शिवरायांचे आठवावे रूप

वास्तविक पाहता राजांना समजावून घ्यायचे असेल तर आधी आम्ही त्यांच्यातला कल्याणकारी शासक समजावून घ्यायला हवा.  योद्धा हे रूप भावणारे असले, तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याची ताकद ही एका कुशल शासकात असते. - संतोष विष्णू जाधव

शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचे आठवावे रूप

विष्णुगुप्त अर्थात आर्य चाणक्य. ई. स. पूर्व ४ थ्या शतकात भारतात जन्मलेला पहिला राष्ट्रवादी पुरुष .त्यानंतर सुमारे २००० वर्षांचा एक प्रदीर्घ शून्य काळ लोटला. दरम्यानच्या काळात थोर सम्राट, राजे, महाराजे, पराक्रमी पुरुष, अनेक थोर योद्धे या राष्ट्रात होऊन गेले. मात्र भारताकडे राष्ट्र या नजरेतून पाहणारा कोणी नाही. ई. स. १६३० मध्ये हा प्रदीर्घ शून्य काळ संपला. भारताचा भाग्यविधाता शिवनेरीवर जन्मास आला. मी इथे महाराष्ट्राचा म्हणत नाहीये हे कृपया लक्षात घ्यावे कारण त्यांना अज्ञानाने आम्ही महाराष्ट्राच्या सीमांमध्ये बंदिस्त केलंय.

राजांच्या कर्तृत्वाचा विचार करताना आपण नेहमी त्यांच्या समरांगणावरील पराक्रमावर विशेष भर देतो. राजे आम्हाला नेहमीच शत्रूची बोटे छाटताना किंवा त्याचा कोथळा फाडताना पाहायला आवडतात. मात्र त्यांच्या अफाट, अचाट आणि अथांग व्यक्तित्वाचा तो फक्त एक पैलू आहे. वैयक्तिक पराक्रम पाहता असे पराक्रमी वीर थोड्याफार फरकाने सर्वत्र झालेले दिसतात. मात्र असे असूनही त्यांच्या पराक्रमाचे गोडवे राजांसारखे व राजांप्रमाणे सर्वस्तरावर गायले जात नाहीत. काय कारण असावे याचे? या प्रश्नाकडे आम्ही सहसा जात नाही. कारण तसे जाण्यात अनेक धोके असतात. सगळ्यात पहिला धोका म्हणजे मग आम्हाला इतर वीरांचेही गुणगान करावे लागेल, जे सर्वसामान्य जनतेप्रमाणेच नेत्यांनाही ते नको आहे, कारण त्यातून मग त्यांच्या संकुचित राजकारणाला तडा जाऊ शकतो आणि प्रांतवाद जोपासणे अवघड होऊन बसते.

वास्तविक पाहता राजांना समजावून घ्यायचे असेल तर आधी आम्ही त्यांच्यातला कल्याणकारी शासक समजावून घ्यायला हवा. योद्धा हे रूप भावणारे असले, तरी सर्वसामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याची ताकद ही एका कुशल शासकात असते. कुशल योद्धा हा काही क्षणाच्या पराक्रमाने एखाद्या लढाईचा निकाल बदलवू शकतो, मात्र एक द्रष्टा शासक हा आपल्या अथक व चिवट प्रयत्नांनी संपूर्ण राष्ट्राचे भाग्य बदलावतो. राजे उत्तम योद्धा होतेच मात्र ते काही जगातले एकमेवाद्वितीय योद्धा होते असे नाही. त्यांच्या समकालीनही अनेक रणधुरंदर होतेच. आधी आणि नंतरही अनेक झालेतच. मात्र संपूर्ण विश्वातून सर्वकालीन सर्वोत्तम शासक निवडण्याची वेळ येईल तेव्हा कुणासही राजांच्या उल्लेखाशिवाय ती यादी पूर्ण करता येणार नाही वा तशी हिम्मतही होणार नाही. पण मुळात स्वभावतःच रांगडे असणारे आम्ही त्यांच्या योद्धा रूपावर एवढे भाळलोय की त्यापलीकडे फारसं आम्हाला काही दिसतंच नाही.

