संताजी घोरपडे - वीर सेनापती

संताजी घोरपडे हे म्हालोजी घोरपडे यांचे पुत्र.म्हालोजी हे बाजी घोरपडे यांचे बंधू होते. संभाजी महाराजांना मोगलांनी जेव्हा संगमेश्वर येथे वेढा घातला तेव्हा त्यांना प्रतिकार करताना म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले होते.

संताजी घोरपडे - वीर सेनापती

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

संभाजी महाराज यांच्यानंतर जेव्हा स्वराज्य संकटात सापडले, महाराणी येसूबाई व शाहू महाराज मोगलांच्या कैदेत सापडले, छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीस जावे लागले अशावेळी हिंदवी स्वराज्याकडे राहिलेला एकमेव आशेचा किरण म्हणजे सेनापती संताजी घोरपडे.

संताजी घोरपडे हे म्हालोजी घोरपडे यांचे पुत्र. म्हालोजी हे बाजी घोरपडे यांचे बंधू होते. संभाजी महाराजांना मोगलांनी जेव्हा संगमेश्वर येथे वेढा घातला तेव्हा त्यांना प्रतिकार करताना म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले होते.

छत्रपती संभाजी महाराज व आपले वडील म्हालोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घेण्याचा विचार संताजी घोरपडे यांच्या मनात घर करून बसला होता. औरंगजेब हा वढू तुळापूर येथेच छावणी देऊन बसला आहे व तेथून तो महाराष्ट्रातील गड किल्ले घेण्यासाठी सरदारांना पाठवत आहे हे समजल्यावर संताजी घोरपडे यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करून मोगल साम्राज्यास हादरा देण्याचा संकल्प केला.

या ध्येयानुसार संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे आपले सैन्य घेऊन शंभू महादेव डोंगराकडे आले व तेथून असे ठरले की संताजी घोरपडे यांनी थेट बादशाही छावणीवर हल्ला करावा व त्याच वेळी फलटण व बारामती येथे असलेल्या रणमस्तखान व शहाबुद्दीन खान यांचा समाचार धनाजी जाधव यांनी घ्यावा. धनाजी यांनी संताजी घोरपडे यांच्या मदतीस विठोजी चव्हाण व दोन हजार सैन्य दिले याशिवाय संताजी यांचे बंधू बहिर्जी व मालोजी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले.

ही योजना आखण्यापूर्वी संताजी घोरपडे यांनी मोगलांची फौज, त्यांचे मुक्काम, छावणीतील व्यवस्था, झोपण्याच्या जागा व वेळा, पहारे बदलण्याच्या वेळा इत्यादींची पूर्ण माहिती घेतली. यानंतर ते आपल्या स्वारांसहित डोंगरांच्या आश्रयाने जेजुरीस येऊन दिवे घाटाखाली गेले व दाट जंगलात मुक्काम केला. तेथून मध्यरात्री तुळापूरास निघाले या ठिकाणी प्रवेश करताना अचानक समोर छबिन्याचे स्वार समोर आले तेव्हा आपण मुघल लष्करातील पथकातील सैनिक आहोत असे सांगून छावणीत प्रवेश मिळवला.

पुढे जाता जाता जो कोणी चौकशी करी त्यांना तेच कारण देऊन ते हळूहळू औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या मुख्य तंबूकडे पोहोचले आणि मुख्य गोटात शिरून पहारेकर्यांना कापून काढले आणि सर्वात मध्यभागी असलेल्या बादशाही तंबुकडे धाव घेतली. यावेळी सोबत बंधू बहिर्जी घोरपडे व मालोजी घोरपडे आणि उदाजी चव्हाण सुद्धा होते. मात्र औरंगजेबाच्या डेऱ्यात शिरताच त्यांना समजले की औरंगजेब हा डेऱ्यात नव्हता त्यामुळे बादशाहला ठार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. बादशाह ठार झाला असता तर मुघल साम्राज्याचा नाश होण्यास वेळ लागली नसती मात्र आपण येऊन गेल्याचे बादशाहला समजायला हवे म्हणून त्यांनी डेऱ्याचे तणाव तोडले आणि शामियान्यावरील दोन सोन्याचे कळस काढून घेतले आणि समोर जो येईल त्यास कापत कापत संताजी घोरपडे आपल्या सैन्यासह छावणीतून बाहेर आले. 

