दुर्गपरिभाषा - भाग २

मागील भागात आपण दुर्गाच्या पायथ्यापासून सुरूवात करून दुर्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या दुर्गाच्या विविध अंगांबद्दल जाणून घेतले. या भागात आपण दुर्गावरील काही महत्वाच्या अंगांबद्दल जाणून घेऊयात.- संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गपरिभाषा - भाग २

अधित्याका/बालेकिल्ला - दुर्गाच्या सपाटीवर जर एखादा उंचवटा किंवा टेकाड असेल तर तो भाग तट- बुरुज बांधून अधिक मजबूत केला जातो. अशा भागास अधित्यका अथवा बाल्लेकिल्ला असे म्हणतात. बालेकिल्ला हा बाला इ-किला या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे. माचीप्रमाणेच बालेकिल्ला हा देखील दुर्गाचाच एक भाग असतो. मात्र प्रत्येक दुर्गाला बालेकिल्ला असेलच असे  नाही. राजगड, पुरंदर, जिंजी अशा दुर्गाना बाल्लेकिल्ला आहे तर रोहिडा, मंगळगड, अजिंक्यतारा अशा अनेक दुर्गाना बालेकिल्ला नाही. तसेच सिंहगड, शिवनेरी, जीवधन, चंदन, वंदन अशा अनेक दुर्गांमध्ये उंचवटे  असून देखील बाल्लेकिल्ला अस्तित्वात नाही. त्यामुळे या बद्दल एकच एक ठोस विधान करणे कठीण आहे.  साधारणपणे दुर्ग बांधणाऱ्या शासकावर व दुर्गस्थपतीवर तसेच त्या दुर्गाच्या लष्करी महत्वावर बालेकिल्ला बांधायचा किंवा नाही हा निर्णय होत असावा असा निष्कर्ष   निघतो. स्थलदुर्गात देखील प्रसंगोत्पात बाल्लेकिल्ला बांधलेला दिसतो. त्याला किल्ले अर्क/अरक असे म्हणत. विजापूर औरंगाबाद या सारख्या मोठ्या दुर्गामधील बल्लीकिल्ले एवढे महत्वाचे होते कि केवळ त्यांच्यासाठी वेगळा किल्लेदार नेमण्याचा रिवाज औरंजेबाच्या काळात होता. राजगडचा बालेकिल्ला हा गिरिदुर्गांमधील सर्वोत्तम बालेकिल्ला आहे. इतिहासात किल्ल्याची माची पडल्यानंतर सुद्धा बालेकिल्ल्याच्या साहाय्याने संग्राम सुरूच ठेवल्याची काही उदाहरणे सापडतात (पुरंदरची भैरव खिंड व माची पडल्यावर सुद्धा मराठे बाल्लेकील्याच्या आधाराने लढताच होते. अगदी मुरारबाजी पडले तरी मराठ्यानी किल्ला सोडला नव्हता). चाकणच्या संग्रामात देखील ईशान्य दिशेचा बुरुज पडल्यावर मराठे काही वेळ बालेकिल्ल्याच्या सहाय्याने लढले असा उल्लेख आहे. 

अंबारखाना (धान्यकोश/कोठी:) - दुर्गावरील धान्य साठविण्याच्या जागेला अंबारखाना (धान्यकोश:) असे म्हणतात.  सहसा अंबारखाना हा गडावरील मनुष्यवस्तीच्या सानिध्यात बांधलेला असे. पन्हाळगड, जिंजी, अंतूर, शिवनेरी, पट्टा इत्यादी गडांवरील अंबारखाने पाहण्यालायक आहेत. विशेषतः जिंजी व पन्हाळ्यावरील अंबारखाने हे अतिभव्य व हजारो जणांना किमान वर्ष २ वर्षे पुरेल इतके धान्य साठवू शकतील अशा क्षमतेचे आहेत. या धान्यकोठारांना धान्याची पोती सोडण्यासाठी छताला आच्छादित छिद्रे असत व धान्य काढण्यासाठी खालून एकच वेगळा दरवाजा असे. गडावर असणाऱ्या शिबंदीच्या संख्येनुसार अंबारखाना किती छोटा किंवा मोठा हे ठरविले जाई.

अलंगा - किल्ल्यावर पहारा करणाऱ्या सैनिकांसाठी तटबंदीच्या जवळ निवाऱ्यासाठी बांधलेल्या घरास अलंगा असे म्हणतात. हे अलंगा जागजागी तटबंदीला लागून आतल्या बाजूस बांधलेले असत. रायगडच्या चारही बाजूस अशा अलंगांचे अवशेष आजही दिसून येतात. मोहनगडाच्या उभारणी संदर्भात राजांनी बाजीप्रभूंना जे पत्र लिहिले आहे (१२ मे १६५९) त्यात राजे म्हणतात - किल्याच्या हवालदारास घर व लोकांस अलंगा मजबूद करून देणे. नाहीतर सजवज करून द्याल आणि किल्यावर लोक राहतील त्या आजार न पावे यैसे हवालदारास घर व लोकांस अलंगा येक माखलं(बखळ)  मुस्तेद (भक्कम) करून देणे. यावरून राजे सामान्य सैनिकाच्या सुरक्षेबद्दल व त्यांच्या सुखसोयींबद्दल किती जागरूक होते हे दिसून येते.  मोहनगड सारख्या टेहळणी साठी बांधलेल्या दुर्गावर सुद्धा त्यांना गस्त करणाऱ्या सैनिकांसाठी अलंग मजबूतच हवा आहे.

कोट/ तटबंदी (प्रकार:) - डोंगर अथवा पर्वताच्या किंवा जमिनीच्या इतर भागापाससून किल्याचा संरक्षित भाग वेगळा करणारी भिंत म्हणजे तटबंदी. तटबंदी शिवाय दुर्ग हि कल्पनाच शक्य नाही. स्थलदुर्गांमध्ये आवश्यकते नुसार हा कोट चिखल माती, कच्या-पक्या विटा व दगड यांनी बांधलेला असे. मात्र गिरिदुर्गाचा कोट हा दगडीच असे. कोटामध्येच संरक्षणाच्या दृष्टीने बुरुजांची रचना केलेली असे (बुरुजांबद्दल सविस्तर विवेचन पुढे येईलच). शक्यतो हा कोट माणसाला त्याच्या माथ्यावरून सहजपणे फिरता येईल असा भरभक्कम व रुंद असे. संपूर्ण दुर्गाचे रक्षण हे मुख्यत्त्वे या तटावरच अवलंबून असल्याने हा तट अतिशय काळजीपूर्वक व अनेक स्वसंरक्षक बाबींनी  परिपूर्ण असा बांधला जाई. फांजी, जंग्या, लादणी, बुरुज, चर्या (फालिका) हे सारे तटबंदीचेच  विविध भाग होत. या साऱ्यांबद्दल  विस्ताराने पाहुयात पुढील भागांमध्ये. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)