परशुरामभाऊ पटवर्धन - एक वीर सेनापती

गोपाळराव यांच्या निधनानंतर परशुरामभाऊ यांना पुण्यात वास्तव्य करणे क्रमप्राप्त झाले व शत्रूवरील मोहिमांमध्येही त्यांना भाग घ्यावा लागे.

परशुरामभाऊ पटवर्धन - एक वीर सेनापती

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मराठेशाहीच्या उत्तर काळात जी प्रसिद्ध मंडळी उदयास आली त्यापैकी एक म्हणजे परशुरामभाऊ पटवर्धन. परशुरामभाऊ यांचा जन्म १७३९ साली कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे या गावी झाला. परशुरामभाऊ यांच्या वडिलांचे नाव रामचंद्रपंत असे होते. 

मूळ गाव कोकणातील असले तरी परशुरामभाऊ यांचे आजोबा उदरनिर्वाहासाठी कोकणातून देशावरील इचलकरंजी येथे आले व तेथे त्यांनी इचलकरंजीकर घोरपडे घराण्याचे उपाध्याय म्हणून काम सुरु केले.

हरभटांना एकूण सहा पुत्र होते व त्यांच्या सर्वात लहान मुलाचे म्हणजे रामचंद्रपंत यांचे परशुरामभाऊ हे पुत्र. परशुरामभाऊ यांचे वडील रामचंद्रपंत हे पुण्यास पेशवे दरबारात नोकरीस होते. कालांतराने त्यांना वसईच्या किल्ल्याची फडणविशी प्राप्त झाली. रामचंद्रपंत यांचे १७४३ साली भागीरथी नदीच्या तीरावरील शिवपूर येथे निधन झाले.

वडिलांच्या मृत्यूनंतर परशुरामभाऊ यांची मुंज झाली आणि वडिलांच्या अखत्यारीत असलेले पथक परशुराम भाऊ यांचेकडे आले. १७५५ ते १७५६ च्या दरम्यान सावनूर येथे झालेल्या युद्धात परशुरामभाऊ यांनी प्रथम भाग घेतला. या मोहिमेत मुख्य सरदार पद गोपाळराव पटवर्धन यांचेकडे होते. ज्यावेळी गोपाळराव पटवर्धन मृत्युशय्येवर होते त्यावेळी त्यांनी परशुराम भाऊ यांना जवळ बोलावून माझ्या नावाचे तूच रक्षण कर असे सांगितले आणि त्यानंतर गोपाळराव यांचे निधन झाले.

गोपाळराव यांच्या निधनानंतर परशुरामभाऊ यांना पुण्यात वास्तव्य करणे क्रमप्राप्त झाले व शत्रूवरील मोहिमांमध्येही त्यांना भाग घ्यावा लागे. हैदरावरील एका स्वारीत लढाई सुरु असताना परशुराम भाऊ यांची तीन घोडी एका मागून एक अशी मारली गेली तरीही परशुराम भाऊंनी या युद्धात तलवार गाजवली आणि हैदरचा पराभव केला.

हैदरावरील स्वारीत पराक्रम गाजवल्याने पेशव्यांनी परशुराम भाऊंच्या अखत्यारीत वीस हजार सैन्याचे पथक दिले. १७३३ साली परशुराम भाऊंची मुख्य सरदार म्हणून नेमणूक झाली. १७८१ साली इंग्रज सेनापती गाईर्ड याने बोरघाट चढून त्या ठिकाणी कब्जा केला आणि मुख्य सैन्यास खंडाळा येथे पाठवून स्वतः पायथ्याशी खोपोली येथे तळ दिला.

पुणे येथे ही बातमी मिळाल्यावर परशुराम भाऊ आपले सैन्य घेऊन कोकणात उतरले आणि इंग्रज सैन्यास घेरून त्यांचा मुंबईशी संपर्क तोडून टाकला व यामुळे इंग्रजांचे दळणवळण बंद पडून त्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यांना बोरघाट सोडून पुन्हा पनवेलमार्गे मुंबईस जाणे भाग पडले. 

१७९५ साली झालेल्या खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईत परशुरामभाऊ यांनी मुख्य सेनापती म्हणून जबाबदारी पार पाडली होती. १७९६ साली नाना फडणीस आणि परशुरामभाऊ यांच्यात वितुष्ट निर्माण झाले कारण परशुरामभाऊ हे १७९६ साली दुसरे बाजीराव आणि शिंदे यांच्यात झालेल्या करारात जामीन राहिले होते. दोघांत शत्रुत्व आल्यावर परशुराम भाऊ यांनी नाना फडणवीस यांना बराच त्रास दिला मात्र त्याच वर्षी नाना फडणवीसांनी परशुरामभाऊ यांना अटक केली. 

१७९८ साली म्हणजे दोन वर्षानंतर परशुरामभाऊ यांची सुटका झाली आणि ते पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले १७९९ साली ते पट्टणकुडी येथे झालेल्या युद्धात सहभागी झाले मात्र हे युद्ध त्यांचे अखेरचे युद्ध ठरले कारण या युद्धात लढत असतानाच त्यांना वीरगती प्राप्त झाली.