त्याच रात्री संताजी घोरपडे हे फौजेसहित सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात दाखल झाली व तेथे सिंहगडाचे किल्लेदार व प्रतापराव गुजर यांचे पुत्र सिधोजी गुजर त्यांच्या भेटीस आले तेव्हा संताजी घोरपडे यांनी आपल्या जखमी सैन्याची सुश्रुषा करण्यासाठी जखमी सैन्यास सिधोजी यांच्या हवाली केले व लष्करास दोन दिवसांची विश्रंती देऊन मग थेट रायगडाकडे कूच केले आणि रायगडाला वेढा देऊन बसलेल्या झुल्फिकार खानावर तुटून पडले. या लढाईत त्यांनी मोगलांची जबर हानी करून त्यांचे पाच हत्ती पकडून आणले व तेथून पारघाट चढून वाई व साताऱ्यामार्गे ते पन्हाळ्यास राजाराम महाराजांच्या भेटीस पोहोचते झाले.

संताजी यांनी थेट बादशाही छावणीवर हल्ला करून कळस कापून आणल्याचे वृत्त राजाराम महाराज यांना कळताच ते अत्यंत खुश झाले व संताजी यांना मामलकतमदार म्हणजेच राज्याचा आधार, बहिर्जी घोरपडे याना हिंदुराव, मालोजी घोरपडे यांना अमीर अल उमराव व विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहाद्दूर किताब प्रदान केला.  

छत्रपती राजाराम महाराजांनी १६९१ साली संताजी घोरपडे यांना सरसेनापती हे पद दिले. पदाचा स्वीकार केल्यावर संताजी यांनी २५ हजारांचे घोडदळ घेऊन मुघलांच्या मुलुखातील बुऱ्हाणपुरावर स्वारी केली व तेथून बरीच लूट मिळवली. बुऱ्हाणपूर नंतर त्यांनी नंदुरबारवर स्वारी केली. १६९५ साली संताजी यांनी मुघलांचे महत्वाचे ठिकाण असलेल्या खटावला वेढा घालून त्या शहरास जिंकून घेतले.

याशिवाय कर्नाटक मोहिमेत त्यांनी मुघल सरदार कासीमखान याला दोद्देगिरी पर्यंत मागे पिटाळून लावले व त्याची रसद पूर्णतः बंद केल्याने कासिमखानासहित त्याचे सैन्य मृत्युमुखी पडले. संताजी घोरपडे यांच्या कारकिर्दीत मराठ्यांना एकामागून एक विजय मिळत गेल्याने संताजी यांच्या नावाचा गवगवा प्रचंड प्रमाणात होऊ लागला. शिवाजी महाराजांच्या युद्धशैलीचा वापर करून त्यांनी मराठ्यांना अनेक विजय मिळवून दिले. 

खाफीखान हा मुघल इतिहासकार संताजी यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना लिहितो की, मराठे सरदारांत प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे व धनाजी जाधव होते. त्यांच्याकडे पंधरा वीस हजाराच्या जंगी फौजा होत्या याशिवाय इतर अनेक मराठे सरदार त्यांच्या हाताखाली होते. या दोघांमुळे बादशाही साम्राज्यावर अनेक मोठे आघात झाले. यातही प्रमुख संताजी होता. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्यांचा नाश करणे व नामांकित सेनापतींवर तुटून पडणे यामुळे त्यांची खूपच प्रसिद्धी झाली. 

