बाजीराव पेशवे - एक झंजावात

अवघ्या वीस वर्षांत तब्बल बेचाळीस लढायांत अपराजित राहून नवा इतिहास घडवीला. मोगल, महम्मद बंगश, निजाम, रजपूत, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, दक्षिणाधिश संस्थानिक, अंतर्गत उभादावा मांडणारे आप्तस्वकिय आदी सर्वच शत्रूंनी बाजीरावांच्या समशेरीचा धसका घेतला.

बाजीराव पेशवे - एक झंजावात
बाजीराव पेशवे

दिनांक १७ एप्रिल सन १७२०, चैत्र वद्य अष्टमी शके १६४२ म्हणजेच आजपासून ३०० वर्षांपूर्वी मराठ्यांच्या स्वराज्याचे पंतप्रधान म्हणून छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीने राजमंडळातील बड्या सरदारमंडळींचा विरोध न जुमानता कैलासवासी बाळाजी विश्वनाथ भट यांचे जेष्ठ सुपुत्र बाजीराव यांची नियुक्ती केली.

थोरल्या शाहु महाराजांची ही निवड सार्थ ठरवत त्यांच्या बाजीरावरूपी रामाने कनिष्ठ बंधू लक्ष्मणरूपी चिमाजी अप्पा आणि समस्त मराठ्यांच्या सहकार्याने अवघ्या हिंदुस्तानात अष्टदिशांना शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा धडाकेबाज विस्तार आरंभला.

अवघ्या वीस वर्षांत तब्बल बेचाळीस लढायांत अपराजित राहून नवा इतिहास घडवीला. मोगल, महम्मद बंगश, निजाम, रजपूत, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज, दक्षिणाधिश संस्थानिक, अंतर्गत उभादावा मांडणारे आप्तस्वकिय आदी सर्वच शत्रूंनी बाजीरावांच्या समशेरीचा धसका घेतला. आलमिगीराचा चेला, मोगली सत्तेचे कवच आणि स्वतःस अत्यंत धुर्त समजणार्‍या निजामास अक्षरशः पळवून पळवून रडकुंडीला आणून दाती तृण धरण्यास लावले. मोगलांच्या ताब्यातील स्वराज्याचे तख्त असलेला श्रीमद् रायगड पुन्हा स्वराज्यात आणून समस्त छत्रपतींना आदरांजली अर्पण केली.

स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे श्रीमंत थोरले बाजीराव यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा..

थोरले बाजीराव बल्लाळ यांचा जन्म दिनांक १८ ऑगस्ट सन १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव त्यांचे वडील पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या बरोबर राहिल्याने छत्रपती शाहू महाराज, धनाजी जाधव, चंद्रसेन जाधव, निजाम, सरखेल कान्होजी आंग्रे, दमाजी थोरात, सय्यद अली, पिलाजी जाधव आदी मंडळी व संबंधित प्रकरणातील राजकारण, मुत्सद्देगीरी, व्यूहात्मक रचना, तह, लष्करी मोहिमेतील खाचाखोचा, सेनाउभारणी, महसूली व्यवस्था, अंतर्गत राजकारणाने ढासळलेल्या दिल्लीच्या ताकदीचा तकलादूपणा या सर्व बाबींचा थोरले बाजीराव यांचा प्रत्यक्षात जवळून अभ्यास झाला होता.

वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते मोहिमेवर जाऊ लागले. सन १७१३ सालातील पांडवगड येथील युध्दात थोरले बाजीराव यांनी प्रत्यक्ष युध्दात भाग घेऊन अनुभव घेतला. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या दिल्ली मोहिमेपूर्वी थोरले बाजीराव यांना छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून दिनांक ६ ऑक्टोबर सन १७१८ रोजी सरदारकी देण्यात आली.

पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर पेशवा पद रिक्त झाले. सन १७१३ च्या दरम्यान जे पेशवेपद घेण्यास कोणी उत्सुक नव्हते. त्यावेळेस येथील लोकांस पेशवेपदापेक्षा प्रतिनिधीपद जास्त महत्त्वपूर्ण वाटत होते. बाळाजी विश्वनाथ यांनी अवघ्या सात वर्षांत स्वकर्तृत्वाने पेशवेपदाची उंची इतकी वाढवली की येथे पेशवेपदासाठी स्पर्धा निर्माण झाली. यावरूनच बाळाजी विश्वनाथ यांचे कार्य लक्षात येईल.

अशा परिस्थितीत बाळाजी विश्वनाथ यांचे कार्य लक्षात घेऊन छत्रपती शाहूमहाराज यांनी दरबारी विरोध डावलून थोरले बाजीराव यांना पेशवा पदावर दिनांक १७ एप्रिल सन १७२० नियुक्त केले. पेशवेपद मिळाल्यानंतर लगेचच पेशवा बाजीराव खानदेशात हुसेन अली सय्यद याच्या मदतीसाठी सरलष्कर हैबतराव निंबाळकर यांच्यासह

मोहिमेवर रवाना झाले. खानदेशातील बंड मोडून काढले. मोहिमेतील या यशाने मराठ्यांच्या फौजांचा आत्मविश्वास दुणावला. याचा फायदा पुढील निजाम मोहिमेत झाला.

निजामाने मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करून कुरापती काढायला लागला. अखेर मराठे व निजाम यांच्यात औरंगाबाद (म्हणजेच दख्खन मधील मोगली सुभेदाराचे ठाणे) यांच्यात दिनांक १५ डिसेंबर सन १७२० रोजी युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांनी निजामाचा दारूण पराभव करून निजामास दाती तृण धरावयास लावले. दिनांक ४ जानेवारी सन १७२१ रोजी निजामाने चिखलठाण येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांची भेट झाली. निजामाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्या सर्व अटी मान्य करून स्वराज्याचा जिंकलेला सर्व प्रदेश परत केला.

मोगली सेनापती दाऊदखान पन्नी हा माळव्यात दंगा करायला लागला. सोरटी सोमनाथ येथील श्री महादेवाचे पवित्र स्थानास उपद्रव देण्यापर्यंत त्याची मजल गेली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी सन १७२१ च्या जून महिन्यात माळव्यात मोगली सेनापती दाऊदखान पन्नी याचा जबरदस्त पराभव केला. दाऊदखान पन्नी रणांगणावरून पळून गेला. या दैदीप्यमान विजयाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांचा माळव्यात प्रवेश झाला.

सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज यांच्याकडे राऊंची नजर वळली. या मोहिमेसाठी राऊंनी सरखेल कान्होजी आंग्रे यांची आरमारी मदत मागीतली. पोर्तुगीजांसमोर नवेच गंभीर संकट उभे ठाकले. निजाम, दाऊदखान पन्नी यांना धुळ चारणारा पेशवा आणि समुद्राचे अनभिषिक्त सम्राट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समोर आपला अजिबात टिकाव लागणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी वरसोली (अलिबाग तालुक्यातील एक गाव) येथे युद्ध न करताच दिनांक ९ जानेवारी सन १७२२ रोजी तह केला.

दरम्यान दिल्ली दरबारात परत राजकारण रंगू लागले. दिनांक १३ फेब्रुवारी सन १७२२ रोजी निजामाला दिल्ली दरबारात वजीर नेमण्यात आले. या कालावधीत श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी बागलाण, खानदेश, नाशीक गोंडवन, वऱ्हाड आणि माळवा येथे तीन स्वाऱ्या करून चौथाई व सरदेशमुखी च्या वसूलासाठी गुजरातेत पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, माळव्यात उदाजी पवार यांची नियुक्ती केली. उदाजी पवार यांनी माळव्यात धार येथे मराठी ठाणे निर्माण केले.

