पुण्याचा मोदी गणपती व खुश्रुशेट मोदी
पुण्याच्या मध्यवस्तीत म्हणजे नारायणपेठेत एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे ज्याचे नाव आहे मोदी गणपती. पुणेकरांसाठी हे नाव नवे नसले तरी पुण्यातील मंदिरांची वैशिट्यपूर्ण नावे पाहता हे नाव सुद्धा थोडे वैशिट्यपूर्णच आहे.
पुण्याच्या मध्यवस्तीत म्हणजे नारायणपेठेत एक प्रसिद्ध गणेश मंदिर आहे ज्याचे नाव आहे मोदी गणपती. पुणेकरांसाठी हे नाव नवे नसले तरी पुण्यातील मंदिरांची वैशिट्यपूर्ण नावे पाहता हे नाव सुद्धा थोडे वैशिट्यपूर्णच आहे. अर्थात जसा पुण्यातील प्रत्येक मंदिराच्या नावामागे एक इतिहास आहे तसाच इतिहास मोदी गणपती या मंदिरासही आहे.
ही गोष्ट आहे पेशवे काळातील. त्याकाळी पेशवे दरबारात ब्रिटिशांचे रेसिडेंट नेमलेले असायचे. अशाच एका रेसिडेंटचा मुख्य एजंट होता गुजरात येथील खंबायतचा खुश्रुशेट मोदी. खुश्रुशेट याचे मूळ नाव होते खुसरवानजी जमशेटजी मोदी. नावावरून हे लक्षात आलंच असेल की खुश्रुशेट हा पारशी होता.
खुश्रुशेट प्रथम रेसिडेंट मॅलेट सोबत पुण्यास आला व नंतर सदाशिव माणकेश्वर यांच्या हाताखाली राहून पेशव्यांच्या बाजूने इंग्रजांकडचे काम करीत असे. पेशवे व इंग्रज या दोघांमध्ये चांगले संबंध राखणे हे याचे मुख्य काम. पेशव्यांनी यास कर्नाटकची जबाबदारी सुद्धा दिली होती नंतर याचे काम पाहून पेशव्यांनी गुजरातमधील एक जहागिरी सुद्धा खुश्रुशेट यास दिली.
रेसिडेंट क्लोज हा हिंदीतील पत्रे ही मोदींमार्फतच धाडत असे मात्र पुढे पुढे पेशवे दरबारातील सदाशिव माणकेश्वर व बायजी नाईक हे पेशवे दरबारातील मोदींचा उत्कर्ष पाहून त्याचा राग करू लागले आणि त्याच्यावर लाच खाल्ल्याचा आरोप लावून दिला. या आरोपातून दुसरे बाजीराव पेशवे यांनी मोदीस सुखरूप बाहेर काढले. १८०५ नंतर ब्रिटिश रेसिडेन्सी अप्रत्यक्षपणे खुश्रुशेट मोदी यांच्याकडेच आली कारण ब्रिटिश रेसिडेंट क्लोज आणि पंतप्रधान दुसरे बाजीराव या दोघांचाही खुश्रुशेट वर दृढ विश्वास होता.
पुढे जेव्हा एल्फिस्टन हा रेसिडेंट झाला तेव्हा त्याचे प्रयत्न पेशवाई उलथवून टाकण्याचेच होते मात्र मोदी हा पेशवाई वाचवण्याचे प्रयत्न करीत आहे असेसुद्धा त्यास समजले त्यामुळे जर मोदीने आपला बेत पंतप्रधानांस सांगितला तर ते सावध होतील त्यामुळे मोदीला तेथून काढून लावण्याचे प्रयत्न एल्फीस्टनने सुरु केले. यासाठी त्याने मोदीस पत्र लिहून सांगितले की तुम्ही एकतर सुभेदारी तरी करा नाहीतरी एजंट पद तरी सांभाळा तेव्हा मोदीने हुशारीने सुभेदार पदाचा राजीनामा दिला व एजंटचे पद स्वतःकडेच ठेवले.
पण पुढे एल्फीस्टनचा हेतू सफल झाला कारण बडोद्याच्या गायकवाडांतर्फे गंगाधरशास्त्री पटवर्धन पुणे येथे आला व त्याने हुशारीने मोदींकडून त्याचे एजंटचे काम काढून घेतले. यामुळे पंतप्रधान दुसरे बाजीराव खूपच हताश झाले. मोदी पेशवाई वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा ठपका एल्फीस्टनने त्यावर लावला मात्र तो सिद्ध झाला नाही. अखेर ब्रिटिशांकडून तुम्ही राजधानी पुणे येथे खूप काळ काढलात आता आपल्या मूळ गावी म्हणजे गुजरातला परत जा असा आदेश देण्यात आला.
मोदीस खरं तर पुणे सोडून जायचे नव्हते त्यामुळे आदेश आल्यावरही तो काही काळ पुण्यातच होता. मात्र नंतर नाईलाज होऊन त्याने पुणे सोडण्याचा बेत केला आणि यानंतर दोन तीन दिवसांतच त्याचा गूढ मृत्यू झाला. अनेकांच्या मते तो विषप्रयोग होता मात्र खरे कारण कुणालाच समजले नाही. पुण्याच्या नारायण पेठेतील मोदी गणपती हे गणेश मंदिर खुश्रुशेट यानेच बांधले होते त्यामुळे मोदी केव्हाच काळाच्या ओघात गुप्त झाला तरी मोदी गणपती हे नाव त्याची स्मृती कायम ठेवून आहे.