दुर्गव्यवस्था - भाग २

मोठमोठ्या गडांवर इमारती हवालदार म्हणून अजून एक अधिकारी नेमलेला दिसून येतो. गडावरील सर्व प्रकारची बांधकामे व वास्तुच्या दुरुस्त्या करन्याची जबाबदारी याच्यावर असे.- संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गव्यवस्था - भाग २

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मागील भागात आपण दुर्गाची मुलकी व लष्करी प्रशासन व्यवस्था थोडक्यात पाहिली. या भागात आपण दुर्गावरील प्रमुख अधिकाऱ्यांचे सहायक व गडावरील इतर दुय्य्म कर्मचारी वर्गाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

गडाचा हवालदार, सबनीस व कारखानीस हे ३ मुख्य अधिकारी असत. तटसरनोबत/सरनोबत हा हवालदाराचा  प्रमुख सहाय्यक असे (हा दर ४ वर्षानी बदलला जाइ). त्याशिवाय नाईकवडी हा अजून एक सहायक पहावयास मिळतो. इतर सर्व अधिकारी हे त्याच्या कालमर्यादेनंतर बदलले जात. मात्र नाईकवडी हा एकमेव वतनी अधिकारी दिसून येतो. अगदी शिवकाळात देखील हा एकमवे अपवादात्मक अधिकारी वंश परंपरा त्याच गडावर नाईकवडीचे वतन सांभाळताना दिसतो.

मोठमोठ्या गडांवर इमारती हवालदार म्हणून अजून एक अधिकारी नेमलेला दिसून येतो. गडावरील सर्व प्रकारची बांधकामे व वास्तुच्या दुरुस्त्या करन्याची जबाबदारी याच्यावर असे. मात्र हा अधिकारी प्रत्येक गडावर नसे.  जिंजीला रुद्राजी साळवी, प्रतापगडावर अर्जोजी यादव इमारती हवालदार नेमल्याचे कागदपत्रातून आढळते.  हिरोजी इंदलकर हे रायगडाचे व एकूणच स्वराज्याचे अतिशय नामांकित इमारती हवालदार असल्याचे आढळते.
 
काही मुख्य गडांवर वेळ समजण्यासाठी दर तासाने टोल वाजविण्याची प्रथा होती. हे काम करणाऱ्या व्यक्तीस तासकर म्हणत. राजगडावर टोल वाजविण्याच काम करणारे जोशी हे तासकर जोशी म्हणून प्रसिद्ध आहेत. आजही त्यांचे  वंशज गुंजवणे येथे वास्तव्यास आहेत. याशिवाय पुरंदरावर देखील अशी नेमणूक केल्याचे १६७० मधील एका पत्रावरून दिसून येते व या बद्दल ३० दाभोळी लारी नेमणूक करून दिल्याचे देखील पत्रातून समजते.

गडावर नेहमीचा अधिकारी वर्ग व सैनिक यांच्याव्यतिरिक्त ब्राम्हण, ज्योतीषी, वैदिक, व्युत्पन्न, रसायन वैद्य, झाडपाल्याचे वैद्य, शस्त्रविद्या, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, लोहार, सुतार, पाथरवट, चांभार असे अनेक प्रकारचे कामगार आवश्यकतेनुसार नेमले जाई. मात्र या कामगारांची सतत गरज पडत नसे. त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुधासह गडावर ठेवून घेतले जाई, जेणेकरून प्रसंगानुसार त्यांची सेवा घेता येईल. तसेच मोकळ्या वेळेत या कर्मचाऱ्यांकडून इतर नैमित्तिक सेवा घेतली जाई. पुढील भागात गडावर आढळणारी विविध शिल्पे समजावून घेऊ. क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)