दुर्गपरिभाषा - भाग ५

जंजिरा जलदुर्गाचे काही बुरुज हे ३ माजली असून यात आतमध्ये प्रशस्त दलाने आहेत. परिंडा, औसा, कंधार, बिदर, विजापूर हे स्थलदुर्ग तसेच दक्षिणेतील जिंजी, चित्रदुर्ग, कोप्पळ, गुत्ती हे गिरिदुर्ग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बुरुजांसाठी आवर्जून पहावेत असे आहेत. - संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गपरिभाषा - भाग ५

बुरुज/कोट्टगुल्मकम - दुर्गाच्या तटबंदीमध्ये ठराविक अंतरावर बाहेरच्या दिशेला चौकोनी अथवा अर्धवर्तुळाकार आकाराची केलेली संरक्षणात्मक रचना म्हणजे बुरुज. दुर्गबांधणीमध्ये सर्वाधिक प्रयोग हे बुरुजांच्या बांधणीत झालेले दिसून येतात. ढोबळमानाने बुरुज हे चौकोनी अथवा अर्धवर्तुळाकार असले तरी याचे अनेक पोटभेद दिसून येतात. अनेक पाकळ्यांचा बुरुज, षट्कोनी, पंचकोनी, अष्टकोनी  बुंध्यात रुंद व वर निमुळता होत जाणारा बुरुज असे अनेक प्रकारचे बुरुज पाहण्यात येतात. नळदुर्ग हा स्थलदुर्ग खास त्यातील बुरुजांच्या विविधतेसाठी पहावा असा आहे. याच धाराशिव  जिल्ह्यात अळणी येथे एक पक्क्या विटांमध्ये बांधलेली गढ़ी आहे. या गढीला देखील अनेक पाकळ्यांचा बुरुज आहे. जंजिरा जलदुर्गाचे काही बुरुज हे ३ माजली असून यात आतमध्ये प्रशस्त दलाने आहेत. परिंडा, औसा, कंधार, बिदर, विजापूर हे स्थलदुर्ग तसेच दक्षिणेतील जिंजी, चित्रदुर्ग, कोप्पळ, गुत्ती हे गिरिदुर्ग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बुरुजांसाठी आवर्जून पहावेत असे आहेत. कधी कधी काही ठिकाणी बुरुजाला सुरक्षेसाठी बाह्यावरण (चिलखत) देखील घातलेले दिसून येते. जसे योध्याच्या रक्षणासाठी त्याच्या अंगावर चिलखत घालतात जेणेकरून शत्रुपक्षाचा वार थेट त्याच्या शरीरावर होवू नये. तद्वतच बुरुजाला जास्तीचे संरक्षण देण्यासाठी हि योजना असते. राजगडच्या  संपूर्ण संजीवनी माचीस असे चिलखत घातलेले आहे. याशिवाय काही बुरुजांना दुहेरी चिलखत घालून फारच भक्कमपणा आणलेला आहे. अंतुरचा दक्षिण बुरुजदेखील असाच चिलखत घालून संरक्षित केलेला आहे. उत्कृष्ट बुरुज कसा असावा यासाठी प्रत्येक दुर्ग भटक्याने हा बुरुज पाहावा असाच आहे.

मगरबीवी(मग्रबी)/अश्मियंत्रम् - दगड फेकून मारण्याचे यंत्र. हे यंत्र अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात आल्याने त्याला मग्रबी अर्थात  'पश्चिमेकडून आलेलं' अशा अर्थाने हे नाव पडले असे काही अभ्यासकांचे मत आहे. मात्र हे स्पष्टीकरण तितकेसे योग्य वाटत नाही कारण असे दगड फेकून मारणारी यंत्रे सिकंदर विरोधात वापरली असल्याचे दिसून येते.

रेवणी/पारिखावलयम् - राज्यव्यवहारकोशात याचे स्पष्टीकरण 'मुख्य दारावरील खंदकापलीकडचा संरक्षक बुरुज' असे देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ज्या भूभागास रेवणी म्हणतात तो भाग हा एक उंचावटा असतो व त्याचा उतार हा ताटाच्या विरुद्ध दिशेला काढलेला असतो. तसेच उतार देताना तो अशा प्रकारे देतात कि जर रेवणीपासून ताटाच्या दिशेने  आपण रेघ मारली तर ती ताटाच्या चर्यांच्या वरून जाईल. थोडक्यात येथे तोफा ठेवून शत्रूने मारा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गोळे तटाला लागू नये अशी हि रचना असते. खंदक व हा उंचवटा यांच्या दरम्यान असणाऱ्या साऱ्या भूभागास रेवणी अथवा रेवण म्हणतात. हातघाईच्या लढाईत काही सैनिक या रेवणीत उतरून उंचवट्याचा फायदा घेऊन शत्रूशी लढण्यासाठी या रेवणीचा उपयोग करीत आणि त्यांना तेथून हाकलल्याशिवाय शत्रूस पुढे सरकता येत नसे. नगरच्या स्थलदुर्गास रेवणी होती.

शेरहाजी - मुख्य तटाच्या बाहेर काही अंतरावर मात्र खंदकाच्या आत मुख्य तटापेक्षा कमी उंचीची (साधारण ताटाच्या उंचीच्या एक तृतीआंश उंचीची - अर्थात हे ढोबळमानाने आहे. ही उंची अनेक घटकांवर ठरते. शेरहाजी मुख्य  तटापासून किती अंतरावर आहे यावर मुख्यत्वे उंची अवलंबून असते) अजून एक पूरक अशी तटबंदी बांधली जाते  तिला शेरहाजी म्हणतात. या विशिष्ट रचनेचा शोध लावणाऱ्या व्यक्तीचे नाव शेरहाजी असल्याने तेच नाव या रचनेस पडले. परिंड्याची शेरहाजी अभ्यासन्यासारखी आहे.

सदर - दुर्गावरील प्रशासकीय कामकाजाची जागा. 

आजपर्यन्त या सदरात आपन दुर्ग संकल्पनेची उपत्ति, तिचा विकास तसेच दुर्गबांधनीशास्त्र अशा अनेक गोष्टीचा आढावा घेतला. तसेच दुर्गाच्या विविध भागांना काय संबोधले जाते याचा उहापोह देखील केला. अर्थात यात सर्वच दुर्गावशेष आले असे  नाही. मात्र जे  दुर्गावशेष बहुतेक दुर्गांवर आढळतात असे सारे दुर्गावशेष यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. उद्यापासुन दुर्गाचे लष्करी व मुलकि प्रशासन याबद्दल जाणून घेवूयात.

क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)