दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

मराठी भाषेतील आद्य पत्रकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजपुर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी झाला.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर यांच्या वडिलांचे नाव गंगाधर. गंगाधर हे भिक्षुकी करीत मात्र गंगाधर हे एक कवी असल्याने बाळशास्त्री यांच्यामध्येही लहानपणापासून काव्यनिर्मितीची आवड झाली होती.

बाळशास्त्री यांचे लहानपणीचे गुरु म्हणजे बापू छत्रे, बापू छत्रे हे बाळशास्त्री यांना इंग्रजी शिकवीत याशिवाय दुपारी इंग्रजी शिकून झाले की संध्याकाळी ते कौमुदी शिकण्याकरिता बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अध्ययनासाठी जात.

अशाप्रकारे बाळशास्त्री जांभेकर यांचे शिक्षण सुरु असताना एक घटना अशी घडली की त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष अनेकांना पटली त्याचे असे झाले की एकदा दोन ब्रिटिश लोकांची रस्त्यात हाणामारी सुरु होती यावेळी बाळशास्त्री तेथून जात होते व त्यांनी ही मारामारी पहिली. पुढे या मारामारीचा खटला कोर्टात गेला त्यावेळी साक्षीदार म्हणून बाळशास्त्री यांना बोलावण्यात आले होते. यावेळी मराठी असूनही त्यांनी या दोन ब्रिटिशांमध्ये हाणामारीच्या वेळी झालेला संवाद तंतोतंत कोर्टात सांगितला.

पुढे बाळशात्री यांनी प्राध्यापक अर्लीबर यांच्याकडे गणिताचे शिक्षण घेतले व १९२८ साली आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये अर्लीबार यांचे सहकारी म्हणून गणिताचे शिक्षण देण्याचे कार्य करू लागले.

१८३२ साली शिक्षक म्हणून त्यांचे उत्तम कार्य पाहून अक्कलकोटच्या राजघराण्यातील राजपुत्रांना इंग्रजी शिकवण्याकरिता त्यांना पाचारण करण्यात आले होते. १८३२ साली त्यांनी भाऊ महाजन यांच्या सहकार्याने दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र सुरु केले. दर्पण हे इंग्रजी व मराठी अशा दोनही भाषांत असून ते दर आठवड्यास प्रकाशित होणारे साप्ताहिक होते. 

१८३४ साली बाळशास्त्री एल्फिस्टन इन्स्टिटयूट मध्ये अध्यापक म्हणून रुजू झाले याशिवाय १८४२ ते १८४४ ही दोन वर्षे त्यांनी एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून कार्य केले तसेच नॉर्मल स्कुल येथेही त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.

१८४० साली बाळशास्त्री यांनी दिग्दर्शन नावाचे मासिक सुरु केले. त्यामध्ये सहसा शास्त्रीय लिखाण केले जात असे मात्र या मासिकास फारसा लोकाश्रय तेव्हा न मिळाल्याने हे मासिक काही काळानंतर बंद झाले. 

बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार व शिक्षक होतेच मात्र एक समाजसुधारकही होते. त्याकाळी त्यांनी काही गोष्टींचा शास्त्रीय अभ्यास करून त्यावर लिखाण केले त्यामुळे त्यांना टिकेचेही धनी व्हावे लागले होते. ग्रहण या विषयावर शास्त्रीय माहिती दिल्याने तसेच श्रीपाद शेषाद्री या ख्रिश्चन झालेल्या एका ब्राह्मणास शुद्ध करून पुन्हा धर्मात घेतल्याने काही कर्मठ लोकांनी बाळशास्त्री यांच्यावर काही काळ बहिष्कार टाकला होता.

बाळशास्त्री जांभेकर यांची लेखन संपदाही विपुल आहे. इतिहास, गणित, विज्ञान व इंग्रजी अशा अनेक विषयांवर त्यांचा हातखंडा होता. त्यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे विद्येचे उद्देश, लाभ व संतोष, बालव्याकरण, नीतिकथा, सारसंग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, रॉयल एशियाटिक सोसायटी व जिऑग्राफिकल सोसायटीपुढे वाचलेले इंग्लिश निबंध, उपदेश चंद्रिका मासिकातील लेख, संध्येचे भाषांतर, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, शून्यलब्धी गणित, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इत्यादी ग्रंथ बाळशास्त्री यांनी लिहून साहित्य संपदेत मोलाची भर घातली.

बाळशास्त्री यांना इतिहास अभ्यासाची खूप आवड असल्याने ते जुन्या वस्तूंचा व लेखांचा शोध घेण्यासाठी ऊनपावसाची पर्वा न करता भटकंती करत असत मात्र एक दिवस बाळशास्त्री यांना समजले की कनकेश्वर येथे एक प्राचीन शिलालेख आहे त्यामुळे त्या शिलालेखाचा शोध लावण्यासाठी हे तिथे भर दुपारी गेले व शोध घेत असता प्रखर उन्हामुळे उष्माघात होऊन बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी निधन झाले.

बाळशास्त्री यांच्या अकाली मृत्यूमुळे मराठी पत्रकारिता, शिक्षण व इतिहास क्षेत्राची अपिरिमित हानी झाली. बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी मध्ये 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली होती त्यामुळे हा दिवस आजही महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो व या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विविध क्षेत्रातून आदरांजली वाहिली जाते.