प्रत्येक प्रसंगांमध्ये राजांच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन होते, मात्र त्यासाठी तशी दृष्टी असणे आवश्यक आहे. राजांनी दक्षिण दिग्विजयात असताना बाजी घोरपडे यांचे पुत्रास जे पत्र पाठविले आहे ते त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीचा एक बेजोड नमुना आहे. जरी आपल्या पित्याचे वैर  धरणाऱ्या बाजी घोरपडे यांना  राजांनी स्वहस्ते  यमसदनास  धाडले असले तरी, घोरपडे  हे एक पराक्रमी  घराणे  आहे आणि त्या पराक्रमाची राष्ट्र कार्यात मदत झाली तर सोन्याहून पिवळे,  या  थोर उद्देशाने  राजांनी त्यांना  "तुमचे गोमटे करावे ऐसें मनी आहे" असा प्रेमाचा सांगावा धाडला होता. मात्र दुर्दैवाने  तेव्हाही  आणि  आताही  त्यांची ही भावना कोणास फारशी  समजलीच नाही.

राजे महाराष्ट्रात  जन्मले  त्याचा  परिणाम  म्हणजे  भारत वर्षात राष्ट्र या संकल्पनेच महत्व एक मराठे सोडले तर इतर कोणासच कधी गंभीरपणे जाणवले नाही. परिणामी परचक्र येताच  स्वतःची पोळी भाजून  राष्ट्राची अस्मिता दावणीला बांधायचा उद्योग आंभिकुमारापासून ते थेट मीरजाफर पर्यंत दिसतो. पुढे  हाच रोग आमच्या सर्वच राजकीय पुढाऱ्याना जडला. मात्र राजांच्या नंतर मराठयांमध्ये  झालेला राष्ट्र या भावनेचा प्रादुर्भाव हा अगदी १९६२ च्या चीन युद्धा पर्यंत अखंडित वाहताना दिसतो. राजांच्या  व्यक्तिमत्वाचा हा खरा चमत्कार आहे हे कोणी फारस विचारात घेत नाही.

राजांच्या एकूण लष्करी पद्धतीत  'साहेबी कारकुनाची' हा जो  भाव  सतत  होता  तो त्यांच्यातील  उच्च  दर्जाच्या शासकाचा परिपाक होता. जनतेच्या  राज्यात लष्कराने पराक्रम  गाजवावा, जनतेने  त्याचे  तोंडभरून कौतुक करावे, मात्र सर्वोच्च  सत्ता ही दिवाणी असावी अशी त्यांची धारणा होती.  मात्र  त्यांच्या सर्वोत्तम शासक या रुपापेक्षा थोर योद्धा या रुपाचेच  सर्वसामान्य जनतेला अधिक आकर्षण  असते, कारण त्यांना इतिहासच तशा पद्धतीने सांगितला जातो. दुर्दैवाने आपल्या इथे इतिहासकार म्हणवणाऱ्या अभ्यासकांनी नाट्यमय घटनांचेच उदात्तीकरण अधिक केल्याने, सामान्य जनात तोच समज दृढमूल झाला. नाट्यमय घटनांच्या मसालेदार  कथांमुळे लोकांमध्ये इतिहास  जाणून  घेण्याची उत्कंठा वाढते, हे जरी खरे असले तरी त्यात एक फार मोठा धोकाही असतो. बहुतांश  वेळी फक्त  आशा  घटना  म्हणजेच   इतिहास असा एक समज दृढ होतो.