दिनांक १३ फेब्रुवारी सन १७२३ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी माळव्यात बोलशा येथे दुसरी भेट झाली. मोगली सुभेदार दयाबहादूर मराठ्यांना चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्यास विरोध करू लागला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी त्याच्याकडे वकीलही पाठवीला.

परंतु सन १७२३ च्या अखेरीस मोगली सुभेदार दयाबहादूर याने मराठ्यांना युध्दासाठी आव्हान दिले. वायुवेगाने मराठी फौजा उज्जैन च्या परिसरात दाखल झाल्या. श्रीमंत पेशवा बाजीराव यांची आणि दयाबहादूर यांचा सामना झाला. अखेर श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्यासमोर शाही सुभेदार दयाबहादूर याने गुडघे टेकले. अटी मान्य केल्या. महसूल चुकता केला.

याच दरम्यान माळव्यातील भोपाळ येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी दोस्त मुहम्मद याचा दिनांक १६ एप्रिल सन १७२३ पराभव केला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांची निजामाशी दिनांक १८ मे सन १७२४ रोजी नालछा येथे भेट झाली. निजामाने मराठ्यांचे दख्खन मधील चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क मान्य केले. मराठ्यांच्या सैन्याचा खर्च देण्याची कबुलायत केली. या बदल्यात पातशाही सुभेदार मुबारिजखान याच्या विरोधात निजामास मदत करण्याचे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी आश्वासन दिले. चारच महिन्यांनी म्हणजे सन १७२४ च्या सप्टेंबर महिन्यात श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी

पातशाही सुभेदार मुबारिजखान याचा सपशेल पराभव केला. या युध्दातील पराक्रम पाहून निजामाने श्रीमंत पेशवा बाजीराव यांना "शहामतपनाह" हा किताब दिनांक २४ सप्टेंबर सन १७२४ रोजी दिला. या युद्धानंतर निजाम श्रीमंत पेशवा बाजीराव यांना पत्र लिहिताना बाजीराव यांचा "रब्बुलनी" { मराठ्यांचे नवे आराध्य दैवत } असा उल्लेख करीत असे.

सन १७२५ च्या उत्तरार्धात श्रीमंत पेशवा बाजीराव यांची नजर कर्नाटकावर रोखली गेली. सन १७२५ नोव्हेंबर महिन्यात श्रीमंत पेशवा बाजीराव कर्नाटक स्वारीवर निघाले. छत्रपती शाहू महाराज यांचे मांडलिकत्व पत्करावे म्हणून बाजीरावांचे दूत, वकील ठिकठिकाणच्या संस्थानिक, राजे आदींकडे रवाना झाले. प्रथम काहींनी खळखळ केली नंतर मात्र म्हैसूर, गुत्ती, लक्ष्मेश्वर, श्रीरंगपट्टण, चित्रदुर्ग, बिदनुर, कनकगीरी, गदग, सुरापुर, अर्काट अशा दक्षिणेतल्या सर्व संस्थानिकांना श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी छत्रपती शाहूमहाराजांचे मांडलिक बनवले. कर्नाटक व श्रीरंगपट्टण या दोन मोहीमा सन १७२७ सप्टेंबर पर्यंत उरकल्यावर पुढील मोहीम म्हणजे पून्हा एकदा निजाम!

कोल्हापूरकर संभाजी महाराजांना हाताशी धरून निजामाने कारस्थाने रचण्यास सुरवात केली. निजामाने दक्षिणेतील स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून स्वराज्यात बंडाळ्या उभ्या करण्याचा खेळ आरंभला. निजामाने थेट पुण्यावर चाल केली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी दिनांक १६ सप्टेंबर सन १७२७ रोजी निजामा विरूध्द मोहीम सुरू केली. निजाम पुण्यावर आहे पाहून बाजीराव निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून निघाले. अखेर

दिनांक २५ फेब्रुवारी सन १७२८ रोजी औरंगाबाद जवळ पालखेड येथे श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामास पुरता जेरीस आणून मानहानीकारक पराभव केला. निजाम मराठी फौजांना पूर्ण शरण आला. दिनांक ६ मार्च सन १७२८ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव आणि निजाम यांच्यात मुंगी - शेगाव येथे १३ कलमी तह झाला. हीच ती पालखेडची इतिहास प्रसिद्ध मोहिम.