ज्याचा ज्याचा संताजींसोबत लढाई करण्याचा प्रसंग येई त्याच्या नशिबी पुढीलपैकी एक परिणाम ठरलेला असे, एकतर तो मारला जाई अथवा जखमी होऊन कैदेत सापडे अथवा त्याचा पराभव होऊन त्याचे सैन्य संपुष्टात येई. ज्या ज्या ठिकाणी संताजी युद्धाकरिता जात असत त्यांच्या मुकाबल्यास जाण्यास एकही मुघल सरदार धजावत नसे. संताजींनी शेख निजाम, सर्जाखान, लुत्फुल्लाखान, अलीखान, करीमखान, खानजादखान, जाननिसार खान, तहब्बूरखान, हमीदखान, हिम्मतखान, असदखान, कामबक्ष, झुल्फिकार खान इत्यादी अनेक मुघल सेनानींशी झुंज दिली व अनेकांना रणांगणावर ठार मारले.

संताजींनी मुघलांच्या मनात एवढी भीती निर्माण केली की मुघलांचे घोडे जेव्हा पाणी पीत नसत तेव्हा तुम्हाला पाण्यात संताजी व धनाजी दिसतात काय असे मुघल सैनिक घोडयांना विचारीत. संताजी पराक्रमी असून रणनीतीतज्ञ् होते व प्रतिपक्षाला घेरून पूर्णतः कसे नष्ट करायचे ही कला संताजींमध्ये पुरेपूर होती. शिवाजी महाराजांनी ज्या गनिमी काव्याचा वापर करून गनिमांना धूळ चारली त्याच गनिमीकाव्याचा प्रभावी वापर संताजी यांनी केला.

१६९३ साली झुल्फिकार खानाने अनेक काळ जिंजीस दिलेला वेढा काढावा यासाठी राजाराम महाराज यांनी त्याच्याशी बोलणी केली यानुसार झुल्फिकार खानाने जिंजीचा वेढा उठवून वंदिवाश येथे आपला तळ दिला. या संदर्भात संताजी व इतर मराठे सरदारांना समजल्यावर ते काहीसे नाराज झाले कारण प्रधानांच्या सल्ल्यावर राजाराम महाराजांनी हा तह केला व याबद्दल सेनापती व सरदारांना सांगण्यात आले नव्हते.

राजाराम महाराजांनी मग संताजी यांची समजूत काढून सांगितले की झुल्फिकार खान व माझा गुप्त तह झाला आहे कारण औरंगजेब आता फार काळ जिवंत राहू शकत नाही त्यामुळे तो गेल्यावर गोवळकोंड्याचा प्रदेश झुल्फिकार खान व विजापूरचा प्रदेश मराठ्यांनी घ्यावा असा तह झाला आहे. यानंतर राजाराम महाराजांनी संताजी यांचे समाधान करून त्यांना महाराष्ट्रात पाठवले व जिंजीच्या संग्रामाची समाप्ती झाली.

संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एकत्र येऊन अनेक विजय संपादन केले असले तरी दोघांच्या स्वभावात खूप अंतर होते. संताजी हे शिस्तीचे पालन नेहमी करत त्यामुळे त्यांचे वर्तन न्यायी व कठोर होते या उलट धनाजी जाधव यांचा स्वभाव होता ते बहुअंशी क्षमाशील होते. संताजी घोरपडे यांना एखादा मुद्दा न पटल्यास ते राजाराम महाराजांसोबत सुद्धा वाद विवाद करत त्यामुळे 'राजेश्री स्वामीजवळ मुद्दे न घालता मर्यादेने राहावे' असा उपदेश रामचंद्रपंत अमात्य त्यांना करत.

संताजी यांच्या या स्वभावामुळे एक दिवस बहुदा राजाराम महाराजांसोबतही त्यांचा वाद झाला. जेधे शकवलीत लिहिले आहे की "चैत्रमासी राजाराम महाराजांच्या दर्शनास संताजी घोरपडे चंदीस गेले. ज्येष्ठ मासी बिघडोन कंची अलीकडेच भांडण झाले"

१६९६ मध्ये संताजी घोरपडे राजाराम महाराजांवर नाराज होऊन आपल्या वीस हजार सैन्यासहित किल्ल्याबाहेर पडणे राजाराम महाराजांना आवडले नाही त्यामुळे संताजी स्वतंत्र होण्याचा विचार करत आहेत असे वाटून त्यांनी धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर, हणमंतराव घोरपडे इत्यादी सरदारांसोबत संताजी घोरपड्यांवर हल्ला करण्यासाठी जिंजीबाहेर पडले. कांचीपुरमजवळ ही लढाई झाली मात्र या लढाईत राजाराम महाराजांचा पराभव होऊन अमृतराव निंबाळकर यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले.