राजांची आज जनमानसात जी प्रतिमा आहे हे त्याचेच द्योतक आहे. नाट्यमय घटनेमागे असलेली  उदात्त मूल्ये, त्यासाठी करण्यात आलेला  त्याग, श्रम, व्युव्हरचना, त्याची पार्शवभूमी, तिच्या  संभाव्य  परिणामांची जाणीव, घटनेतील सहभागी  पात्रांची भावना,  त्यांची मनोभूमिका, त्या घटनेकडे  पाहण्याचा  त्यांचा दृष्टीकोन अशा अनेक घटकांचा कधी विचारही होत नाही. केवळ त्यातील नाट्यात अडकून  आम्ही त्या घटनेचे ऐतेहासिक मूल्य समजून न घेता त्यातील भव्यदिव्य पराक्रम  व रणांगणावरील जय पराजय एव्हढ्या पुरताच मर्यादित विचार करतो. म्हणूनच सामान्यजन आणि इतिहासकारही 'आग्रा भेट' हा राजांच्या पराक्रमाचा परमोत्कर्ष मानतात. कारण त्यातील नाट्य हे सर्वोत्कृष्टआहे.  मात्र राज्याभिषेक वा दक्षिण दिग्विजय तेवढा भव्यदिव्य पराक्रम वाटत नाही कारण त्यात फक्त नाट्यमयतेला खूप कमी वाव आहे.

तिथे दिर्घकाळाचे नियोजन आहे, चिकाटीने न थकता केलेला योजनांचा पाठपुरावा आहे. सामान्यांना  राज्याभिषेक म्हणजे काय तर सिंहासनावर बसणे, गंगोदकाने स्नान, हत्तीवरून मिरवणूक, ब्राम्हण  भोजन, दक्षिणा एवढंच वाटत आणि सहसा अभ्यासक याहून अधिक काही समजावून देण्याच्या फंदात फार जात नाहीत, कारण खूपदा त्यांचीही मनोभूमिका साधारण तशीच असते.

मात्र राजांच्या चतुरस्त्र राजकारणाचा काळसाध्याय असणाऱ्या दक्षिण दिग्विजयावर चरित्रकार फार पाने खर्च करीत नाहीत. कदाचित भाषेची अडचण वा साधनांची कमतरता  असा एखादा मुद्दा कोणी पुढे करील,  तर हाच नियम आग्रा भेटीलाही लागू होतो हे सोयीस्कररित्या  विसरले जाते.  त्यामुळे महाराज समजावून घ्यायचे असतील तर त्यांच्यातील 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका'  असे बजावणारा शासक आधी समजला पाहिजे.

कुणालाच कधी हा प्रश्न का पडत नाही की मुठभर संख्येने असणारे आक्रमक  जगात सर्वत्रच यशस्वी का झाले.  अल्लाउद्दीन अवघ्या ८ हजार सैन्यनिशि खुद्द यादवांच्या राजधानीत येवून जिंकतो. हे का होते? समाज जेव्हा स्थिर होतो, भौतिक सुखाच्या वरच्या पायरीवर असतो तेव्हा जर  त्या समाजाने  विचारवंत प्रज्ञावंत यांची उपेक्षा केलि तर तो हळूहळू ऱ्हास पावतो आणि अशा ऱ्हास पावण्याच्या अवस्थेत जर त्यावर परकीय आघात झाला तर समाजाची सामूहिक शक्ती क्षीण असल्याने त्याचा प्रतिकार करू शकत नाही.  अशा वेळी विषम संख्याबळ हा मुद्दाही गौण ठरतो. जगाचा इतिहास  पहिला  तर हा  मुद्दा लक्षात यायला अवघड जाऊ नये.

ज्या यदवांमुळे महानुभाव पंथ स्थिर झाला त्यांच्याच राज्यात  चक्रधर  स्वामींची  काय वाट लावण्यात  आली ते पहा.  गंमत म्हणजे यादवांच  राज्य तेव्हा माळव्यास लागून होते पण अल्लाउद्दीन १५ किलोमीटरवर अला तरी आमचा राजा आणि प्रजा दोन्ही झोपलेलेच होते. समाज  जेव्हा वैचारिक दृष्टया  असहिष्णु होतो तेव्हा परकीय सत्तेस तो प्रदेश जिंकणे सर्वात सोपे जाते. कारण समाज जाती, पंथ अश्या वर्गात विभागलेला असतो.

