित दरवाजाच्या खिंडीपर्यंत गाडी जाते आणि लोकांना येथूनच गड सुरु होतो असे वाटते. काही गडांना संपूर्ण घेऱ्यातून प्रदक्षिणा करता येते (उदाहरणार्थ रायगड प्रदक्षिणा). काही गडांना गडमाथ्यावरून व मध्यातून देखील प्रदक्षिणा घालता येते (उदाहरणार्थ राजगड). मात्र काही गडांना रूढ अर्थाने प्रदक्षिणा घालणे शक्य नसते (उदाहरणार्थ हरिश्चंद्रगड). गडाच्या लष्करी महत्वानुसार घेऱ्याच्या परिसरात एक किंवा अनेक चौकी नाके असायचे. वर आपण पहिलेच कि रायगडला महाड कडून येताना कोंझर नंतर लगेचच चौकी होती. अशाच चौक्या प्रत्येक गडावर येणाऱ्या विविध मार्गांवर असत. नवीन आलेल्या आगंतूकास तिथे आपली ओळख पटवून येण्याचे प्रयोजन सांगितल्यानंतरच पुढे प्रवेश मिळे.
मेट - गडमाथा व तळातील घेरा यांच्यामधील चढणीच्या वाटेवर असणारी मोक्याची, वस्तीची मात्र तटबंदी नसणारी जागा म्हणजे मेट. येथे देखील छोटेशी तपासणी चौकी असे. एखाद्या दुर्गावर जाण्यासाठी अनेक वाटा व चोरवाटा असत. या वाटेने शत्रूचे गुप्तहेर, गडाच्या घेऱ्यात गस्ती चुकवून प्रवेश करणारे फितूर, घुसखोर अशा मंडळींना हटकण्यासाठी, प्रसंगी युद्ध करून त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी या मेटांचा वापर होत असे. मेटावर पहारेकऱ्यांना राहन्यायासाठी पक्की घरे असत व येथे कायमस्वरूपी पहारेकरी तैनात असत. या मेटावर असणाऱ्या लोकांना गडावर होणारी संभाव्य घुसखोरी रोखने, दुर्गाच्या दिशेने येणाऱ्या शत्रुसैन्याची आगाऊ सूचना गडावर देणे अशी कामे करावी लागत. दोन मेटामध्ये २४ तास जगता पहारा असे. मेटकऱ्यांना २ प्रकारचे पहारे द्यावे लागत. चल व अचल. चल पहारे हे गडाच्या घेऱ्यातून चालत. यात २ मेटांमधील अंतरात पहारे दिले जात व अशा प्रकारे संपूर्ण गडाचा घेरा या पहाऱ्याने व्यापला जाई. २ मेटांमधील अंतराच्या साधारण अर्ध्यापर्यंत दोन्ही मेटांकडून पहारेकरी येत व तेथून परत मेटापर्यंत जात. तोरणा किल्यास ७ मेटे होती असे कागदोपत्री उल्लेखांमध्ये दिसून येते. यापैकी पिलावरे, भुरूक, वाघदरे, भट्टी, बार्शीमाळ अशा मेटावर वस्ती होती व त्यांची सरनायकी जोरच्या (वाई प्रांत) कोळ्यांकडे होती. कधी-कधी एखाद्या मेटावरील वस्ती वाढून त्याचे रूपांतर छोट्याश्या गावात होत असे (उदाहरणार्थ मेट इंदवली, मेट पिलावरे). या मेटांवर पहाऱ्यासाठी बहुतेक कोळी, बेरड, रामोशी इत्यादी जमातीचे लोक नेमले जात. मात्र हा काही कायदा होता असे नव्हे. देशावर हे लोक मेटकरी तर कोकणात हेटकरी नावाने ओळखले जात.
माची - गिरीदुर्गाच्या उतारावर मध्येच सपाटी असलेल्या जागेला माची म्हणतात. रूढार्थाने माची हा गडाचाच एक भाग असतो मात्र तो दुर्गाच्या उंचीपेक्षा काहीसा कमी उंचीवर असतो. माची हा प्रकार फक्त गिरिदुर्गावरच आढळतो. माची हा भाग दुर्गाशीच संलग्न असल्याने ती देखील तटबुरुज बांधून सुरक्षित आणि संरक्षित केलेली असते. राजगडला पदमावती, सुवेळा व संजीवनी अशा ३ माच्या आहेत. तोरण्याला देखील झुंजार व बुधला तर प्रबळगडाला देखील माची प्रबळ नावाने माची आहे. मात्र प्रत्येक गिरिदुर्गाला माची असेलच असे नाही. जसे कि केंजळगड, कोरीगड, रोहिडा अशा अनेक गिरिदुर्गांना माची नाहीये.
प्रवेशद्वार - साधारणपणे माचीवर व ज्या किल्यांना माची नाही अशा किल्य्यांच्या माथ्यावर गडात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार असे. गडात थेट प्रवेश मिळण्याचा हा राजमार्ग असल्या कारणाने त्याच्या संरक्षणाची विशेष खबरदारी घेण्यात येत असे. बऱ्याच ठिकाणी हा दरवाजा २ बुरुजांच्या मध्ये सुरक्षित केलेला असे तर शिवकालीन दुर्गांचे प्रवेशद्वार हे अशा रीतीने बनविलेले असे कि ते सहसा दिसून येत नसे. यालाच गोमुखी बांधणी म्हणत. प्रवेशद्वार धडका देऊन सहजपणे तोडता येऊ नये म्हणून प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर मोठमोठे खिळे लावलेले असत. तसेच दरवाजाच्या असतील भागास अडसर किंवा अर्गळा लावीत असत. हा अडसर दरवाजाच्या एका बाजूने पूर्णपणे आत सरकावुन ठेवता येत असे. हा अडसर सहजपणे मागे पुढे करता यावा म्हणून कित्येक ठिकाणी बेरिंग सुद्धा वापरलेल्या दिसून येतात. पुरंदर दुर्गाच्या एका दरवाजाच्या अडसर मध्ये या अशा बेरिंग अजून देखील दिसून येतात. अनेक दुर्गावर हा अडसर अजूनही सुस्थित दिसून येतो.
पुढील भागात दुर्गावरील काही वास्तूंबद्दल जाणून घेऊयात. क्रमशः
- संतोष विष्णू जाधव (पुणे)