पृथ्वीराज चौहान - दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट

पृथ्वीराज चौहान हे याच अजमेरच्या चौहान घराण्यातील प्रख्यात सम्राट. पृथ्वीराज चौहान यांच्या आईचे वडील दिल्लीचे तोमर राजे अनंगपाल यांना वारस नसल्याने त्यांनी पृथ्वीराज यांना आपले राज्य दिल्याने पृथ्वीराज दिल्ली व अजमेर या दोन राज्यांचे उत्तराधिकारी झाले.

पृथ्वीराज चौहान - दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारताच्या इतिहासात जे प्रसिद्ध सम्राट होऊन गेले त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सम्राट पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या वीरतेसाठी व उदारतेसाठी ज्ञात आहेतच मात्र त्यांची विशेष ओळख म्हणजे ते दिल्लीचे शेवटचे हिंदू राजे होते.

मान्यखेत अर्थात सध्याच्या मालखेडच्या राष्ट्रकूटांचे साम्राज्य अस्तंगत झाल्यावर भारतात बराच काळ कधीकाळी त्यांची मांडलिक असलेली लहान राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. एकेकाळी भारताचाच भाग असलेल्या अफगाणिस्तानमधील शेवटचे हिंदू राज्य नष्ट होऊन तेथे तुर्कांचे शासन सुरु झाले. या तुर्क घराण्यातील महमूदने भारतावर स्वाऱ्या केल्या. महमूदास पंजाबच्या अनंगपाल या राजाने राजपुतांचे सहाय्य घेऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा पराभव होऊन पंजाबात मुस्लिम राजवट सुरु झाली.

महमूदचा पुत्र मसाऊद याने सतलज नदी पार करून हान्सी हा किल्ला घेऊन थेट बनारसपर्यंत स्वाऱ्या केल्या. कालांतराने तोमर (तुवर) या हिंदू राजवंशाने पुन्हा एकदा आघाडी घेऊन हान्सी किल्ला सोडवून त्याच्या आजूबाजूचा मुलुख आपल्या राज्यास जोडला. पुढे अजमेरच्या बिसलदेव चौहान या राजाने सतलज नदीच्या अलीकडील भाग ताब्यात घेऊन तेथे आपले राज्य स्थापन केले. 

पृथ्वीराज चौहान हे याच अजमेरच्या चौहान घराण्यातील प्रख्यात सम्राट. पृथ्वीराज चौहान यांच्या आईचे वडील दिल्लीचे तोमर राजे अनंगपाल यांना वारस नसल्याने त्यांनी पृथ्वीराज यांना आपले राज्य दिल्याने पृथ्वीराज दिल्ली व अजमेर या दोन राज्यांचे उत्तराधिकारी झाले.

दिल्लीची गादी ही त्याकाळीही भारतातील प्रमुख मानली जात असल्याने दिल्लीच्या गादीवर असणारा राजा सम्राट या नावाने ओळखला जात असे त्यामुळे हे सम्राट्पद आपल्याला मिळावे यासाठी कनोजचा राजा जयचंद राठोड आणि गुजरातचा राजा भीमदेव यांनी हे पद मिळवण्यासाठी पृथ्वीराजशी शत्रुत्व स्वीकारले. पृथ्वीराज चौहान यांचे पिता सोमराज चौहान यांना गुजरातच्या भीमदेवाने युद्धात मारले असल्याने भीमदेवाचा सूड घेण्याची संधी म्हणून अबूच्या राजावर जेव्हा भीमदेव सत्तेच्या जोरावर अमल करू पाहत होता तेव्हा अबूच्या राजाने पृथ्वीराज यांच्याकडे मदत मागितल्यावर त्यांनी भीमदेवावर हल्ला करून त्याचा पराभव केला व वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.

यानंतर बुंदेलखंड येथील महोबाचा राजा परमर्दीदेव यांच्यावर पृथ्वीराजानी स्वारी करून त्याचा पराभव केला. पुढे कनोज येथील राजकुमारी संयोगिता हिचे स्वयंवर असताना पृथ्वीराज यांनी तिच्यासोबत विवाह केल्याने कनोजच्या राजास संताप येऊन त्याचे पृथ्वीराजसोबत कट्टर वैर निर्माण झाले.

