सॉलिस्टीस अ‍ॅट पानिपत

उदय स.कुलकर्णी यांनी लिहलेल्या पानिपतच्या मोहिमेचा वस्तुनिष्ठ वृत्तांत हा ऐतिहासिक मौल्यवान ग्रंथ माझ्या हाती आला तो ग्रंथकर्त्या उदयराव कुलकर्णी सरांच्या हातून हे माझेसाठी अविस्मरणीय आनंदाचा ठेवा होय.

सॉलिस्टीस अ‍ॅट पानिपत
सॉलिस्टीस अ‍ॅट पानिपत

पानिपतच्या विजयानंतर अहमदशहा अब्दाली २० मार्च १७६१ ला मायदेशी जाण्यापूर्वी पेशवे नानासाहेब यांना पाठविलेले पत्र आहे त्यातील उल्लेख फार महत्त्वाचे आहेत कारण जरी मराठे लढाई हरले असले तरी जेता आपल्या पत्रात म्हणतो," या युद्धातील तुमच्या हानीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.हिंदुस्थानच्या कारभाराची सूत्रं आम्ही तुमच्या हाती सोपवायला तयार आहोत.तुम्ही या शोचनीय घटना विसरून जा आणि आमच्याशी निरंतर मैत्री ठेवा,अशी आमची कळकळीची विनंती आहे."

मी माझ्या आयुष्यात जे काही थोडेफार वाचले आहे, त्याने मला भरपूर काही दिले आहे याची मला जाणीव आहे परंतु त्यापैकी माझ्या मनपटलावर जी कायमची कोरली गेलेली मोजकी ग्रंथसंपदा आहे त्यात. उदयरावांचे "सॉलिस्टीस अ‍ॅट पानिपत" हे एक निश्चितपणे सांगता येईल.

जेष्ठ इतिहास संशोधक, शिवभुषण निनादजी बेडेकरांची प्रस्तावना म्हणजे शब्दरुपी अंलकाराचे लेणं या संदर्भ ग्रंथास चपलख बसते. अनेक रंगीत रेखाचित्रे, नकाशे, प्रमुख व्यक्तिरेखा ( मोगल बादशहा / वजीर सरदार) ,छत्रपती (सरदार /पेशवे ) जाट, इराणी इत्यादींची यादी. कालसुचि (छ.शिवाजी महाराज ते माधवराव पेशवे मृत्यू)

औरंगजेबांच्या मृत्यू पासून सुरू झालेल्या घटनेत पानिपतच्या रणसंग्रामाची बीज रोपण होतानाचा कालखंड साधार मांडला आहे. तीन विभागात किंवा खंडात ग्रंथाची मांडणी आहे.

मराठे, मोगल, अफगाणी, रोहीले, जाट, इराणी इत्यादींची या युद्धातील भूमिका व त्यामागील यथार्थ कारणमिमांसा पानिपत का व कसे घडले हे विशद करते. मराठी सैन्य व अब्दाली सैन्य यांची बलस्थानांची व उणीवा ओघवत्या शेलीने मांडल्या आहेत.

प्रत्येक योद्ध्यांची मानसिक अवस्था व त्याची त्यापाठीमागे असलेली कारणे सप्रमाण मांडल्याने युद्धभूमीची रचना लक्षात येते.

पेशवे नानासाहेब, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर, दत्ताजी व जनकोजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, दमाजी थोरात व प्रमुख व्यक्तींची हालचाल किंवा कृती डोळ्यासमोर उभी रहाते.सदाशिवराव भाऊच्या मनात चाललेली विचारांची व प्रसंगाची मांडणी त्यांनी केलेल्या पत्र व्यवहारातून ओघाने स्पष्ट होते.

पानिपतच्या तो मराठ्यांनी खोदलेला खंदक, अब्दालीचे सैन्य, युद्धात पराक्रम करणारे योद्धे डोळ्यासमोर लढाई करताना दिसतात.भाऊंची छावणी ज्या आंब्याच्या झाडाखाली असलेला "काला आम" झाड, बू अली कलंदर दर्गा, बुराडी घाट आणि सर्व काही समजून घेता येते. त्याकाळातील एकमेकांशी झालेला पत्रव्यवहार, विविध बखरीतील उल्लेख, कैफियती , करार, तहनामा यांचे विवेचन अनमोल आहे.

या संदर्भ ग्रंथाबद्दल काय लिहावे हा मोठा प्रश्नच आहे कारण यातील प्रत्येक पान, प्रत्येक वाक्य हे महत्त्वाचे आहे.पानिपतच्या युद्धाचा जमा-खर्च हिशोब मा.बलकडेंच्या अथक मेहनतीची फलश्रूती ती या ग्रंथात समाविष्ट केली आहे.

मा.उदयराव स. कुलकर्णी सरांनी अतिशय कष्ट घेऊन विविध भाषातील साधनांचा सखोल अभ्यासातून हा ग्रंथ निर्माण केल्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद व शुभेच्छा देतो. या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद करणारे. विजय बापये यांना धन्यवाद. मुळा मुठा प्रकाशन संस्थेच्या सर्वांनी एक सुबक, सुरेख मांडणीतील विश्वसनीय ग्रंथ निर्माण केल्याने ते अभिनंदनाचे नक्कीच मानकरी आहेत. मा.कुलकर्णी सरांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो.

(विशेष विनंती = पानिपतची शौर्यगाथा यथार्थ समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या घरी.उदय स.कुलकर्णी सरांचे "सॉलिस्टीस अ‍ॅट पानिपत" हे असायला हवे.)

- श्री सुरेश नारायण शिंदे (भोर)