प्रतापराव गुजर - हिंदवी स्वराज्याचे सरनोबत

म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या ओळींमधून ज्या वीराचा यथोचित सन्मान केला जातो ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर.

प्रतापराव गुजर - हिंदवी स्वराज्याचे सरनोबत
प्रतापराव गुजर

प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव कुडतोजी गुजर असे असून प्रतापराव हा किताब शिवाजी महाराजांनी त्यांना प्रदान केला होता. प्रतापराव यांचे जन्मस्थान म्हणजे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेले ताम्हाणे तर्फे गोरेगांव. ताम्हाणे नावाची दोन गावे माणगाव तालुक्यात आहेत मात्र ताम्हाणे तर्फे गोरेगांव हे रायगड किल्ल्याच्या आसमंतात गांगवली (शाहू महाराजांचे जन्मस्थळ) या गावाच्या शेजारी असलेला एक छोटंसं गावं आहे.

पुरंदरच्या तहात गमावलेले २७ किल्ले महाराजांनी आग्रा येथील सुटकेनंतर परत घेण्याचे ठरवले यासाठी 'तुम्ही राजकारण यत्न करून किल्ले घ्यावे' असा आदेश मंत्र्यांना, सरदारांना व मावळ्यांना दिला. यावेळी ज्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली त्यामध्ये प्रतापराव गुजर यांचा समावेश होता.

प्रतापरावांनी सरनोबती मिळाल्यावर समस्त मावळे सोबत घेऊन चारही पातशाह्यांमधील किल्ले व मुलुख ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आणि स्वराज्याचा मुलुख मजबूत केला. चारही पातशाह्या प्रतापरावांच्या प्रतापाने हाय हाय करू लागल्या. 

पुढे विजापूरहून बादशाहने बहलोलखानास स्वराज्यात पाठवले व तो पन्हाळा प्रांती येऊन दाखल झाला. महाराजांना ही बातमी समजली व ते म्हणाले हा सारखाच पुन्हा पुन्हा येत आहे अशावेळी त्याचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. यानंतर त्यांनी प्रतापराव यांना बोलावून सांगितले की बहलोलखान पन्हाळ्यास आला आहे तेव्हा तुम्ही जाऊन त्याचा संपूर्ण नाश करा. 

उंबराणी येथे प्रतापराव व बहलोलखान यांच्या सैन्याची गाठ पडली. उंबराणी हे स्थान मिरज व विजापूरच्या दरम्यान आहे. ही लढाई सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालली यामध्ये दोन्ही बाजूंचे सैन्य जाया झाले. बहलोलखानाने शरणागती पत्करली व अन्नदाण्याच्या व पाण्याच्या तोट्याने बहलोलखान बेजार झाला व त्याने प्रतापरावांना पुन्हा स्वराज्यात येणार नाही असे वचन देऊन अभयदान मागितले व तिकोट्यास गेला. महाराजांनी बहलोलखानाचा पूर्ण नाश करण्याचे आदेश दिले असल्याने प्रतापरावांनी त्याला जिवंत सोडल्याचे महाराजांना समजताच ते संतप्त झाले व प्रतापरावांना 'बहलोखानाचा पूर्ण नाश करूनच मला भेटा अन्यथा तोंड दाखवू नका' असे सुनावले. 

बहलोलखान तिकोट्यास गेल्यावर त्याला विजापूरकडे ताज्या दमाचे सैन्य मिळाले व तो परत एकदा स्वराज्यावर चालून आला. येथून प्रतापरावही परत बहलोलखानावर चालून गेले. मात्र शिवाजी महाराजांचे शब्द व आपण बहलोलखान यास जिवंत सोडून चुक केली हा पश्चाताप त्यांच्या मनात घर करून होता त्यामुळे त्यांनी यावेळी भावनेच्या भरातच केवळ सहा मावळ्यांसह बहलोलखानाच्या बलाढ्य सेनेवर हल्ला चढवला. 

ही लढाई नेसरी येथे झाली. या युद्धात रक्ताचे पाट वाहिले प्रतापरावांनी फक्त सहा मावळ्यांसहित केलेल्या या लढाईत शर्थ गाजवली. मात्र फक्त सात जणांचा बलाढ्य सैन्यापुढे कितीसा निभाव लागणार होता. नेसरीच्या खिंडीत लढताना एक एक करून सोबतचे सहाही मावळे धारातीर्थी पडले आणि प्रतापरावही तलवारीचा घाव वर्मी लागून पडले. 

प्रतापरावांची कारकीर्द पाहता त्यांनी अनेकदा विजयश्री आपल्या पराक्रमाने व बुद्धिचातुर्याने खेचुन आणली मात्र या लढाईत मात्र त्यांनी जो पराक्रमाचा दाखला दिला तो कधीही इतिहासाच्या पटलावरून पुसला जाऊ शकत नाही. अवघ्या सात मावळ्यांनी स्वराज्याच्या महायज्ञात दिलेली ही एक महान आहुती होती किंबहुना हा प्रतापरावांचा आत्मयज्ञच होता. या घटनेने महाराज अतिशय दुःखी झाले व प्रतापरावांसारखा पराक्रमी सरनोबत गमावल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि म्हणाले की

'आज एक बाजू (हात) पडली, आम्ही त्यांना म्हणालो की बहलोलखानास नष्ट केल्याशिवाय तोंड दाखवू नये आणि त्यांनी माझ्या शब्दाचा आदर राखला' आता लष्कराचा बंदोबस्त कसा होईल? 

यानंतर महाराज दुःख विसरण्याकरिता चिपळूण येथे लोटे परशुराम येथे जाऊन काही काळ राहिले व परत आल्यावर हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांना सरनोबतीची वस्त्रे प्रदान केली.