दरम्यान गुजरातचा शाही मोगली सुभेदार सरबुंदलखानाकडे चौथाई व सरदेशमुखीची मागणी केली. ही मागणी मान्य करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उपलब्ध नव्हता. त्याने पेशव्यांच्या वकिलामार्फत छत्रपती शाहूमहाराजांच्या नावाने चौथाई आणि सरदेशमुखी निमुट लिहून दिली.

या मोहिमेनंतर दिनांक ५ नोव्हेंबर सन १७२८ रोजी पून्हा एकदा निजामाचा वऱ्हाड प्रांताचा सुभेदार ऐवजखान याचा मराठ्यांनी पराभव केला.

महाराज छत्रसाल यांच्या बुंदेलखंड राज्य आणि बडा मोगली मनसबदार मुहम्मद बंगश यांच्यात सन १७२० पासून संघर्ष सुरू होता. बंगशाने महाराज छत्रसाल यांच्या सैन्याचा पाडाव केला. मदत मिळण्याबाबत महाराज छत्रसाल यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव यांना गढामंडला येथे दुर्गादास राठोड यांच्यामार्फत "ऐतिहासिक गजेंद्रमोक्ष" खलीता पाठविला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी ताबडतोब महोबा या गावाकडे पोहोचले तेथे महाराजा छत्रसाल त्यांचे पुत्र हिरदेसाह आणि जगतराय यांची श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्याशी भेट झाली. जैतपूर किल्यात महम्मद बंगशाचे ठाणे होते. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी व्यूहात्मक रचना करून मार्च अखेरीस मराठ्यांच्या फौजेने महम्मद बंगशाचा पूर्ण पराभव केला. या मोहिमेतील यशानंतर महम्मद बंगश याला श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी सोडून दिले. महाराजा छत्रसाल यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव यांना मुलगा मानून राज्याचा तीसरा हिस्सा देण्याचे कबूल केले. प्रत्यक्षात मात्र हिस्सा देण्यास खुप चालढकल केली.

निजाम दाभाडे प्रकरणाचा निपटारा करण्यास श्रीमंत पेशवा बाजीरावसन १७३१ च्या मार्च महिन्यात गुजरातेत उतरले. दाभाडे हे सेनापती होते मात्र प्रत्यक्षात निजाम आणि त्यांच्यात सख्य निर्माण होऊन त्याने स्वराज्याची हानी होणार होती. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी सेनापती दाभाडे यांना आपापसातील युद्ध टाळण्यासाठी वारंवार पत्र पाठवली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर झालेल्या युध्दात त्र्यंबकराव दाभाडे यांना रणांगणावर अपघाताने बंदूकीची गोळी लागली आणि ते वीरगतीस प्राप्त झाले. दाभाड्यांचा पूर्ण पराभव झाला. यानंतर श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामास सुरतेनजीक दमण जवळ पूर्णपणे नमवले. निजामाचा पराभव झाल्यानंतर दिनांक २७ डिसेंबर सन १७३२ रोजी रोहेरामेश्र्वर येथे भेट झाली.

सन १७३३ साली पेशव्यांनी जंजीरेकर सिद्दी हबशावरील लष्करी मोहीम सुरू केली. या मोहिमेत कोकणातील बराच भाग स्वराज्यात आला. परंतु इतर राजकीय निकडीमुळे ही मोहिम वर्षअखेरीस आवरावी लागली. याच मोहिमेदरम्यान प्रतिनिधींनी कट रचून दिनांक ८ जून सन १७३३रोजी "दुर्गदुर्गेश्वर रायगड" हस्तगत करून स्वराज्यात आणला.

