सारागढी युद्ध - जेव्हा हजारो पठाणांना २१ भारतीय भारी पडले

सरहद्द प्रांतावरील असेच एक ठाणे होते ज्याचे नाव होते सारागढी. गढीचा अर्थ छोटा भुईकोट असा होतो. याकाळी म्हणजे १८९७ साली सारागढी येथे शिख सैनिकांची एक तुकडी होती आणि तिची संख्या किती? तर फक्त २१.

सारागढी युद्ध - जेव्हा हजारो पठाणांना २१ भारतीय भारी पडले

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सन १८९७! त्याकाळी इंग्लंडसारख्या अतिशय छोट्या देशातून आलेल्या गोऱ्यांनी संपूर्ण भारतखंडाचा कब्जा घेतला होता. १८५७ साली भारतातून कंपनीराज गेले आणि ब्रिटीशराज आले. खरं तर  कंपनी राज काय किंवा ब्रिटिश राज काय दोन्ही राज्ये ही इंग्लंडचीच!

त्याकाळी पाकिस्तान हे राष्ट्र उदयास आले नसल्याने भारताच्या शेजारी असलेले राष्ट्र होते अफगाणिस्तान. त्याकाळी अफगाणिस्तानात पठाण टोळ्यांचे वर्चस्व होते व बऱ्याचदा हे टोळीवाले भारताच्या हद्दीत शिरून उपद्रव करीत.

हे टोळीवाले लुटालूट करताना कुठलाही विधिनिषेध पाळत नसत. हिंदुस्थानातील नागरिकांच्या बायका व पोरे आणि गुरे ढोरे सुद्धा पळवायला हे मागेपुढे पाहत नसत त्यामुळे या प्रांताची संरक्षण व्यवस्था मजबूत असणे ही काळाची गरज होती. भारत व अफगाणिस्तानच्या सीमेस तेव्हा वायव्य सरहद्द प्रांत असे म्हणत.

या सरहद्द प्रांताच्या रक्षणाकरिता मग ब्रिटिशांनी काही ठाणी उभारली. ही ठाणी सीमेवर काही मोक्याची ठिकाणे हेरून उभारण्यात आली होती. या ठाण्यांमध्ये समोरील मुलुखातील हालचालींवर नजर ठेवता यावी म्हणून एक उंच असा टॉवर (बुरुज) असे. शिवशाहीत जसे किल्ल्यांच्या बुरुजांचा संदेशवहनासाठी उपयोग केला जात असे तीच पद्धत उचलून या बुरुजांवरून सुद्धा निशाण अथवा आरशाच्या प्रकाशाने संदेश पाठवला जात असे. टोळीवाले पठाण अतिशय तरबेज व क्रूर असल्याने या ठाण्यावरून अतिशय सावधतेने व जागरूकतेने पहारा द्यावा लागत असे.

सरहद्द प्रांतावरील असेच एक ठाणे होते ज्याचे नाव होते सारागढी. गढीचा अर्थ छोटा भुईकोट असा होतो. याकाळी म्हणजे १८९७ साली सारागढी येथे शिख सैनिकांची एक तुकडी होती आणि तिची संख्या किती? तर फक्त २१..

२१ ही संख्या एका लष्करी ठाण्याच्या दृष्टीने अल्प होतीच मात्र या २१ जणांमधील बहुतांश सैनिक हे नुकतेच सैन्यात भरती झालेले व फारसा अनुभव नसलेले १८-२० वर्षांचे कोवळे युवक होते. मात्र या २१ जणांत दोघे जण असे होते ज्यांना सैन्याचा जुना अनुभव होता व त्या दोघांची नावे होती हवालदार ईशरसिंग आणि सिग्नलर गुरुमुख सिंग!

बरोबर १८९७ सालीच सरहद्दीवरील पठाणी टोळीवाल्यांनी उठाव केला होता आणि हे टोळीवाले सुद्धा एका लष्करासारखेच असायचे. बघता बघता एका भयाण सायंकाळी हजारोच्या संख्येत असलेल्या टोळीवाल्यांनी थेट सारागढीस वेढा घातला.

सारागढी मध्ये यावेळी फक्त २१ सैनिक असल्याने हजारो पठाणांसोबत लढण्यासाठी जादा कुमकेची आवश्यकता होती त्यामुळे गढीच्या पूर्व दिशेला काही अंतरावर असलेल्या लॉकहार्ट आणि गुलिस्तान या दोन ठाण्यांवरून जादा कुमक मागवण्यात आली. असे असले तरी पठाण लष्कर अगदी टप्प्यात आल्याने कुमक येईपर्यंत गढीचा वेढा लढवणे गरजेचे होते. 

