ग्रांट डफ - मराठ्यांचे चरित्र लिहिणारा ब्रिटिश इतिहासकार
१८०५ साली ग्रांट डफ मुंबईस आला व येथे त्यास ग्रेनेडिअर पलटणीत नोकरी मिळाली.
ब्रिटिश लोकांनी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ४० वर्षे आणि थेट ८९ वर्षे अशी एकूण १२९ वर्षे राज्य केले असले तरी ब्रिटिशांचा प्रवेश भारतात १६०८ सालीच झाला होता व भारतातील विविध किनारपट्टींवरील काही बंदरांवर त्यांच्या वसाहती होत्या.
१८१८ साली ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात राज्यविस्तार केल्यावर मात्र त्यांचा प्रभाव सर्वत्र जाणवू लागला होता व भारतातील अनेक राज्यांना त्यांचे मांडलिकत्व स्वीकारण्यावाचून पर्याय उरला नव्हता. ब्रिटिशांची फोडा व तोडा ही नीती यशस्वी ठरल्याने भारताला पारतंत्र्याच्या गर्तेत जावे लागले हे जरी सत्य असले तरी ही नीती मनुष्याप्राणाच्या उपजत गुणांमुळे आजही राजकारणात यशस्वी होते हे आपण पाहतो.
ब्रिटिश लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून कारभार करीत असताना भारतातील अनेक राज संस्थानांवर त्यांचे प्रतिनिधी नेमलेले असत व त्यांचे काम ब्रिटिश व संस्थाने यांच्यातील दुवा बनून हितसंबंधांचे रक्षण करणे हे होते.
ईस्ट इंडिया कंपनीने सातारा येथे नेमलेला असाच एक प्रतिनिधी म्हणजे जेम्स ग्रांट डफ. जेम्स ग्रांट डफ चे महत्व म्हणजे तो ब्रिटिश असूनही मराठ्यांच्या इतिहासाविषयी त्यास एवढा आदर व प्रेम होते की त्याने प्रचंड संशोधन करून मराठ्यांचे पहिले चरित्र लिहून काढले त्यामुळे त्यास मराठ्यांचे चरित्र लिहिणारा पहिला इतिहासकार म्हटले जाते.
तत्पूर्वी आपण ग्रांट डफ याची पार्श्वभूमी जाणून घेऊ. ग्रांट डफ चा जन्म स्कॉटलंड देशातील बन्फ येथे १७८९ साली झाला आणि त्याच्या आईचे नाव मार्गारेट आणि वडिलांचे नाव जॉन होते.
१८०५ साली ग्रांट डफ मुंबईस आला व येथे त्यास ग्रेनेडिअर पलटणीत नोकरी मिळाली. पुढील काळात गुजरात मध्ये झालेली काही बंडे मोडण्याच्या कामी ग्रांट डफची नेमणूक करण्यात आली व ही जबाबदारी त्याने चांगली पार पडल्याने त्यास बढती मिळत गेली.
ग्रांट डफ हा सैन्यात असला तरी त्यास इतिहास व संस्कृती यांचा अभ्यास करण्याची मोठी आवड असल्याने त्याने भारत प्रथम फारशी व इतर भाषा शिकून घेतल्या व या भाषांच्या ज्ञानामुळे त्यास दुभाषाची नोकरी मिळाली.
कालांतराने ग्रांट डफ ज्या ग्रेनेडिअर पलटणीत होता ती पलटण पुणे येथे आली व येथे त्याची ओळख एल्फिस्टन सोबत झाली. याच ठिकाणी ग्रांट डफ यास पाटीजर आणि ब्रिग्ज सारखे मित्र मिळाले.
१८१८ साली ग्रांट डफ ची नेमणूक सातारा येथील रेसिडेंट म्हणून झाली व यावेळी सातारा गादीवर छत्रपती प्रतापसिंह भोसले विराजमान होते. प्रतापसिंह भोसले व ग्रांट डफ या दोघांच्याही आवडी एकसारख्या असल्याने दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि ग्रांट डफ ला मराठ्यांच्या इतिहासावर संशोधन करण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी होती ती त्यास सातारा येथे प्राप्त झाली.
प्रतापसिंहांनी सुद्धा ग्रांट डफ यास या कार्यात भरपूर मदत करून त्यास लागेल तेवढे संदर्भग्रंथ आणि साधने पुरवली. ग्रांट डफ याचे साताऱ्यातील वास्तव्य १८१८ ते १८२२ असे होते व १८२२ साली निवृत्त होईपर्यंत त्याने मराठ्यांच्या इतिहासावरील सर्व साहित्य तयार करून ठेवले आणि १८२२ नंतर तो भारत सोडून पुन्हा एकदा आपल्या देशास गेला आणि जमा केलेल्या संदर्भांवर एक सुंदर पुस्तक लिहून त्याची पहिली आवृत्ती १८२८ साली प्रकाशित केली आणि या पुस्तकाचे नाव A History of the Mahrattas असे ठेवले. या ग्रंथाची नंतर वेगवेगळ्या भाषेत अनेक भाषांतरे झाली आणि अनेक आवृत्या निघाल्या.
ग्रांट डफ याने मराठ्यांच्या इतिहासावरील ग्रंथाचे लिखाण व छपाई इंग्लंडमध्ये केली असल्याने त्यास इंग्लंड मधून कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही मात्र मराठ्यांचा इतिहास लोकांसमोर यावा या इच्छेमुळे ग्रांट डफ याने स्वतः खर्च करूनच पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली व या सर्व कामात त्यास १७०० पौंड एवढे मोठे कर्ज झाले मात्र त्याने तेही संकट सोसले.
कालांतराने पहिल्या आवृत्तीस मिळालेल्या प्रतिसादानंतर काही प्रकाशकांनी ग्रांट डफ यास संपर्क केला मात्र पहिल्या आवृत्तीत काही सुधारणा करणार असाल तर दुसरी आवृत्ती आम्ही छापू असे सांगितल्याने ग्रांट डफ ने पहिल्या आवृत्तीत थोड्या सुधारणा केल्या आणि यानंतर दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. पुस्तकाची दुसरी आवृत्ती चांगली चालल्यानंतर पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती सुद्धा मोठ्या प्रमाणात चालली आणि ग्रांट डफ याचे नाव एक इतिहासकार म्हणून सर्वतोमुखी झाले.
१८५८ साली म्हणजे वयाच्या ६९ व्या वर्षी ग्रांट डफचे स्कॉटलंड येथे निधन झाले. ग्रांट डफ हा ब्रिटिश असला तरी त्याने मराठ्यांच्या इतिहासाविषयी आदराची भावना धरून स्वतः कर्जाचा डोंगर पार करून मराठ्यांचे जे चरित्र लिहिले आहे त्यामुळे तो आदरास पात्र ठरला आहे.