अशाप्रकारे शेजारी राज्यांचा पराभव करून स्वतःचे राज्य स्थिर केल्यावर पृथ्वीराज बराच काळ निःश्चिन्त होऊन राज्यकारभार करीत होते. ही संधी पाहून अफगाणिस्तानचा महम्मद घोरी याने ११९१ मध्ये हल्ला करून पृथ्वीराज यांच्या राज्यातील काही ठाणी जिंकली. यानंतर पृथ्वीराज यांनी ससैन्य हल्ला करून महमंद घोरीवर हल्ला केला. स्थानेश्वर येथे मोठी लढाई होऊन घोरीच्या सैन्याचा पराभव झाला आणि पठाण सैन्याने पळ काढला. या युद्धात महम्मद घोरी मात्र पृथ्वीराजांच्या कैदेत सापडला.

कैदेत असलेल्या घोरीने पृथ्वीराज यांच्याकडे जीवाची याचना केल्याने त्यांनी उदारपणे त्यास माफ करून मुक्त केले. मात्र महमंद घोरीस जीवदान देऊन पृथ्वीराजाने जो उदारपणा दाखवला होता तो पुढे त्यांच्याच जीवावर बेतणार आहे अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती कारण महमंद घोरीने ११९२ साली पुन्हा एकदा पराभवाचा वचपा काढण्यासाठी पृथ्वीराज यांच्यावर स्वारी केली. यावेळी महमंद घोरी पूर्ण तयारीनिशी आला होता व पृथ्वीराज चौहान यांस अनेक राजपूत राजांचे सहाय्य्य मिळूनही दुर्दैवाने या युद्धात त्यांचा दारुण पराभव झाला व स्वतः पृथ्वीराज जखमी होऊन घोरीच्या कैदेत सापडले.

या युद्धात पृथ्वीराज शत्रूंच्या हाती सापडल्यावर त्यांचा अंत कसा झाला याविषयी इतिहासकारांनी वेगवेगळी मते मांडली आहेत मात्र पृथ्वीराज यांचे समकालीन चांद भाट यांनी आपल्या पृथ्वीराज रासो या काव्यात जी माहिती दिली जाते ती सर्वाधिक प्रचलित आहे.

अटक केल्यावर पृथ्वीराज यांना घोरीने गझनी या आपल्या राजधानीच्या स्थळी नेले. या ठिकाणी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांचे दोन्ही डोळे काढून घेण्यात येऊन त्यांच्या गळ्यात शंभर मण वजनाची बेडी घातली. चांद भाट जेव्हा ग्रंथाचे लिखाण करून दिल्लीस आला त्यावेळी सर्व दिल्ली शहर उजाड झालेले त्यास कळले व राजास कैद करून गझनीस नेल्याचेही त्यास समजले. 

चांद भाट येथून गझनीस गेला आणि त्याने पृथ्वीराजास भेटण्याची विनंती केली. पृथ्वीराजाची अवस्था पाहून त्यास अतिशय दुःख झाले. शरीराने अतिशय दुर्बल झालेले व नेत्रहीन असे पृथ्वीराज गळ्यात शंभर मण वजनाची बेडी असूनही चांद भाट आल्याचे समजून त्याचे स्वागत करण्यासाठी उभे राहिले व त्यांची गळाभेट घेतली.

ही बातमी शहाबुद्दीन घोरीच्या सैनिकांनी त्यास दिल्यावर घोरी आश्चर्यचकित झाला कारण शंभर मण वजन अंगावर असूनही पृथ्वीराज उभा कसा राहू शकला याचे त्यास नवल वाटले आणि त्याने पृथ्वीराज यांच्या गळ्यात दीडशे मणाची बेडी घालण्याचा हुकूम दिला. मात्र चांद भाट यांनी घोरीस विनंती केली की पृथ्वीराज आता नेत्रहीन झाले आहेत त्यामुळे त्यांना अधिक त्रास न देता व त्यांना जीवे न मारता त्यांच्याकडे ज्या विविध युद्धकला आहेत त्या मनोरंजनाच्या दृष्टीने पाहून आनंद घ्यावा.

