मुरार जगदेव यांचा इतिहास

आदिलशाही दरबारात दौलतखान (खवासखान) नावाचा जो मुख्य वजीर होता त्याचे कारभारी म्हणून मुरार जगदेव काम पाहत होते. दौलतखानास खवासखान ही पदवी असल्याने इतिहासात याचे नाव खवासखान म्हणूनच येते.

मुरार जगदेव यांचा इतिहास
मुरार जगदेव

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या काळातील एक मोठे राजकीय नाव म्हणजे मुरार जगदेव. शहाजी महाराजांच्या कारकिर्दीचा अभ्यास करताना हे नाव अनेकदा वाचनात येत असते.

मुरार जगदेव हे आदिलशाही राज्यातील त्याकाळातील एक मोठे सरदार होते. यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम हे गाव होते. मुरार जगदेव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात इब्राहिम कुतुबशाहाच्या दरबारी १५८० साली केली असे इतिहासकारांचे मत आहे कारण त्याकाळातील कुतुबशाही साधनांत मुरारिपंडित हे नाव अनेकदा आढळते. 

मुरार यांचे वडील जगदेवराव यांनी दौलतखान कुतुबशाहास राज्याच्या गादीवर बसवले होते.  मुरार जगदेव यांना मुरार पंडित या नावानेही ओळखले जात असे व त्यांना त्याकाळी महाराज राजाधिराज मुरारिपंडित साहेब ही पदवी प्राप्त होती. मुरार जगदेवांची जी दानपत्रे उपलब्ध आहेत त्यामध्ये धर्मावतारी राजाधिराज महाराज राजश्री पंडित मुरारी जगदेकप्रभू सार्वभौमप्रतिनिधी हे बिरुद आढळते .

आदिलशाही दरबारात दौलतखान (खवासखान) नावाचा जो मुख्य वजीर होता त्याचे कारभारी म्हणून मुरार जगदेव काम पाहत होते. दौलतखानास खवासखान ही पदवी असल्याने इतिहासात याचे नाव खवासखान म्हणूनच येते.

मोगल बादशाह शाहजहानने जेव्हा दक्षिणेकडील राज्ये जिंकण्याची मोहीम सुरु केली त्यावेळी दक्षिणेतील निजामशाही व आदिलशाही परस्परांबरोबर भांडत होत्या. या धामधुमीच्या काळात आदिलशहाकडून मुरार जगदेव व रणदुल्लाखान यांना पुण्यास पाठवण्यात आले.

पुणे हे त्याकाळी निजामशाही राज्यातील एक प्रमुख तटबंदीयुक्त शहर असून येथे शहाजी महाराजांचे मुख्य ठाणे होते. मुरार जगदेव यांनी पुण्याचा निजामशाही कोट नष्ट करून शहाजी महाराजांचे वाडे जाळले आणि प्रचंड लूट केली. यावेळी त्यांनी पुण्यावर आदिलशाही अमल सुरु झाला आहे हे दाखवण्यासाठी पुण्याच्या मूळ कसब्यात जाळपोळ करून तेथे गाढवाचा नांगर फिरवला आणि या ठिकाणी पुन्हा कुणीही वास्तव्य करू नये असा इशारा दिला.  पुण्यास जाळपोळ केल्यावर मुरार जगदेव यांनी भुलेश्वर येथे दौलत मंगळ हा किल्ला बांधून तेथून पुणे प्रांतावर आदिलशाही अमल सुरु केला. 

१६३१ साली कुतुबशहाने आदिलशहाच्या राज्यातील काही भागावर हल्ला करून मुलुख बेचिराख केला यावेळी त्यांनी कोलस शहरास वेढा दिला. यावेळी आदिलशाही सरदार बाबाजी काटे यांच्या मदतीस आले मात्र पुढे ते फितूर होऊन कुतुबशाहास मिळाले आणि अखेरीस आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्यामध्ये मोगलांविरुद्ध एकत्र लढणाच्या बोलीवर तह झाला.

१६३२ साली शहाजहानने परांड्यावर स्वारी केली तेव्हा आदिलशहाने मुरार जगदेवांना सरलष्कर म्हणून मोहिमेवर पाठवले. यावेळी त्यांनी परांडा किल्ला घेऊन तेथील मुलुख मैदान ही अजस्त्र तोफ विजापुरास नेली. 