वेढा संध्याकाळी सुरु झाल्याने अंधार झाल्यावर गढीतील २१ सैनिक अंधाराचा फायदा घेऊन शत्रूला चकवा देऊन मागील बाजूने आरामात निसटू शकले असते मात्र कर्नल यांनी हुकूम केला की गढीवर शेवटचा सैनिक असेपर्यंत गढी लढवली जायला हवी आणि आम्ही तुम्हाला लवकरच कुमक पुरवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे हवालदार इशरसिंग याने आम्ही शेवटपर्यंत गढी लढवू असे वचन कर्नलला दिले.

बघता बघता बाहेरून पठाण टोळीवाल्यांनी गढीवर जोरदार गोळीबार सुरु केला मात्र आतील दारुगोळा मर्यादित असल्याने तेवढ्याच जोराने आतील २१ सैनिक टोळीवाल्यानां प्रतिकार करू शकत नव्हते. एकतर अंधाराचे सावट सुद्धा आसमंतात असल्याने बेछूट गोळीबार न करता एक गोळी जरी सोडली तर एक तरी टोळीवाला जमीनदोस्त झालाच पाहिजे अशा बेताने गोळ्या सोडा असा आदेश हवालदार ईशरसिंग याने जवानांना दिला. 

एकवेळ तर सैनिकांमध्ये अशीही चर्चा झाली की आपण लढायचे तरी कुणासाठी? या ब्रिटिशांची जे बाहेरून येऊन आपल्यावर राज्य करून बसले आहेत आणि गरजेच्या वेळी फक्त २१ जणांना धोक्यात घालून स्वतः अलिप्त होऊन बसले आहेत. त्यापेक्षा या वेढयातून निसटून गेलेले केव्हाही चांगले. 

मात्र हवालदार ईशरसिंग याने सैनिकांना गुरु गोविंदसिंग यांच्या शिकवणीची आठवण करून दिली आणि म्हणाले की आपण येथे ब्रिटिशांसाठी नाही तर आपल्या मायभूमीसाठी लढत आहोत आणि गुरु गोविंदसिंग यांनी शिखांना लढताना पाठ दाखवून पाळण्याचा नाही तर छातीवर घाव झेलून लढण्याचा संदेश दिला आहे. हवालदार ईशरसिंग याचे ते उत्स्फूर्त विचार ऐकून बाकी २० शिखांमध्ये हजारोंची शक्ती संचारली व त्यांनी या संकटास धैर्याने तोंड देण्याचे ठरविले आणि रात्रभर गढी लढवली.

पहाट झाली आणि सर्व काही स्पष्ट दिसू लागले. सरहद्द प्रांत हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे आसमंतात पसरलेल्या डोंगरांवर गढीतल्या सैनिकांनी नजर टाकली तर डोंगरांमध्ये हजारो संख्येने टोळीवाले स्पष्ट दिसू लागले. आता गढीतील दारुगोळा संपण्याच्या मार्गावर होता त्यामुळे लवकरात लवकर बाहेरून कुमक यावी यासाठी गुरुमुखसिंग गढीच्या बुरुजावर गेला आणि तेथून त्याने आरशाच्या साहाय्याने लॉकहार्ट या ठाण्यावर संदेश धाडला की आम्ही मागील ३० तास या क्रूर पठाणांसोबत लढतोय पण आता येथील दारुगोळा कमी पडत आहे तेव्हा फार उसंत न लावता लवकरात लवकर दारुगोळा व कुमक पाठवण्याची तजवीज करावी.

पण लॉकहार्ट वर असलेल्या कर्नलने तेथून उलट निरोप धाडला की येथे सर्वच परिसरात जागोजागी टोळीवाले पसरले आहेत त्यामुळे दारुगोळा आणि कुमक पाठवता येणार नाही मात्र तुम्ही गढी अजिबात न सोडता ती लढवायलाच हवी. कर्नलच्या उत्तराने भडकलेल्या गुरुमुखसिंग यांनी हवालदार ईशरसिंग यांना कर्नलचा निरोप सांगितला तेव्हा हवालदार ईशरसिंग यांनी गुरुमुखसिंग यांना सांगितले की कर्नलला सांग की तुला काळजी करण्याची गरज नाही, आम्ही गढी लढवू.

दिवस पूर्णपणे उजाडल्यावर टोळीवाल्यांनी थेट गढीवर आक्रमण केले यावेळी ईशरसिंग यांनी सर्व सैनिकांना हुकूम केला की गोळ्या वाया ना घालवता त्यांच्यातले म्होरके टिपून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करा. सर्व सैनिक जो बोले सो निहाल, सत श्री अकाल चा गजर करून शत्रू सैन्यावर तुटून पडले. सहा तास चकमक सुरु होती. बघता बघता दोनशे टोळीवाले सैनिकांनी संपवले मात्र २१ सैनिकांपैकी १४ सैनिक लढता हुतात्मा झाले होते आणि फक्त ७ सैनिकच उरले होते.

