गोपिकाबाई पेशवे यांची माहिती

गोपिकाबाईंचे घराणे हे संपन्न असल्याने त्यांना लहानपणापासून सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले होते व शिक्षण घेता घेता त्या राजकारणातही लक्ष देऊ लागल्या होत्या.

गोपिकाबाई पेशवे यांची माहिती
गोपिकाबाई पेशवे

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशवे पदाची जबाबदारी ज्या भट घराण्यावर आली त्या घराण्यातील ज्या स्त्रिया राजकारणात कुशल होत्या त्यापैकी एक नाव म्हणजे गोपिकाबाई पेशवे. 

गोपिकाबाई पेशवे या बाळाजी विश्वनाथ यांचे नातू व बाजीराव बल्लाळ यांचे थोरले पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी. गोपिकाबाई या भिकाजी रास्ते या मोठ्या सावकाराच्या कन्या असून त्यांचा जन्म १७२५ मध्ये झाला होता. 

भिकाजीराव रास्ते हे स्वराज्य कार्यात आपल्या सावकारीच्या माध्यमातून अर्थ पुरवठा करणाऱ्यांपैकी एक असल्याने त्यांच्यावर छत्रपतींची मर्जी होती आणि त्यांचे वास्तव्य सातारा जवळील वाई येथेच असल्याने शाहू महाराजांची व त्यांची भेट अनेकदा होत असे. 

वाई मध्ये भिकाजीरावांचा मोठा वाडा होता व एका दिवाळीत भिकाजीरावांनी छत्रपती शाहू महाराजांना मेजवानीचे आमंत्रण दिले होते व त्यानुसार शाहू महाराज रास्ते यांच्या वाड्यावर आले त्यावेळी त्यांनी गोपिकाबाईंस पाहिले व बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब यांच्यासाठी ही कन्या अनुरूप आहे असे वाटून त्यांनी स्वतःच गोपिकाबाईंचे लग्न नानासाहेब यांच्याशी ठरवून थाटामाटात दोघांचा विवाह संपन्न केला.  नानासाहेब आणि गोपिकाबाई यांचा विवाह सोहळा वाई येथे १० जानेवारी १७३० च्या सुमारास संपन्न झाला.

गोपिकाबाईंचे घराणे हे संपन्न असल्याने त्यांना लहानपणापासून सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले होते व शिक्षण घेता घेता त्या राजकारणातही लक्ष देऊ लागल्या होत्या. लग्न झाल्यावर नानासाहेब जेव्हा एखाद्या मोहिमेवर जात त्यावेळी अनेकदा गोपिकाबाई सुद्धा सोबत जात आणि त्याकाळी शिकार हा एक मोठा छंद मानला जात असे व या शिकारीच्या वेळी सुद्धा गोपिकाबाई नानासाहेब यांच्यासहित असत. 

प्रयाग येथे नानासाहेबांनी जी मोहीम काढली होती त्यावेळी सुद्धा गोपिकाबाई यांच्यासहित होत्या मात्र या मोहिमेवेळी त्यांना दोन तीन महिन्यांचा गर्भ राहिल्याचे समजताच त्यांना परत पुण्यास पाठवण्यात आले व कालांतराने त्यांना एक पुत्र झाला व तो पुत्र म्हणजे पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडलेला विश्वासराव होय.

गोपिकाबाई यांना विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव असे तीन पुत्र होते मात्र दुर्दैवाने आपल्या डोळ्यासमोर तिन्ही पुत्रांना आलेले मरण त्यांना बघावे लागले होते. नानासाहेब व सदाशिवराव (चिमाजी अप्पा यांचे पुत्र) हे चुलत बंधू असले तरी दोघांचे प्रेम सख्ख्या भावांपेक्षाही अधिक होते मात्र गोपिकाबाई या राजकारणी स्वभावाच्या असल्याने त्यांचा सदाशिवरावांना अंतर्गत विरोध असे.

ज्येष्ठ पुत्र विश्वासराव यांना पेशवेपद प्राप्त होण्यात सदाशिवराव भाऊ अडथळा ठरू शकेल अशी भीती वाटत असल्याने गोपिकाबाईंनी पानिपतच्या मोहिमेवर सदाशिवराव यांनी एकटे न जाता विश्वासराव यांनीही जावे असा हट्ट धरला होता मात्र पानिपत युद्धात मराठ्यांची जी हानी झाली त्यामध्ये सदाशिवराव यांच्यासहित विश्वासराव सुद्धा मारले गेले आणि गोपिकाबाईंच्या दुःखास पारावर राहिला नाही.

विश्वासराव आणि सदाशिवराव यांचा मृत्यू झाल्यामुळे शोकसागरात बुडालेल्या नानासाहेबांचा थोड्याच काळात मृत्यू झाला मात्र पानिपतची मोहीम सुरु असताना म्हणजे मृत्यूपूर्वी फक्त सहा महिन्यांपूर्वी नानासाहेबांनी दुसरे लग्न केले होते व ती गोष्ट गोपिकाबाईंना बिलकुल आवडली नव्हती तरीही नानासाहेब मृत्युशय्येवर असताना यांच्यासहित शेवटपर्यंत त्या सोबत होत्या.

नानासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे द्वितीय पुत्र माधवराव पेशवेपदी आले व माधवराव हे शासनप्रिय असल्याने गोपिकाबाईंचे त्यांच्यापुढे फार चालत नसे व त्यांच्या सख्ख्या भावाच्या एका चुकीच्या गोष्टीसाठी माधवरावांनी त्यांना शिक्षा सुनावली असता गोपिकाबाईंनी माधवरावांस विरोध केला मात्र माधवरावांनी गोपिकाबाईंचे बिलकुल न ऐकल्याने गोपिकाबाईंनी नाराज होऊन सन्यास स्वीकारला आणि त्या पुणे सोडून गंगापूर येथे सन्यास व्रत पाळण्यास निघून गेल्या.

माधवराव पेशवे यांचा क्षयाने मृत्यू झाला आणि पुढे नारायणराव पेशवे यांची हत्या झाली व आपले सर्व पुत्र आपल्या डोळ्यासमोर अकाली मृत्यू पावलेले पाहणे गोपिकाबाईंच्या नशिबी आले. नारायणरावांचे पुत्र सवाई माधवराव जेव्हा पेशवेपदी आले तेव्हा एक आजी म्हणून गोपिकाबाईंनी त्यांस बोधपर उपदेश केला होता. 

पेशवे दरबाराचे कारभारी नाना फडणवीस यांच्यावर मात्र गोपिकाबाईंची मर्जी होती कारण गोपिकाबाईंचे शत्रू रघुनाथराव यांचे नाना फडणवीस सुद्धा विरोधक होते. १७८३ साली म्हणजे वयाच्या ६३ व्या वर्षी गोपिकाबाईंचे गंगापूर येथेच निधन झाले. इतिहासात गोपिकाबाईंचे नाव एक राजकारणी व कारस्थानी स्त्री म्हणून नोंदवले गेले असले तरी त्यांच्या राजकारणातील हुशारीमुळे भलेभले लोक त्यांना वचकून असत हे सुद्धा तितकेच खरे आहे.

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press