घाशीराम कोतवाल - उत्तर पेशवाईतील गाजलेली घटना
घाशीराम कोतवाल हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील रहिवाशी असून कनोज (कान्यकुब्ज) ब्राह्मण होता.
उत्तर पेशवाईतील एक गाजलेले प्रकरण म्हणजे घाशीराम कोतवाल प्रकरण. हे प्रकरण नक्की काय होते त्याविषयी या लेखातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. घाशीराम कोतवाल हा मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील रहिवाशी असून कनोज (कान्यकुब्ज) ब्राह्मण होता.
घाशीरामच्या वडिलांचे नाव शामलदास होते. पुणे येथे पेशव्यांचे स्थान असल्याने तेथे जाऊन काहीतरी नोकरी किंवा व्यापार करून उपजीविका करता येईल हा विचार करून घाशीराम पुण्यास आला.
घाशीरामचा स्वभाव हा हुशार व वागणे गोड असल्याने त्यास थेट पेशवे दरबारात नोकरी मिळवली. या काळात नाना फडणवीस यांचे प्रस्थ दरबारी होते. नाना फडणवीस यांच्या नजरेत घाशीराम कोतवालची हुशारी भरली व त्यावर मर्जी बसून १७८२ साली घाशीरामाची थेट पुण्याच्या कोतवालपदी बढती झाली.
घाशीरामाने कोतवाली खाते हाती घेल्यावर ते सुधारण्याचा प्रयत्न केला व गुप्त पोलीस ही सध्या प्रसिद्ध असलेली कार्यपद्धती सुरु केली. शहरातील फितूर व बंडखोरांवर घाशीरामाने आपली करडी नजर ठेवली होती. घाशीराम कोतवाल हा नाना फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याने नानांचे शत्रू म्हणजे मुख्यतः रघुनाथराव इत्यांदीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी घाशीरामच्या कोतवाली खात्याचा खूप फायदा झाला.
घाशीराम हा दिसायला सुस्वरूप, बुद्धीने हुशार आणि उत्कृष्ट वाकपटू असल्याने आपले काम काढून घेण्यात तरबेज असे. घाशीराम च्या कोतवालाच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने शहरात कायदा व सुव्यवस्था बऱ्यापैकी सुधारली मात्र त्याची काम करण्याची शैली काही वेळ अन्यायकारकही असे. गेली काही वर्षे 'घासीरामी जुलूम' नावाची जी म्हण वापरात आहे ती यामुळेच.
सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नात घाशीरामाने चोख बंदोबस्त ठेवला होता असे उल्लेख सापडतात. घाशीरामच्या प्रदीर्घ अशा पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने गुन्ह्याच्या यादीत काही अशा खाजगी स्तरावरील गुन्ह्यांची भर घातली की जनमत त्याच्याविरोधात थोडे संतप्त होऊ लागले होते.
पुढे एक अशी घटना घडली ज्यामुळे घाशीरामाविरोधात पुण्यातील एका गटाचा रोष अधिकच उफाळून आला व या रोषात त्याला स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले व ती घटना पुढीलप्रमाणे घडली.
त्यावेळी पुण्यात अदमासे ३५ तेलंगी ब्राह्मण आले होते व तेथून आपले कार्य झाल्यावर ते पुन्हा आपल्या गावास जाण्यास पुण्याहून निघाले होते. जाता जाता ते घाशीराम कोतवालाच्या तळ्यावर गेले आणि संध्याकाळी तिथे स्वयंपाकास लागून रात्रीचे भोजन केले. भोजन झाल्यावर त्यांनी आवराआवरी सुरु केली त्याच वेळी घाशीराम कोतवालाच्या खात्यातील पाच सात माणसे तेथे आली व सर्वांना पकडून भवानी पेठेतील चावडीत खणांचे एक भुयार होते त्यामध्ये डांबून टाकले.