सन १७३५ च्या फेब्रुवारीत पुन्हा जंजीरेकर हबशाकडील मोहीम राबविण्यात आली. दिनांक ३ ऑक्टोबर सन १७३५ रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीमंत पेशवा बाजीराव उत्तरेकडील लष्करी नव्हे तर राजकीय मोहिमेवर निघाले. उत्तरेकडील राऊंचा दबदबा प्रचंड वाढला होता हे मातोश्री श्रीमंत राधाबाईसाहेब यांच्या काशीयात्रेने सिद्धच झाले होते. खुद्द बंगशानेही त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली होती. राजपूत राजे यांच्या कडून चौथाई चे करार , हिंदू राजांची एकजूट अशा अनेक महत्त्वपूर्ण मुत्सद्दी योजना अंमलात आणून राऊ सन १७३६ च्या मे महिन्यात परत पुण्यास आले.

दरम्यान दिल्लीतील राजकारणाने पून्हा उचल खाल्ली. माळवा गुजरात आदींची सरदेशमुखी आणि चौथाई देण्यास दिल्लीच्या बादशहाने नकार दिला. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी पून्हा उत्तर हिंदुस्थानात मोहिम उघडली. सन १७३६ च्या अखेरीस मोहिमेस प्रारंभ झाल्यावर अतिशय जलदिने भोपाळ गाठले. त्यानंतर भेलसा, अटेर, भदावर एकामागोमाग एक काबीज करत आग्र्याच्या रोखाने निघाले. दिनांक २९ मार्च सन १७३७ रोजी दिल्ली परिसरातील कुशबंदी येथे मराठी फौज पोहोचताच दिल्लीत दाणादाण उडाली. दिल्लीच्या सुस्तावलेल्या मस्तवाल मोगली डोळ्यात झणझणीत मराठी अंजन श्रीमंत पेशवा बाजीराव यांच्या या अभूतपूर्व मोहिमेने घातले. बादशहाची पळता भुई थोडी झाली. हा दरारा निर्माण करून श्रीमंत पेशवा बाजीराव दिनांक ६ जुलै सन १७३७ रोजी परत पुण्यात येऊन पोहोचले.

या सर्व प्रकारानंतर मोगल दरबारचा आधार निजाम श्रीमंत पेशवा बाजीराव यांचे पारिपत्य करण्यास भल्यामोठ्या तोफखाना, द्रव्य, फौजेसह दिल्लीहून दक्षिणेकडे निघाला. खबर मिळताच श्रीमंत पेशवा बाजीरावही सन १७३७ च्या ऑक्टोबर अखेरीस उत्तर मोहिमेवर निघाले. मराठ्यांच्या फौजांनी भोपाळ येथे निजामाच्या फौजेला दिनांक १५ डिसेंबर १७३७ ते ७ जानेवारी १७३८ असा तीन आठवडे वेढा दिला. अखेरीस घनघोर युद्ध होऊन नेहमीप्रमाणे निजाम शरण आला. श्रीमंत पेशवा बाजीराव या मोहिमेनंतर सन १७३८ च्या जुलै दरम्यान पुण्यात परतले.

सन १७३९ च्या जानेवारीत इराणचा नादीरशहा दिल्लीवर चालून निघाला आहे व तो लाहोर पर्यंत पोहोचला आहे ही खबर श्रीमंत पेशवा बाजीराव यांना मिळाली. दिनांक ७ फेब्रुवारी सन १७३९ रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव उत्तरेच्या रोखाने निघाले. धरणगाव येथे नादिरशहाने दिल्लीत अंमल जारी केल्याची खबर मिळाली.

