हेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट

२६ मे रोजी शिवाजी महाराजांबरोबर हेन्री ऑक्झेंडन याची भेट झाली. हेन्रीने महाराजांना व संभाजी राजांना आदरपूर्वक नजराणा पेश केला व महाराजांनी तो स्वीकारला

हेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट
हेन्री ऑक्झेंडन व शिवाजी महाराजांची भेट

ब्रिटिशांची मराठ्यांबरोबर तहाची बोलणी इ. स. १६७४ मध्येही सुरुच होती. शिवाजी महाराजांच्या राज्यातील कोकण प्रदेशामध्ये व्यापार वाढवणे, राजापूर वखारीचे नुकसान भरुन काढणे व नव्या सवलती मिळवणे असा ब्रिटिशांचा उद्देश होता तसेच शिवाजी महाराजांनी पूर्वी झालेल्या तहावर शिक्कामोर्तब केले नव्हते; त्यामुळे तो तह कायम झाला नव्हता.

त्यामुळे हा तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी यास रायगडावर पाठवावे व त्याचे मुखत्यार वकील म्हणून हेन्री ऑक्झेंडन याला रायगडावर पाठवण्याचे ठरले. 

सुरुवातीस नारायण शेणवी तहाची बोलणी करण्याकरिता रायगड येथे गेला व निराजीपंतांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र निराजीपंतांनी निरोप पाठवला की, महाराजांच्या एक भार्या नुकत्याच निवर्तल्यामुळे राजे सुतकात आहेत; तेव्हा सुतक फिटेपर्यंत गडावर न येता माझ्याबरोबर पाचाडला रहा. 3 एप्रिल रोजी शेणवी यांनी महाराजांना भेटून तहाची बोलणी केली. 

यानंतर हेन्री ऑक्झेंडन याला ११ मे १६७४ नंतर रायगडी धाडण्यात आले. त्यावेळी त्यास शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजी राजे यांना योग्य वेळी सढळ हस्ते नजराणे देणे, राजापूरचा व्यापार, मुंबई बेटाची सोय व सुरक्षितता या दृष्टीने जरुर त्या गोष्टी उरकणे, बालाघाट व आतील प्रदेशातील पेठा व मुख्य करुन नागोठणे ते मुंबईच्या आसमंतातला प्रदेश इंग्रजांच्या व्यापारासाठी खुला करुन देण्याची विनंती करण्याबाबत सुचविले गेले होते.  

शिवाजी महाराजांच्या वकिलांसोबत वरील चर्चा झाल्यावर १३ मे ला हेन्री ऑक्झेंडन एका गलबतातून चौल-रेवदंडा येथे पोहोचला. चौल येथील वेशी रात्री आठ वाजताच बंद झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. रेवदंड्यास हेन्रीला कळले की, शिवाजी महाराज रायगडावर परत आले आहेत. त्यामुळे तातडीने त्याने १४ मे ला सुभेदाराची भेट घेतली. पेण व नागोठणे इत्यादी शहरांवर चौलच्या सुभेदाराची देखरेख असे. हा सुभेदार इंग्रजांना प्रतिकुल असल्याचे कळल्याने हेन्रीने त्याला पामरीजोडीच्या नजराण्याने खूष केले आणि १६ मे ला परत होडीने निघून अष्टमी, निजामपूर, गंगावली असे करत पाचाडला १९ मे रोजी येऊन दाखल झाला. 

हा काळ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा काळ असल्याने गडावर अतिशय उत्साहाचे वातावरण होते. शेवटी २६ मे रोजी शिवाजी महाराजांबरोबर हेन्री ऑक्झेंडन याची भेट झाली. हेन्रीने महाराजांना व संभाजी राजांना आदरपूर्वक नजराणा पेश केला व महाराजांनी तो स्वीकारला आणि आता तह झाल्यामुळे तुम्ही आमच्या आज्ञेत राहून खुशाल व बिनधोक व्यापार करा अशी आज्ञा केली. ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य व देदिप्यमान असा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पाडला. राजे सिंहासनाधिष्ठित झाले, त्यांनी मस्तकावर छत्र धारण केले होते, उंची वस्त्रे व अलंकार धारण केले होेते.

कुलगुरु प्रभाकर भट्ट यांचे पुत्र बाळभट्ट यांनी अनेक महत्त्वाचे विधी या प्रसंगी पार पाडले. सभोवताली अष्टप्रधान आपापली चिन्हे घेऊन स्थानापन्न झाले होते. याशिवाय कोषाधिकारी, सुह्मदजन, सेनाधिकारी नियुक्त स्थळी उभे होते. आपल्या लाडक्या राजाचा भव्य राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी जनता रायगड येथे आल्याने रायगड गजबजला होता.  ऑक्झेंडन याच दिवशी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास दरबारात आला व छत्रपतींना लवून मानाचा मुजरा केला. 

दुभाषी नारायण शेणवी याने शिवाजी महाराजांना नजर करण्यासाठी आणलेली हिरेजडीत अंगठी वर पकडली त्यामुळे सूर्यप्रकाश अंगठीवर पडून किरण परावर्तित झाले व महाराजांचे लक्ष ऑक्झेंडनकडे वेधले गेले. महाराजांनी ऑक्झेंडनला सिंहासनाच्या पायरीपाशी बोलावले. ऑक्झेंडनने अंगठी महाराजांना नजर केली व नंतर महाराजांनी पोशाख देऊन ऑक्झेंडनची पाठवणी केली. अशा रितीने शिवाजी महाराजांबरोबर तह यशस्वी करुन ऑक्झेंडन १३ जून रोजी रायगडाहून निघून १६ जूनला मुंबईस गेला.