कावजी कोंढाळकर - एक स्वराज्य वीर

कावजी कोंढाळकर आपल्या कुमकेसह देईरी गडाच्या रक्षणाकरिता आले आणि त्यांनी गडास वेढा घालून बसलेल्या मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढवला.

कावजी कोंढाळकर - एक स्वराज्य वीर

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यकार्यात साथ देणाऱ्या महान मराठ्यांपैकी एक म्हणजे कावजी कोंढाळकर. कावजी कोंढाळकर हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक संभाजी कावजी यांचे वडील असून त्यांची कारकीर्द कान्होजी जेधे यांच्या कार्यकाळात सुरु झाली. असे म्हणतात की एका लढाईत कान्होजी जेधे यांच्या पक्षातून लढतात कावजी कोंढाळकर यांचे थोरले बंधू पोसजी मारले गेले व यानंतर कान्होजी जेधे यांनी कावजी कोंढाळकरांना आपल्या लहान बंधूप्रमाणे सांभाळले.

कान्होजी जेधे हे शिवरायांना स्वराज्यकार्यात साथ देण्यास पुढे आले तेव्हाच यांच्यासहित कावजी कोंढाळकर हे सुद्धा होते व त्यांनी स्वराज्यकार्यार्थ अनेक पराक्रम गाजवले. 

कावजी कोंढाळकर हे स्वराज्याचे मोठे मानकरी असले तरी त्यांनी केलेले अनेक पराक्रम आजही फारसे प्रसिद्ध नाहीत व असाच एक पराक्रम म्हणजे उत्तर कोकणातील मोगलांविरोधातील युद्ध.

१६६१ साली शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली मोगलांनी उत्तर कोकण मोहीम काढली आणि उत्तर कोकणातील कल्याण सुभ्यावर हल्ला करून बराचसा प्रदेश जिंकून घेतला मात्र कल्याण सुभ्यातील महत्वाची शहरे व किल्ले त्यांना जिंकता आले नाहीत. 

शाईस्तेखानाने मग कारतलबखान नामक सरदाराची उत्तर कोकण मोहिमेवर नेमणूक केली मात्र खुद्द महाराजांनी जीवास जीव देणाऱ्या मराठयांसहित मोगलांची उंबरखिंडीत दाणादाण उडवली आणि मोगलांची फजिती केली.

कालांतराने महाराजांनी प्रबळगडावर हल्ला करून तेथील राजपूत सरदार केशरसिंग याचा पराभव करून प्रबळगड ताब्यात घेतला. 

१६६१ च्या मे महिन्यात मात्र मोगलांच्या हाती कल्याण शहर लागले आणि यानंतर नऊ वर्षे कल्याण शहर मोगलांकडे होते. सुभ्याचे मुख्य शहर मोगलांकडे आले असले तरी सुभ्यातील मोठा प्रदेश अद्याप स्वराज्यात असल्याने शाईस्तेखानाने बुलाखी नामक सरदारास पेणवर पाठवले.

बुलाखीने प्रथम पेण परिसरातील देईरी नामक गडास वेढा घातला व त्यामध्ये स्वराज्यातील सैन्य होते. किल्ल्यावरील सैन्याने मोगल सैन्याचा मोठा प्रतिकार केला मात्र मोगलांची कुमक मोठी असल्याने गडावरील शिबंदी कमी पडू लागली व त्यामुळे गडावरील सैन्य चिंतेत सापडले.

शिवाजी महाराजांना हे समजल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर आले ते कावजी कोंढाळकर. त्यांनी त्वरित कावजी कोंढाळकर यांना पेणकडे कूच करण्याची सूचना केली आणि कावजी कोंढाळकर आपल्या कुमकेसह देईरी गडाच्या रक्षणाकरिता आले आणि त्यांनी गडास वेढा घालून बसलेल्या मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढवला.

कावजी कोंढाळकरांच्या नेतृत्त्वात झालेला हा हल्ला एवढा शक्तिशाली होता की या युद्धात मोगलांचे चारशे सैनिक ठार झाले आणि मोगलांनी गडास मारलेला वेढा उध्वस्त झाला.

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना साथ देणारे मराठे यांचे अनेक पराक्रम आजही फारसे प्रकाशझोतात आलेले नाहीत व कावजी कोंढाळकरांचे देईरी गडाचे युद्ध म्हणजे मराठ्यांनी स्वराज्यप्रीत्यर्थ केलेल्या पराक्रमाची आणखी एक साक्ष आहे.