ज्यावेळी तुम्ही राजा या पदावर आरूढ असता त्यावेळी तुमचे व्यक्तिमत्व बहुआयामी व चतुरस्त्र असायला हवे. हे नंतरच्या यादव राजांना जमले नाही व याउलट महाराजांनी  हे सर्व गुण आत्मसात केले आणि महाराजांचे  इतिहासाचे ज्ञान उत्कृष्ट असल्या कारणाने कोणावर किती व कसा विश्वास ठेवायचा हे त्यांनी जाणले म्हणूनच राज्याभिषेकावेळीही  महाराजांनी स्वराज्याच्या चारही सीमांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. 

सध्या महाराजांना सेक्युलर वा हिंदू धर्म रक्षक ठरवण्याची नुसती घाई उडाली आहे. जसे लोक महाराजाना चुकीच्या पद्धतीने तथाकथित सेक्युलर ठरवतात तसेच विरुद्ध पक्षीय त्यांना नकळत परधर्मद्वेष्टे ठरवण्याचा हट्ट करताहेत.  महाराज धर्मश्रद्ध होते. परधर्म द्वेष्टे नव्हे.  राजानी  भिवंडी व पेरुमलाई अशा ठिकाणी मशिदी पडल्यात हे निर्विवाद आहे. फक्त  इथं अर्धवट  सत्य  सांगून दिशाभूल करण्यात येते.  सर्व अभ्यासकांना एक प्रश्न आहे राजानी मूळ मशीद असणारी एकही वस्तू पडल्याचा पुरावा कोणा कडेही असल्यास जरूर समोर आणावा. वरील उदाहरण मंदिर पाडून तिथे बांधलेल्या मशिदीची आहेत.  ती पाडताना राजांचा उद्देश हा त्या विशिष्ट धर्माबद्दल द्वेष प्रकट करण्याचा नसून त्या धर्माचे जे धर्मान्ध शासक होते त्यांना धडा शिकविण्याचा होता.  तुम्ही जर हट्टाने माझी धर्मस्थाने  भ्रष्ट कराल तर मीही ती  पुन्हा पुन्हा हट्टाने परत बांधणार. तुमच्यात  हिम्मत असेल तर मला अडवा.  हा उद्देश ठेवून त्यांनी आयुष्यभर काम केलं. मात्र सध्या जो तो आपल्या आंधळ्या धर्मप्रेमाच्या चष्म्यातून त्यांच्याकडे पाहून त्या महामानवाचा अपमान  करीत आहे. तसेच उगाच त्यांना बेगडी धर्मनिरपेक्षत्येच्या बेड्यात  सुद्धा अडकवू नका. ते मानवतेचे रक्षक होते. सहज शक्य असूनही मुस्लिम व इतर युरोपीय  शासकांप्रमाणे  त्यांनी कधीच कत्तली केल्या नाहीत वा सापडला हाताला म्हणून कुणाही परधर्मीयांस  बाटवले नाही.  

राजे धर्मनिरपेक्ष होते म्हणण्यापेक्षा ते धर्मश्रद्ध होते हेच म्हणणे योग्य आहे. पण  ते सर्वच धर्माच्या बाबतीत तसे होते. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसारधर्माचरण  करता आले  पाहिजे  हेच  त्यांचे धोरण होते. ते हिंदू धर्माचे पुरस्कर्ते होते.  पण याचा अर्थे इतर धर्माचे द्वेष्टे होते असा नाही.  स्वधर्मरक्षण्यासाठी ते सदैव हाती खडग घेऊन तत्पर होते. पण  एक निश्चित कि ते कधीच कडवे  धर्मनिष्ठ  नव्हते. ते सश्रद्ध धार्मिक होते.   