पृथ्वीराज हे शब्दवेधी असून त्यांचे शरसंधान अतिशय तीक्ष्ण आहे. ते जरी नेत्रहीन झाले असले तरी शंभर शंभर मण वजनाचे सात तवे त्यांच्यापुढे ठेवले तरी ते त्यांचा अचूकपणे वेध घेतील. हे एकून हा चमत्कार पाहण्यास घोरी उत्सुक झाला मात्र यावेळी चांद भाट याने अशी विनंती केली की सध्या राजा फार अशक्त झाला आहे, त्यास चांगला खुराक काही काळ द्या व त्याच्या गळ्यातील बेडी काढावी यानंतर ते हा चमत्कार चांगल्या पद्धतीने दाखवू शकतील.

चांदच्या विनंतीनुसार पृथ्वीराजास चांगला खुराक मिळू लागला व व त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होऊ लागली. अखेर पृथ्वीराज यांच्या शरसंधानाची कला पाहण्याचा दिवस आला व एका मोठ्या दरबारात हा चमत्कार पाहण्यासाठी राज्यातील अनेकजण आले होते. मात्र यावेळी घोरीने चांद भाटची एक विनंती पाळली नाही व ती म्हणजे पृथ्वीराजास बेडीमुक्त ठेवणे. घोरीने त्यांच्या गळ्यात व पायात शंभर मण वजनाची बेडी घालूनच त्यांना आपली कला दाखवण्यास सांगितले.

दरबारात घोरी एका उंच स्थानी सज्जावर बसला होता व चोहोबाजूस लोकांची गर्दी होती. मध्यभागी एका ठिकाणी सात लोखंडी तवे उंचावर बांधले होते. एकाने तव्यावर खडा मारून आवाज करावा आणि नंतर घोरीने शाबास म्हणून पृथ्वीराजास प्रोत्साहन दिले की पृथ्वीराजाने तिर सोडून त्या तव्यांचा वेध घ्यावा असे ठरले होते.

पृथ्वीराज यांच्या हातापायात बेड्या घालून त्यांना चौकात उभे केले होते आणि बाजूस भाट उभा होता. दोघांच्या आसपास घोरीचे हत्यारबंद शिपाई उभे होते. पृथ्वीराजाने संधान सोडण्यापूर्वी चांद भाट याने आपल्या वीररसपूर्ण कवितेतून पृथ्वीराज यांना पुढीलप्रमाणे संदेश दिला.

चार वंस चोवीस गज, अंगुल अष्ट प्रमाण
ऐते पर सुलतान है, मत चुको चाहुआण

यानंतर चांद भाटाने पुढे म्हटले

रामाने रावणास, अर्जुनाने कर्णास, शंकराने त्रिपुरासुरास व लक्ष्मणाने भ्रमरास ज्या प्रमाणे संधान न चुकवता मारले त्याचप्रमाणे हे सांभराधीश तू आज या तव्यावर शरसंधान कर!

चंदाच्या कवितेतील गर्भार्थ लक्षात येऊन पृथ्वीराज यांनी यानंतर जेव्हा तव्यावर दगडाचा आवाज आल्यावर जेव्हा घोरीने शाबास हा शब्द उच्चरला त्यावेळी पृथ्वीराजाने आपल्या धनुष्याची दिशा फिरवून थेट घोरीच्या मस्तकाचा वेध घेतला आणि घोरीचा अंत झाला.

या नंतर दरबारात हाहाकार माजला आणि घोरीचे सैनिक पृथ्वीराजावर चालून गेले मात्र शत्रूच्या हाताने मृत्यू येण्याऐवजी स्वतःहून प्राण देऊन सद्गतीस प्राप्त होणे श्रेयस्कर हे जाणून चांद आणि पृथ्वीराज यांनी सैनिकांच्या हातातून तलवारी हस्तगत करून एकमेकांची शिरे छेदली आणि दोघेही वीरगतीस प्राप्त झाले. आपली शूरता व उदारता या मुळे भारतातील जनतेच्या आदरास प्राप्त ठरलेले दिल्लीचे शेवटचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा आजही अनेकांना प्रेरणा देत आहे.