सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर

सन १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहिमेत चंद्रराव मोऱ्यांकडील रायरी हा बलाढ्य दुर्ग ताब्यात घेतला. या किल्ल्यामुळे सह्याद्रीच्या मुख्य धारेच्या पूर्व पश्चिमेस असलेले अतिशय जवळचे दुर्ग त्रिकुट अर्थात राजगड, तोरणा व रायगड तीनही स्वराज्यात आले. 

सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर
हिरोजी इंदुलकर

रायगड हा किल्ला राजधानी करण्यापूर्वी महाराजांचा निवास राजगड या बुलंद किल्ल्यात होता. मात्र १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला त्यावेळी महाराजांच्या ताब्यातून घाटमाथ्यावरील बराचसा मुलुख जाऊन कोकणातील मुलुख बराचसा शिल्लक राहिला. 

महाराजांनी उत्तर व दक्षिण कोकण पूर्वीच ताब्यात आणले होते त्यामुळे सह्याद्रीच्या मुख्य धारेत असूनही मुख्य शाखेपासून वेगळा झालेला, बेलाग उंची असलेला, प्रचंड विस्तार असलेला व कोकणात असूनही घाटमाथ्यावरील प्रदेशास जवळ असलेला रायगड किल्ला महाराजांनी राजधानीच्या दृष्टीने निवडला.

पुरंदरच्या तहानुसार औरंगजेबाने महाराजांना आग्र्यास बोलावून दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्याने महाराजांनी पुरंदरचा तह बरखास्त करून गमावलेले किल्ले व मुलुख परत एकदा स्वराज्यात आणण्यास सुरुवात केली.

१६७० मध्ये महाराजांनी रायगडावरून जुन्नरला वेढा दिल्याचा उल्लेख सापडतो याशिवाय याचवर्षी महाराजांनी सुरतेवर दुसरी मोहीम काढली या मोहिमेत हाती आलेली संपत्ती रायगड किल्ल्यावरच नेण्यात आली.

सभासद लिहितात की

रायगड पहाडी किल्ला चांगला. शत्रूची फौज बसावयास जागा नाही. घोडे माणूस जाण्यास महत्संकट. वरकड किल्ले पन्हाळे वैगेरे बहुत पण खुलासेवार व मैदानात. यास्तव आजच्या प्रसंगाला हीच जागा बरी. येथे लवकर उपद्रव होऊ ना शकेल.

मुळात राजधानी होण्यापूर्वी रायगड हे रायरी मामल्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे बांधकामे ही फारशी नव्हतीच त्यामुळे राजधानीस योग्य असे काम येथे निर्माण होणे अतिशय गरजेचे होते आणि यासाठी प्रचंड खर्च येणार होता. रायगडावर जी तळी व इमारती बांधण्यात आल्या त्यांचा खर्च ५० हजार होन इतका झाला. 

यावेळी रायडच्या दुरुस्तीचे व इमारती बांधण्याचे काम दोन लोकांकडे होते ते म्हणजे आबाजी सोनदेव व हिरोजी इंदुलकर. या शिलेदारांनी रायगडावर राजवाडा, अठरा कारखान्यांची ठिकाणे, प्रधान व कारकून यांचे वाडे, सिंहासनाची जागा व सभागृह, मनोरे, पेठ, जगदीश्वर मंदिर, तटबंदी आणि इतर असंख्य इमारती व बांधकामे करवून घेतली.

हे करताना हिरोजी इंदुलकरांनी अगदी पदरचे पैसे सुद्धा स्वराज्याच्या कार्यात खर्ची घालण्यास मागे पुढे पहिले नाही. हिरोजी इंदुलकरांच्या कर्तृत्वाची साक्ष रायगड किल्ल्यावरील दोन शिलालेख आजही देत आहेत यापैकी एक शिलालेख जगदीश्वर मंदिराच्या दरवाज्याच्या उंबरठ्यावर आहे व त्यावर लिहिले आहे. 

सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इटळकर 

कीती मोठा अर्थ होतो या शिलालेखात असलेल्या वाक्यांचा! स्वराज्याच्या सेवेसाठी कायम तत्पर असणारे हिरोजी इंदुलकर आणि खुद्द शिवाजी महाराजांसमोर हा शिलालेख जगदीश्वराच्या मंदिरात लावण्यात आला त्याअर्थी महाराजांच्या लेखी हिरोजी यांचे महत्व किती असेल हे लक्षात येऊ शकेल. 

याशिवाय दुसरा शिलालेख मंदिराच्या  तटबंदीमध्ये बसवण्यात आला आहे जो संस्कृत भाषेत आहे. याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे होतो. 

तीनही लोकांना आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधिश्वर श्रीमत छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ आंनद नाम संवत्सरे शुल्क पक्षाच्या एकादशी तिथीस आश्लेषा नक्षत्र असताना ज्योतिष शास्त्रात कीर्तिमान मानल्या गेलेल्या मुहूर्तावर ज्याच्या सभोवती मनोरे, गजशाळा, विहिरी, तळी, ऊंच राजवाडे आहेत अशा या वाणीस अवर्ण्य अशा रायगडावर हिरोजीने निर्माण केला असून तो यावतचंद्र पृथ्वीतलावर खुशाल नांदो.

या दोन शिलालेखांतून हिरोजी यांची कीर्ती समोर येते व आजही हे दोनही शिलालेख शिलालेखात वर्णित केल्याप्रमाणेच पृथ्वीतलावर नांदत आहेत. 

हिरोजी इंदुलकरांची कौंटुंबिक माहिती फार मिळत नाही मात्र एका शाहूकालीन वतन पत्रात त्यांच्या मुलाचे नाव जानोजी असल्याचा उल्लेख आहे याशिवाय त्यांचे गाव इंदुलकर, मौजे करंजे, जिल्हा सातारा असावे.

पूर्वी इंदुलकर गावाची वतनदारी संभाजी इंदुलकर यांच्याकडे होती मात्र पुढे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला व वाढते वय व कर्ज यामुळे कंटाळून ते रायगडास शिवाजी महाराजांना भेटले यावेळी हिरोजी इंदुलकर रायगड किल्ल्यावरच होते.

महाराजांनी हिरोजी यांना विचारले कि तुम्ही संभाजी इंदुलकरांचे कर्ज माफ करत असाल तर त्यांचे वतन विकण्यास ते तयार आहेत यानंतर संभाजी यांचे कर्ज हिरोजी यांनी फेडून टाकले व इंदुलकर येथील वतन पुढे स्वतः चालवले.

तर ही होती रायगडचे वास्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांची माहिती. या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे मात्र रायगड किल्ल्यावर आजही दिमाखात उभे असलेले दोन शिलालेख व इमारती खऱ्या अर्थी हिरोजी इंदुलकरांच्या कर्तृत्वाची स्मारके आहेत.