१६३३ मध्ये कुतुबशाहच्या बहिणीचे लग्न मोहम्मद आदिलशाह सोबत झाले त्यावेळी ही युती जुळवण्यामागे मुरार जगदेव यांची महत्वाची भूमिका होती. लग्न समारंभ झाल्यावर वऱ्हाड विजापूर येथे आले असता यांची रवानगी लगेच दौलताबादच्या (देवगिरी) वेढ्यावर करण्यात आली मात्र या वेढ्यात आदिलशाही सरदारांमध्ये फूट पडल्याने हा वेढा फारसा यशस्वी झाला नाही.

याच दरम्यान शहाजी राजांनी भीमगड (पेमगिरी) येथून निजामशहाच्या वारसास गादीवर बसवून त्याच्या नावाने निजामशाही कारभार हाती घेतला त्यावेळी या कारभारास समर्थन देण्यास आदिलशहाकडून मुरार जगदेव आदिलशाही सैन्यासह उपस्थित होते. या प्रसंगावरून हे लक्षात येते की या काळात झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाऊन शहाजीराजे व मुरार जगदेव यांच्यात सलोख्याचे नाते निर्माण झाले होते.

१६३० साली मुरार जगदेव यांनी पुण्याची जाळपोळ करून गाढवाचा जो नांगर फिरवला होता ती गोष्ट विसरून शहाजी राजे व मुरार जगदेव यांच्यात मैत्री झाल्यावर या गटात खवासखान, रणदुल्लाखान, कान्होजी जेधे हे सुद्धा सामील झाले व या सर्वांची मैत्री दीर्घकाळ टिकली. शहाजीराजांनी निजामशाहीचा कारभार सुरु केल्यावर त्यांच्या मदतीसाठी मुरार जगदेवांनी अंबरखान याची सहा हजार सैन्यासह नेमणूक केली व तेथून विजापूरकडे जात असताना भीमा व इंद्रायणी संगमावर वसलेल्या नागरगावं येथे अमावस्या व सूर्यग्रहण असताना स्वतःची सुवर्णतुला करवून घेतली. या ठिकाणी मुरार जगदेवांची तुळा झाल्याने या गावाचे पुढे तुळापूर असे नामकरण झाले. 

तुळापूर येथे संगमेश्वराचे मंदिर आहे ते सुद्धा त्याच दरम्यान मुरार जगदेवांनी बांधले होते. खवासखान आणि मुरार जगदेव ही जोडी शहाजी राजांच्या सलोख्यात असली तरी मोहम्मद अदिलशाहाच्या डोळ्यात दोघांचे वाढते वर्चस्व खुपत होते. याचवेळी आदिलशाही राज्यातील यादगिरीच्या इमामखानाने बंड केले त्यावेळी खवासखान व मुरार जगदेव यांची युती फुटावी यासाठी  मुरार जगदेव यांना मुद्दाम या मोहिमेवर पाठवून आदिलशहाने खवासखानापासून मुद्दाम वेगळे पाडले. इमामखानविरोधातील युद्धात मुरार जगदेवांचा पराभव झाला व खऱ्या अर्थी त्यांचे वर्चस्व नष्ट झाले.

दुसरीकडे आदिलशहाने सिद्दी रेरेहान यास आदेश देऊन आदिलशाही वजीर खवासखानाची हत्या करवून आणली आणि आधीच पराभूत व हतबल अशा मुरार जगदेवांना अटक करून विजापुरास आणले गेले. खवासखानाचा मृत्यू आणि स्वतःस झालेली अटक यामुळे उद्दिग्न झालेल्या मुरार जगदेवांनी अदिलशाहास खडे बोल सुनावल्यामुळे मुरार जगदेवांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आणि खवासखानाच्या मृत्यूनंतर एका महिन्यातच मुरार जगदेवांची जीभ कापून त्यांची गाढवावरून धिंड काढली गेली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 

अशा प्रकारे आपल्या कारकिर्दीत अनेक सन्मान पाहिलेल्या शिवपूर्वकाळातील एका मोठ्या प्रस्थाचा दुर्दैवी अंत झाला. ज्यांच्या करवी आदिलशहाने पुणे शहरावर गाढवाचा नांगर फिरवून घेतला होता त्यांचीच पुढे आदिलशहाने गाढवावरून धिंड काढून हत्या केली हा एक दुर्दैवी योगायोग होता मात्र मुरार जगदेवांनी पुढे शहाजी महाराजांस कायम दिलेली साथ ही सुद्धा तेवढीच मोलाची होती त्यामुळे शहाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना मुरार जगदेवांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते.