द इरा आॕफ बाजीराव

मुळ इंग्रजी संदर्भग्रंथाचे लेखक इतिहास संशोधक डाॕ.उदयराव स. कुलकर्णी. डाॕ.कुलकर्णी हे भारतीय नौदलात सोळा वर्षे सेवा करून ते सर्जन कमांडर या पदावर असताना स्वेच्छानिवृत्ति घेऊन सध्या पुणेस्थित वैद्यकीय सेवा देत आहेत.

द इरा आॕफ बाजीराव

श्री.कुलकर्णी सरांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद डाॕ. विजय बापये (शल्यचिकित्सक व "कहानी शस्त्रक्रियेची" या पुस्तकाचे लेखक ) यांनी मराठी भाषेतील सौंदर्य अलंकारीत भाषेत केला आहे. श्री. कुलकर्णी सरांच्या इंग्रजी भाषेतील लिखाणातील उत्कट भावना मराठीत ज्या ताकदीने डाॕ.बापये यांनी प्रगट केल्या आहेत त्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद व अभिनंदन.

अठराव्या शतकाच्या पूर्वार्धातील पेशवा बाजीराव बाळाजी यांच्या जीवनचरित्रामुळे या कालखंडास 'बाजीराव पर्व' या नावाने संबोधण्यात येते. द इरा आॕफ बाजीराव ही बाजीराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा वृत्तांत म्हणजेच दख्खनच्या साम्राज्याचा वृत्तांत होय. ह्या संदर्भग्रंथाच्या सुरवातीस १३८ प्रमुख व्यक्तिरेखांचा अल्प परिचय, १६३० शिवजन्म ते १७४० चिमाजीअप्पा मृत्यूपर्यतची कालसूची व महत्त्वाच्या काही वंशावळीने होतो. त्यानंतर ग्रंथातील पाच खंडातील पहिला खंड - काळरात्र, तर दुसरा झुंझुरका व पुढे तीन क्रमाने आहेत. यातील झुंझुरका हा शब्द माझ्या अनोळखीचा. हा शब्द ग्रामीण भागात अपभ्रंश स्वरूपात वापरतात याची आठवण मला झाली. शेतकरी कुटुंबातील व्यक्ति ही पहाटेच्यावेळी शेतातील कामानिमित्त पहाटे घरातून बाहेर पडते तेव्हा ना पूर्ण रात्र, ना पूर्ण दिवस असतो, अशावेळी तो झुंजूमुंजूच्या वेळी बाहेर पडलो असे इतरांना सांगतो. माझ्या मते झुंझुरका व झुंजूमुंजू हे एकच असावेत.

साधारणतः कोणत्याही चरित्राची सुरवात ज्या पारंपारिक पद्धतीने होत असते, त्याऐवजी ग्रंथकर्त्याने त्यात अमुलाग्र बदल केल्याचे स्पष्टपणे जाणवते. चरित्र लेखक हा चरित्र नायकाचा सूत्रधार असतो, आणि तो ते सर्व प्रसंग कथन करीत असतो, तो या ग्रंथात नाही. येथे सूत्रधारची भूमिका प्राचीन रेवा म्हणजेच आजची नर्मदानदी ही आहे कारण या नदीच्या आसपासच्या भागात किंवा तिला ओलांडून पेशवा बाजीराव यांनी यशकार्य संपन्न केले आहे. नर्मदानदी आणि पेशवा बाजीराव ह्यांचा एकमेकांशी सर्वात दीर्घकाळ सहवास/ संपर्क राहिला आहे, म्हणूनच त्यांचे चरित्र सांगण्याचा अधिकार तिचा आहे ही जाणीव नक्कीच ग्रंथकर्त्यास झाली असावी असे मला वाटते. अगदी बाजीराव पेशव्यांनी इहलोकीची यात्रा देखील मध्य प्रदेश मधील रावेरखेडी म्हणजेच नर्मदानदीतीरावर संपली, इतके अतूट नातेसंबंध होते.

वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी पित्याचे छत्र हरपले व त्यांच्या जागी पेशवेपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली.१७२० ते १७४० या अवघ्या वीस वर्षात जे यश संपादले ते अलौकिक होते. १७२७ पर्यंत म्हणजेच पहिली सात वर्षे राजकीय शक्तींचे सखोल परिक्षण करून पुढील तेरा वर्षात पराक्रमाचा झंजावात संपूर्ण हिंदुस्थानभर केला.

या ग्रंथात चरित्रनायकाच्या कालखंडातील मराठी, इंग्रजी, फारसी, राजपूत, पोर्तुगीज भाषेतील पत्र, उतारे इत्यादींची सविस्तर माहिती वाचकांना व अभ्यासकांना दिली असून हंसक्षीर न्यायाने सुज्ञांनी घेण्याची अपेक्षा केली असावी असे वाटते. उदाहरणार्थ ग्रंथातील चढता सूर्य - खंड ३ मधील डभई प्रकरण आहे. १ एप्रिल १७३१ रोजी पेशवा बाजीराव सैन्य व त्रिबंकजी दाभाडे सैन्य यांचा डभई येथे संघर्ष होऊन त्रिबंकजी कामी आले. अशावेळी शोकमग्न उमाबाईसाहेब यांच्या सांत्वनाकरिता छ.शाहू महाराज तळेगाव दाभाडे येथे आले. त्याच्या सोबत पेशवा हजर नव्हते असा उल्लेख असून पुढे दाभाडे बखरीत स्वतः पेशवा बाजीराव हजर होते असा उल्लेख केलेला आहे. दोन परस्पर विरोधी मते ग्रंथकर्त्याने देऊन वाचकांनी काय घ्यायचे असे सुचविले तर नाही ना?

५ एप्रिल १७३७ ला पेशवा बाजीराव यांनी आपले धाकटे बन्धू चिमाजीअप्पा यांना पाठविलेल्या पत्रात म्हणतात," मोगली कारभार आपण ऐकत जाणत आहा.करावे थोडे, लिहावे फार. पातशहास सत्य भासले ते मिथ्या केले पाहिजे ." ह्या पत्रातून त्यांच्या कार्येकर्तृत्वाचा आवाका सहजपणे लक्षात येतो तर दुसऱ्या ठिकाणीच्या दुसऱ्या प्रसंगी ,"राजकारणाचा दोर तुटू न देणे" ही जाणतेपणाची भूमिका अधोरेखित होते. छ. शाहू महाराजांनी पेशवा बाजीराव बद्दल म्हटले आहे कि, एका बाजूला लाख व एका बाजूला एकटा बाजीराव असेल तर मी बाजीरावाची निवड करेल. छत्रपति शाहू महाराजांनी व्यक्त केलेले मत हे पेशव्यांच्या शक्तिचे प्रतिकच आहे, सन्मान आहे असे मनापासून वाटते. अठराव्या शतकातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा परिचय, पेशव्यांचे लहान बन्धू चिमाजीअप्पा यांचे कर्तृत्व, अनेक तत्कालीन साधनांच्या आधारे मांडलेला दख्खनचा वृत्तांत मनास भावतो. सरदार मल्हारराव होळकर, सरदार राणोजी शिंदे, पिलाजीराव जाधवराव, मस्तानी अशा अनेक तत्कालीन व्यक्तिविशेषांचा साधार परिचय होतो. एक नवी दिशा, नवा विचार नक्कीच या ग्रंथाने मिळतो असे मत झाले आहे.अनेक रंगीत प्रकाशचित्रे, पुरक नकाशे आपणांस सहजच त्या ठिकाणी घेऊन जातात.

दि.१५/११/२०२० रोजी डाॕ.उदयराव स.कुलकर्णी यांनी हा ग्रंथ मला त्यांच्या हस्ते त्यांनी दीपावली भेट म्हणून दिला हा माझ्यासाठी संस्मरणीय ठेवा. ग्रंथकर्त्या डाॕ.उदयरावांचे, अनुवादक डाॕ.बापये व मुळा मुठा पब्लिकेशनचे शतशः धन्यवाद व मनापासून शुभेच्छा.

( ग्रंथ वाचून माझे झालेले वैयक्तिक मत मांडले असून यात मतभिन्नता असू शकते. हा संदर्भग्रंथ पुण्यामधे रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक येथे विक्रीस उपलब्ध आहे. तसेच Amazon वर देखील आहे.)

- सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])