दुसऱ्याच दिवशी संताजी घोरपडे आपले हात स्वतःच बांधून राजाराम महाराजांच्या भेटीस गेले आणि झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली. मी तुमचाच सेवक आहे पण तुम्ही धनाजी यांना माझ्याबरोबर दर्जा देत होता म्हणून मला असे करणे भाग पडले असे म्हणून यापुढे तुम्ही जसे सांगाल तसे मी वागेन असे म्हणून त्यांनी राजाराम महाराजांना मुक्त केले आणि जिंजीच्या किल्ल्यात सुखरूप जाण्याची व्यवस्था केली. याचवेळी झुल्फिकार खान हा संताजी यांनी राजाराम महाराजांना आपल्या ताब्यात द्यावे यासाठी प्रयत्न करत होता मात्र संताजी यानी त्याचे प्रलोभन धिक्कारले. 

मात्र यानंतरही दुर्दैवाने राजाराम महाराजांचा संताजी घोरपडे यांच्यावरील लोभ कमी होऊन त्यांनी सेनापती पद धनाजी जाधव यांना देऊन संताजी यांच्याकडील सरदार व सैन्य यांना आपल्याकडे बोलावून घेतले त्यामुळे संताजी घोरपडे यांचे बळ कमी होत गेले. एवढे होऊनही संताजी घोरपडे अपुऱ्या सैन्यबळावर झुल्फिकार खानाशी टक्कर देत राहिले मात्र हळूहळू संताजी त्यांच्याजवळील बरीच फौज काढून घेण्यात आल्याने निराश होऊन संताजी महाराष्ट्राकडे निघाले.

संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाल्यावर राजाराम महाराजांनी धनाजी जाधव व हणमंतराव निंबाळकर यांना त्यांच्या मागावर धाडले. हणमंतराव यांचे बंधू अमृतराव यांना संताजी यांनी हत्तीच्या पायी दिल्याने सुडाची भावना त्यांच्या मनात होती अशावेळी धनाजी यांनी हणमंतराव यांना आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून वेगाने स्वतः संताजींच्या मागावर निघाले. 

कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमाप्रांतात धनाजी यांनी संताजी यांना गाठले व अगोदरच संताजी यांची बरीचशी फौज धनाजी यांना मिळाल्याने व धनाजी यांचीं हणमंतराव यांच्यासोबत असलेली फौज एकत्र येऊन संताजी व त्यांच्या अपुऱ्या फौजेवर तुटून पडली आणि त्यांचा पराभव केला. या लढाईत उरले सुरले सर्व सैन्य परागंदा झाले व सामानही लुटले गेले. 

या नंतर हताश संताजी साताऱ्याजवळील शिंगणापूर येथील डोंगरात आश्रयास आले मात्र धनाजी यांनी अजूनही त्यांची पाठ सोडली नव्हती. इकडे औरंगजेबाच्या हुकुमाने गाजीउद्दीन खान सुद्धा आपली फौज घेऊन संताजी यांच्या मागावर आल्याने एकाबाजूस राजाराम महाराजांची फौज व दुसऱ्या बाजूस मुघलांची फौज अशा दुहेरी पेचात ते सापडले. 

१६९७ च्या आषाढ महिन्यात संताजी शंभू महादेव डोंगरातील आपल्या तळावरून ओढ्यावर आंघोळीस आले व सूर्यास अर्ध्य देण्यासाठी डोळे मिटून पूर्वेस ध्यानस्थ झाले असता जवळपास दबा धरून बसलेल्या मुघल सैन्यातील नागोजी माने यांच्या मारेकऱ्यांनी तलवारीने प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारले व अशा रीतीने खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून तिचे कळस कापणाऱ्या मराठ्यांच्या अतिशय पराक्रमी सेनापतीचा दुर्दैवी मृत्यू झाला.