राजांनी मशिदी पाडल्या हे खरे आहे.  शिवभारत काय व इतर साधने काय ते सांगतच आहेत. प्रश्न हा आहे १६५७ ला कल्याण भिवंडीत मशीद  पाडणाऱ्या  महाराजाना त्यानंतर  दुसरी मशीद स्वराज्यात का पाडू वाटली नाहि.  ती पाडण्यासाठी ते २० वर्षे का थांबले.  साधने तारखा व घटना देतात. ती दरवेळी कार्यकारणभाव देतीलच असे नाही. तो  इतर अनुषंगीक पुरावे व तर्कशास्त्र  याआधारे  खुपदा  शोधावा लागतो. तर्कशास्त्र न वापरता कुठलाही साद्यंत इतिहास अगदी कोणीही  लिहिला असेल तर सांगा. प्रश्न इथे महाराजानी काय केलं हा नसून त्याचा अन्वयार्थ काय लावला जातोय हे महत्वाचे आहे. अर्थ दरवेळी कागदात लिहिलेलाच असेल असे नाही.

राजांचा विचारात घेण्यासारखा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या काळात नोकऱ्या, बढत्या या फक्त आणि फक्त  वैयक्तिक क्षमतेवर व अंगच्या गुणांवर मिळत.  केवळ गुणवत्तेवर सर्वांची निवड होई.    

सामान्य माणसाला असामान्य पराक्रम करण्यासाठी त्यांनी आपल्या चारित्र्याने उद्युक्त केले.  हे राज्य व्हावे ही खरोखरच श्रीं ची इच्छा आहे असा भाव त्यांनी अगदी तळागाळातील सामान्य जनतेतही रुजवला.  आणि म्हणूनच हे माझे राज्य असल्याने त्याच्या रक्षणासाठी मला प्राणपणाने लढले पाहिजे या भावनेतून सर्वसामान्य रयत त्यांच्या पश्चात या राज्याच्या रक्षणासाठी लढली.

जो प्रदेश राजे जिंकत त्याचा कारभार ते इतका सक्षम करीत की तो परत जिंकून घेणे शत्रूस दुरापास्त होई. त्यांनी जिंकलेला खूपच कमी भूभाग त्यांच्या हयातीत आदिलशहा वा मोगलांना परत जिंकता आला. यातच त्यांचे संघटन कौशल्य, दक्ष प्रशासन आणि रयतेची त्यांच्या प्रती राजनिष्ठा दिसते. जिंजी प्रांतात अवघ्या ६ महिन्यात त्यांनी जी शासन व्यवस्था उभी केली ती पुढे औरंगजेबास २७ वर्षे खपूनही मोडता आली नाही.

हिंदूंना नेहमी अडचणीची ठरणारी व त्यांचे संख्याबळ घटवणारी स्वधर्मात परत घेण्याची बंद झालेली  प्रथा त्यांनी सुरू केली. जबरदस्तीने बाटवून मुसलमान केलेल्या लोकांनात्यांनी परत स्वधर्मात घेतले. राजे खासगी जीवनात अतिशय धार्मिक व श्रद्धाळू होते. ते एक शिवभक्त होते. ते नित्य नेमाने आपली कुलदेवी तुळजाभवानीचे सारे कुळधर्म कुळाचार  पाळीत.  मात्र एक राज्यकर्ता या नात्याने ते अगदी सहिष्णू होते.  प्रत्येकास आपल्या धर्माप्रमाणे आचरणाचे स्वातंत्र्य हवे यावर त्यांचा दृढ विश्वास होता व कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकास आपला स्वधर्म आचरता यावा अशी परिस्थिती त्यांनी त्यांच्या राज्यात निर्माण केली होती. त्यांची धार्मिकता ही इतरांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच न करता सर्व धर्मियांच धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखणारी होती.  मात्र कुठल्याच प्रकारच्या व कोणत्याही धर्माच्या धार्मिक उन्मादास ते कधीच डोके वर काढू देत नसत.  

या संदर्भात १६६७ च्या गोव्याच्या स्वारीत ज्या  ४  पाद्रींनी तिथल्या विजरईला धार्मिक आधारावर हिंदूंना गोव्यातून जायला सांगितले त्यांची डोकी मारून त्यांनी फाजील धर्मवेड कसे थांबवायचे हे कृतीने दाखवून दिले.