छत्रपती शाहू महाराज यांनी श्रीमंत पेशवा बाजीराव यांस आज्ञा केली की "तुम्ही ताबडतोब मजल दरमजल करतबादशहाचे कुमकेस जावे. आमचे वचन औरंगजेब पादशहापाशी गुंतले आहे की, परचक्र तर आम्ही कुमक करावी." ही आज्ञा मिळताच श्रीमंत पेशवा बाजीराव दिल्ली रोखाने निघाले परंतु ते दिल्लीत पोहोचण्या आधीच नादिरशहा दिनांक ५ मे १७३९ रोजी इराणकडे रवाना झाला. अखेर नव्या बादशहाला आहेर देऊन त्याच्याकडून पूर्वी प्रमाणे फर्माने पावल्यावर श्रीमंत पेशवा बाजीराव दिनांक २९ जुलै सन १७३९ रोजी पुण्यात परतले.

निजामपुत्र नासीरजंग हा स्वतःस फार मोठा सेनानी समजत असे. श्रीमंत पेशवा बाजीराव यांना आपण सहज पराभूत करू शकतो असा फाजील आत्मविश्वास त्यास निर्माण झाला. त्याने मराठ्यांच्या मुलखात कुरबुरी सुरू केल्या. निजाम दिल्लीत संधान बांधून नवे राजकारण करीत असल्याची खबर राऊंना मिळाली. सन १७४० च्या सुरवातीलाच श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून जाण्याची योजना आखली. परंतु प्रत्यक्षात निजामपुत्र नासीरजंग याची औरंगाबाद गोदावरी येथे गाठ पडली. श्रीमंत पेशवा बाजीराव यांनी नेहमीप्रमाणेच निजामाचा पराभव केला. दिनांक २७ फेब्रुवारी सन १७४० रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव आणि निजामपुत्रनासीरजंग यांच्यात तह झाला. दिनांक ३ मार्च रोजी अखेरची भेट झाली. खरगोण व हंडीया हे निजामाचे प्रांत स्वराज्यात दाखल झाले.

दिनांक ३० मार्च सन १७४० रोजी श्रीमंत पेशवा बाजीराव खरगोण प्रांताची व्यवस्था लावण्यास गेले. दिनांक २८ एप्रिल सन १७४० रोजी नर्मदातीरावरील रावेरखेडी येथे भटकुलोत्पन्न श्रीमंत पेशवा बाजीराव नावाचे २० वर्ष हिंदुस्थानात अखंड घोंघावत असलेले, मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे वादळ एकाकीपणे कायमचे शांत झाले.

ईश्वरदत्त अपराजित सेनानी थोरले बाजीराव यांस आज स्वराज्याचे पंतप्रधान पद मिळोन ३०० वर्ष झाली म्हणून त्यांची माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे.

संदर्भ साहित्य -

 • पेशवे दप्तर
 • पेशवे बखर
 • पुरंदरे दफ्तर
 • मराठ्यांच्या इतिहासाची साधने - राजवाडे
 • खंड
 • रोजनिशीतील उतारे
 • शाहू बखर
 • आंगरे यांची हकीकत
 • ब्रम्हेंद्र-चरित्र
 • साधन परिचय
 • पेशवेकालीन महाराष्ट्र
 • मराठी रियासत
 • अप्रकाशित कागदपत्र
 • पेशवे घराण्याचा इतिहास
 • शहामतपनाह बाजीराव

- श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press

मराठी भाषेतील लोकप्रिय व वाचनीय पुस्तके

इतिहास भवानी तलवारीचा Buy from Amazon Buy from Flipkart
मुंबईचा अज्ञात इतिहास Buy from Amazon Buy from Flipkart
नागस्थान ते नागोठणे Buy from Amazon Buy from Flipkart
स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट Buy from Amazon Buy from Flipkart
रुळलेल्या वाटा सोडून Buy from Amazon Buy from Flipkart
इतिहासावर बोलू काही Buy from Amazon Buy from Flipkart
शिवकाळातील अपरिचित प्रसंग Buy from Notion Press
महाराष्ट्रातील देवस्थाने Buy from Notion Press
दुर्गमहिमा महाराष्ट्राचा Buy from Notion Press
दुर्ग स्थल माहात्म्य Buy from Notion Press