शिवपत्नी महाराणी सईबाई भोसले
१६४० साली शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह पुण्यास संपन्न झाला. १६५७ साली किल्ले पुरंदर येथे सईबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांच्या माता म्हणून महाराणी सईबाईंना इतिहासात एक आदराचे स्थान आहे. सईबाई यांचे माहेर फलटणचे निंबाळकर घराणे असून त्या मुधोजीराजे नाईक निंबाळकर (दुसरे) यांच्या व रेऊबाई निंबाळकर कन्या होत्या. सईबाई यांच्या आजोबांचे नाव वणगोजी नाईक निंबाळकर असे होते. वणगोजी नाईक निंबाळकर यांनाच जगपाळराव या नावानेसुद्धा ओळखले जात असे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे व सईबाई यांचे नाईक निंबाळकर घराणे यांच्यात सोयरिकीचे संबंध पूर्वीपासून होते. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पत्नी दिपाबाई या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील असून जगपाळराव नाईक निंबाळकर हे त्यांचे बंधू होते.
जगपाळराव आणि मालोजीराजे यांचा खूप चांगला सलोखा होता. त्याकाळी जगपाळराव यांच्याकडे बारा हजारांची फौज होती असा उल्लेख ऐतिहासिक साधनांत येतो. मालोजीराजे भोसले यांना अनेक प्रसंगात जगपाळराव यांची साथ लाभली होती.
दिपाबाई भोसले या शिवाजी महाराजांच्या आजी असल्याने सईबाईंचे बालपण हे शहाजीराजे व जिजाबाई यांच्या डोळ्यादेखत गेले होते हे स्पष्ट आहे.
१६२७ साली विजापूरचा बादशाह इब्राहिम आदिलशहा (दुसरा) याचा मृत्यू झाल्यावर मुधोजींनी फलटणच्या जहागिरीस स्वतंत्र घोषित करून स्वतंत्र कारभार सुरु केला होता मात्र इब्राहिम आदिलशहाचा पुत्र मोहम्मद आदिलशाह याने आपले सैन्य फलटणवर पाठवून मुधोजींचा पराभव केला व त्यांना साताऱ्याच्या किल्ल्यात दहा वर्षे अटकेत ठेवले. यावेळी त्यांचे कनिष्ठ पुत्र बजाजी निंबाळकर हे सुद्धा त्यांच्यासोबत अटकेत होते. १६३९ साली शहाजी महाराजांनी मध्यस्थी करून मुधोजी व बजाजी यांची आदिलशाही कैदेतून सुटका करवली व त्यांची जहागीर त्यांना पुन्हा मिळवून दिली.
१६३९ साली मुधोजी यांची सुटका झाल्यावर एका वर्षाने म्हणजे १६४० साली शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह पुण्यास संपन्न झाला. १६५७ साली किल्ले पुरंदर येथे सईबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. संभाजी महाराज्यांव्यतिरिक्त सईबाईंना तीन कन्यारत्नेही होती ज्यांची नावे सखुबाई (सकवारबाई), राणूबाई व अंबिकाबाई अशी होती.
सखुबाई यांचे लग्न बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महादजी निंबाळकर यांच्याशी झाले होते. राणूबाई या जाधव घराण्यात दिल्या होत्या व अंबिका बाई यांचे लग्न हरजी राजे महाडिक तारळेकर यांच्याशी झाले होते.
विवाहानंतर एकोणीस वर्षे सईबाईंनी शिवाजी महाराजांना साथ दिली. या एकोणीस वर्षांच्या काळात सईबाई यांचा स्वभाव तसेच शिवाजी महाराज व सईबाई यांचे नाते कसे होते हे जाणून घेण्यास दोघांच्या जीवनातील एक प्रसंग खूप महत्वाचा आहे.
स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळी शिवाजी महाराजांनी तोरणा, राजगड, सिंहगड, चाकण हे किल्ले ताब्यात घेऊन राजगडावर इमारतींचे काम सुरु केले. ही बातमी अदिलशहापर्यंत गेल्यावर त्याने शिवाजी महाराजांना "तुम्ही पातशाही चाकर असून मुलुख मारता, किल्ले घेता, खजिना लुटता हे उत्तम करीत नाही. बरे झाले ते माफ असे. तुम्ही हुजूर येणे, तुम्हास दौलत देऊ, सरफराज करू" असा संदेश पाठवला.
आदिलशहाकडून संदेश आल्यावर शिवाजी महाराजांनी हा संदेश सईबाईंना सांगितला व विचारले की, "पातशाहाने कौल पाठवून भेटीस बोलावले आहे, जावे की न जावे?"
यावर सईबाई महाराजांना म्हणाल्या "आम्हा स्त्रियांस पुसावे असे नाही, महाराज काय समजोन पुसतात न कळे, थोर थोर लोक मुसद्दी आहेत, ज्यांचा भरवसा असेल त्यांस विचार पुसावा."
यावर महाराज म्हणाले की "बरोबर आहे मात्र स्त्रियास्त्रियांत अंतर आहे. माता ही घराचे दैवत तर स्त्री म्हणजे घरचा प्रधान याजकरिता विचारले"
यानंतर सईबाई म्हणाल्या की "महाराजांचे वडील हुजूर आहेत, महाराजांनी पातशाही किल्ले घेतले, मुलुख मारिला याकरिता हुजूर जावे हा सल्ला नाही, वडिलांवर दृष्टी ठेवून जाल तर बरे कसे दिसेल? राज्य करावे असेल तर श्रीशंकरजींस शरण जावे. श्री जे कार्य नेमून देतील ते पाहावे. राज्य करणे त्यास मोह कैसा? कंबरेस दाली बांधावी (तलवार लावण्याचा कमरपट्टा बांधून लढण्याची तयारी करावी). पुढे जे होणे ते होईल."
सईबाईंचा हा धीरोदात्त सल्ला ऐकून शिवरायांना अतिशय आनंद झाला आणि शिवरायांना शहाजीराजांनी कर्नाटकातून पोवळ्याचा पलंग, चार लाख होनांचा सोन्याचा कमरपट्टा, जिऱ्हे बखतरे, टोप आणि फिरंग तलवार अशा मौल्यवान वस्तू जलमार्गाने पाठवल्या होत्या त्यापैकी सोन्याचा कमरपट्टा सईबाईंना भेट म्हणून दिला आणि सईबाईंच्या सल्ल्यानुसार कमरबंदी (लढण्याची तयारी) केली.
शिवचरित्रातील या एका प्रसंगातून महाराणी सईबाईंचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर उभे राहते.
सईबाईंचे १६५९ साली दीर्घ आजाराने राजगडावर निधन झाले. निधनसमयी सईबाई यांचे वय २६ वर्षे होते. महाराजांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाबाई होत्या तर या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या महाराणी सईबाई होत्या व यामुळेच शिवाजी महाराजांना स्वतःस निर्धास्तपणे स्वराज्यकार्यात पूर्णपणे झोकून देणे शक्य झाले.