राज्याभिषेक हा राजांच्या आणि एकूणच भारतीय समाजाच्या जीवनातील मागील २००० वर्षांतील सर्वोच्च क्षण होता.  अत्यंत काटकसरी असणाऱ्या राजांनी सुमारे १० लाख ते दीड कोटी खर्च सांगितला जाणारा प्रचंड खर्चिक असा राज्याभिषेक सोहळा का करवून घेतला, त्यामागे त्यांची मनोभूमिका काय होती हे समजावून घेणे जरुरी आहे.  राजांचे राजेपन हे स्वयंभू होते. आपल्या राजेपणासाठी राजांना त्यांच्या रयतेकडून  मान्यता मिळवण्याची काही आवश्यकता नव्हती.  सामान्य जनतेने त्यांना आपला राजा, उद्धारकर्ता म्हणून केव्हाच स्वीकारले होते.  मात्र व्यवहारात हे राजेपण सिद्ध करायचे तर त्याला कायदेशीर रूप देणे गरजेचे होते आणि ते देण्याचा त्या काळातील सर्वमान्य मार्ग म्हणून त्यांना राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या एका घटनेने त्यांनी स्वतःला अखिल भारतीय जनतेचा नेता, उद्धारकर्ता म्हणून उद्घोषित केले. संपूर्ण भारतात आता हिंदूंना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध दाद मागण्यासाठी हक्काचे कायदेशीर व्यासपीठ या एका घटनेने मिळवून दिले.  कोणाही पीडितास न्याय देण्यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गाने राजदंड हाती घेतला.  त्यांच्या प्रत्येक कृतीला यामुळे कायद्याचे, धर्माचे एक अधिष्ठान मिळाले.

तत्कालीन परकीय जेत्यांच्या  सत्तेला हे स्थानिक जितांनी दिलेले उघड आव्हान होते. परिणामी हे आव्हान स्वीकारून ते मोडून काढणे आवश्यक झाल्याने औरंगजेबास २७ वर्षे दक्षिणेत रानोमाळ भटकावे लागले.  राज्याभिषेकामुळे मराठी मनाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडला. आपण या देशाचे चालक, पालक आहोत आणि प्रसंगी देशहितासाठी स्वहित बाजूला ठेवावे लागले तरी हरकत नाही ही भावना दृढमूल झाली.  पानिपत लढाईची बीजे ही अशी राज्याभिषेकात रुजलेली दिसतात.

आपल्या मृत्यूनंतरही पुढील अनेक पिढ्याना मार्गदर्शक ठरेल असा व्यवहारवाद राजांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत इथल्या सामान्यांना शिकवला आणि त्यातूनच इथले सामान्य जण त्यांच्या पश्चात उभे राहिले, आपल्या न्याय हक्कांसाठी नेता नसताना, राज्य नसताना आणि कोणतीही विशेष साधने नसताना लढेल. केवळ लढलेच नाही तर यशस्वी झाले आणि परकीय आक्रमकांना त्यांनी या देशातून हद्दपार केले. शिचरित्राचे हेच फलित आहे. त्यांनी आयुष्भर खपून उभ्या केलेल्या लढ्याचे हेच अंतिम ध्येय होते जे त्यांच्या मृत्यूनंतर सामान्य रयतेने आपल्या कृतीतून सिद्ध केले आणि राजांच्या साऱ्या खटाटोपाचे सार्थक केले. आज आम्हाला यातून बोध घेणे आवश्यक आहे... सामान्य रयतेने जर यातून बोध घेतला तर अवघ्या १०-१२ वर्षात हे राष्ट्र पुन्हा एकदा साऱ्या प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त होईल आणि तीच या राष्ट्राची त्या महामानवाच्या कार्यास दिलेली खरी मानवंदना असेल... जय शिवराय!

- संतोष विष्णू जाधव (पुणे)