भुयार हे चारही बाजुंनी बंदिस्त होते व हवा येण्यासाठी जागा नाही अशा ठिकाणी पस्तीस ब्राह्मणांना दोन दिवस सलग कोंडण्यात आल्याने त्यातील एकवीस ब्राह्मणांचा गुदमरून मृत्यू झाला. तिसऱ्या दिवशी मानाजी फाकडे यांनी भुयाराचे दार उघडले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मानाजींनी ही बातमी पेशव्यांना कळवली. पेशव्यांनी नाना फडणीस यांना घाशीरामाची चौकशी करण्यासाठी पाठवले व योग्य ती शिक्षा करण्यास सांगितले. नाना फडणीसांनी भटजी तात्या म्हणून एक गृहस्थ होते त्यांना घाशीरामची चौकशी करण्यास सांगितले.
भटजी तात्यांनी नाना फडणीसांच्या आदेशानुसार घाशीरामची चौकशी सुरु केली आणि विचारले की ब्राह्मणांना का कोंडले आणि त्यांना मारावयाचे कारण काय होते? यावेळी घाशीरामाने सांगितले की ती लोक चोर समजून माझ्या खात्यातील लोकांनी कोंडली आणि त्यातील काही जण अफू खाऊन मेले. यात माझा काहीच दोष नाही.
घाशीरामाची चौकशी सुरु असताना संपूर्ण पुण्यात ही बातमी पोहोचली आणि बघता बघता नाना फडणीसांच्या वाड्याच्या बाहेर पंधराशे ब्राह्मण जमले आणि नानांवर घाशीरामास कायम पाठीशी घालण्याचा आरोप करू लागले. हे पाहून नानांनी घाशीरामास हत्तीच्या पायाशी बांधून शहरभर फिरवण्याची सूचना केली. यानंतर तब्बल पंधरा वर्षे पुण्याचे कोतवाली हे प्रतिष्ठित खाते सांभाळणाऱ्या घाशीरामाची हत्तीच्या पायाशी बांधून धिंड काढण्यात आली.
घाशीरामची एवढी विटंबना होऊनही विरोधकांचे समाधान होईना व ते नाना फडणीसांच्या वाड्यासमोर जाऊन आम्ही घाशीरामला जीवे मारल्याशिवाय शांत बसणार नाही अशा घोषणा करू लागले. विरोधकांच्या दबावापुढे नाना फडणीस झुकले व घाशीरामला त्यांच्या ताब्यात देण्याचे निश्चित झाले.
यानंतर बाळाजीपंत केळकर यांनी घाशीरामाची बेडी सोडली आणि त्यास उंटावर उलटे तोंड करून बांधले आणि ज्या ठिकाणी घाशीरामाने पंधरा वर्षे पुण्याचा कायदा सांभाळला त्याच कोतवाल चावडीवर आणले आणि पांच पाट काढून शेंदूर त्याच्या डोक्यास लावला आणि पुन्हा उंटावर ठेवून पुण्यातल्या आठ पेंठमध्ये त्याची धिंड काढण्यात आली.
यानंतर घाशीरामास गारपिरावर आणण्यात आले आणि विरोधकांना सांगण्यात आले की आता तुमच्यावर सगळे आहे, तुम्हास हवे तर घाशीरामास सोडा किंवा मारा असे सांगून घाशीरामास जमावाच्या ताब्यात देण्यात आले.
यानंतर संध्याकाळच्या दरम्यान जमलेल्या जमावाने घाशीरामाची दगडाने ठेचून ठेचुन हत्या करून टाकली. घाशीरामाच्या बद्दल जमावाच्या मनात एवढा राग होता की त्याच्या प्रेतासही अग्नी देण्यात आला नाही. यानंतर घाशीरामच्या हाताखालील लोकांना व त्याच्या जीवनराम आणि सखाराम या दोन मुलांना कैद करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
या घटनेचे काही समकालीन लेखक म्हणतात की घाशीरामास मुळात या प्रकारची काहीही कल्पना नव्हती व ज्यावेळी त्याची चौकशी झाली त्याचवेळी त्यास समजले होते की आपल्या लोकांच्या हातून निष्पाप लोकं मारली गेली आहेत. मात्र घाशीरामच्या दुर्दैवाने त्याला स्वतःचा बचाव देखील करता आला नाही व पंधरा वर्षे पुण्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवणारा घाशीरामचं आपल्या अजाणते पणाने केलेल्या गुन्ह्यामुळे जनप्रक्षोभाचा बळी ठरला.