गुरुमुखसिंग हे संदेश पाठवण्यासाठी टॉवर वर उभे असल्याने लढायला ईशरसिंग आणि इतर पाच एवढेच सैनिक उरले होते. येथे गढीच्या चारही बाजुंनी सहा हजार टोळीवाल्यांचा वेढा पडला होता. सारागढीतील सहा जणांविरुद्ध लढायला बाहेर सहा हजार जण होते, किती विचित्र पेचप्रसंग निर्माण झाला होता पहा..

ईशरसिंग यांनी या पाच सैनिकांना जवळ बोलावले आणि म्हणाले की आपण शीख म्हणजे सिंह आहोत आणि मनात आणले तर आपण सहाजण या सहा हजारांना सुद्धा पुरून उरू. गुरु गोविंदसिंग काय म्हणाले होते माहित आहे ना? की एक शीख सव्वा लाख लोकांशी लढू शकतो..येथे तर फक्त सहा हजार आहेत.

बघता बघता हे सहा सैनिक टोळीवाल्यांशी पुन्हा एकदा भिडले आणि एक एक टोळीवाल्यास जमीनदोस्त करू लागले. टोळीवाले या प्रतिकाराने बिथरले कारण सकाळी सुरु झालेली लढाई दुपार होऊन गेली तरी संपत नव्हती त्यामुळे सायंकाळ उजाडली आणि कुमक येऊन पोहोचली तर सारागढी घेणे शक्य होणार नाही त्यामुळे गढीच्या आजूबाजूंना असलेल्या झुडुपांना त्यांनी आग लावून दिली. झुडुपांना आग लागल्याने धुराचा लोट चारही बाजूनी उठला. यानंतर टोळीवाल्यांनी बाजांवर दोन फूट जाडीचे चिखलाचे थर लावले आणि ते बाजे ढालीसारखे पुढे करून गढीत शिरण्याचा प्रयत्न करू लागले जेणेकरून जर वरून गोळी आली तर ती बाजावर लागेल.

बाजाचा वापर करून बघता बघता टोळीवाले गढीच्या तटबंदीच्या पायथ्याशी पोहोचले. आता आणीबाणीचा प्रसंग ओढवला त्यामुळे इशारसिंग याने गुरुमुख सिंग द्वारा लॉकहार्ट वर कर्नलला शेवटचा संदेश पाठवला की की दारुगोळा संपला असून फक्त ७ जण शिल्लक आहेत, आता पुन्हा संदेश पाठवणार नाही. कर्नल शेवटी ब्रिटिशच त्याने एक कोरडा संदेश पाठवला की आमचा नाईलाज आहे!

टोळीवाले आता तटावर येऊन पोहोचले होते आणि गुरुमुख सिंग बुरुजावर उभे होते. हवालदार ईशरसिंग आपल्या पाच साथीदारांसहित धान्य कोठारात निर्णायक लढाईची तयारी करीत होता. ईशरसिंग पाच जणांना म्हणाला की दारुगोळा हा संपलेला आहे, टोळीवाले आता किल्ल्यात शिरले आहेत त्यामुळे ही आपली निर्णायक लढाई आहे, कदाचित या लढाईत आपण सहाही जण वाचू शकणार नाही मात्र इतिहास आपली नोंद घेईल. 

टोळीवाले किल्ल्यात शिरले आणि त्यांनी धान्यकोठारास आग लावली. याचवेळी सहाही वीरांनी बंदुकीवर संगिनी लावल्या आणि एखाद्या सिंहासारखे सहाही जण धान्यकोठाराच्या बाहेर येऊन टोळीवाल्यांवर तुटून पडले. गर्दी झाली आणि या गर्दीत गनिमांना मारता मारता सहाही शीख सैनिक मरण पावले. 

आता फक्त एक सैनिक वाचला होता तो म्हणजे गुरुमुखसिंग! त्याने बुरुजावरून कर्नलला शेवटचा संदेश पाठवला आणि आता कृपया पुढील संदेश मला पाठवता येणार नाही असे कर्नलला सांगितले. संदेशाचा आरसा पेटीत ठेवला आणि बंदुकीस संगीन लावून बुरुजावरून खाली उतरू लागला मात्र घाबरलेल्या पठाणांनी गुरुमुखसिंग खाली येण्याअगोदरच बुरुजास आग लावून दिली आणि गुरुमुखसिंग यास बुरुजाच्या आतमध्येच कोंडून टाकले. मरता मारता गुरुमुखसिंगाने केलेली जो बोले सो निहाल, सत श्री अकाल ही सिंहगर्जना पूर्ण परिसरात दणाणली..अशा प्रकारे सारागढीतील हे शूर २१ सैनिक एक एक करून शाहिद झाले.

भारतीय सेनादलाच्या इतिहासात सारागढीचा हा पराक्रम सुवर्णाक्षरात लिहिला गेला आहे आणि या दिनाची स्मृती म्हणून भारतीय सेनेच्या शीख पलटणीस आजही या दिनानिमित्त सुट्टी असते.