शिवपत्नी पट्टराणी सोयराबाई

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू. या एका नावात महाराष्ट्र राज्याची ओळख होते.

शिवपत्नी पट्टराणी सोयराबाई

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

हिंदू सेनापती असा त्यांचा उल्लेख ब्रिटिशांनी केला असला तरी ते जागतिक स्तरावरील अलौकिक असे व्यक्तिमत्त्व होते हे निर्विवाद सत्य आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर विपुल लिखाण झाले आहे परंतु तितकेसे सुराज्यासाठी केलेल्या परिश्रमांवर झालेले नाही. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून उमटणारा प्रेरणादायी मंत्र म्हणजे “जय भवानी जय शिवाजी." या गर्जनेत मराठी माणूस जगला आणि इहलोकीची यात्रा देखील संपविली. आमच्या श्वासात छत्रपती शिवाजी असे काहीसे आहेत. हिमालयाची उंची देखील कमी वाटावी इतके अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज .

स्वराज्य स्थापनेत मावळ्यांनी दिलेले नि:स्पृह योगदान सह्याद्रीच्या भूमीने पाहिले आहे. तर भोसले कुटुंबातील व्यक्तींचे समर्पण काहीसे अपरिचित राहिले आहे. अशा पैकीच एक असलेल्या व अनेक दोषारोपांच्या धनी असलेल्या सकल सौभाग्यवती महाराणी सोयराबाई साहेब हे उपेक्षित व्यक्तिमत्त्व.

इतिहास संशोधक व अभ्यासक यांची प्रतारणा वाट्याला आल्याने सामान्यजनांच्या मनांत फक्त खलनायिका म्हणून निंदेचा विषय ठरलेल्या सोयराबाईसाहेब यांच्याबद्दल फारसे लिखाण झाले नाही आणि जे थोडेफार झाले ते देखील नकारात्मक विचार घेऊनच. कोणतीही व्यक्ती ही पूर्णत: चांगली वा वाईट असू शकत नाही हा निसर्ग नियम कसा काय विस्मरणात जातो याचे आश्चर्य वाटते.

श्री. तोरस्कर सरांनी अशा दुर्लक्षित विषयावर एक कादंबरी लिहावी ही माझ्यासारखा सामान्य इतिहासप्रेमी माणसाला पडलेले कोडे होते. अशा दुर्लक्षित विषयाला हात घालणारे तोरस्कर, विषय निवडीसाठी नक्कीचे कौतुकाचे धनी होतात, पण ही चांगली संधी नकळत त्यांच्या हातातून निसटून गेली हे म्हणणे नैसर्गिक होईल.
 

कादंबरीसच वस्तुनिष्ठ इतिहास म्हणणे अनुचित आहे, पण कादंबरीला सत्य इतिहास समजून असतो. त्यातून तो बाहेर येणे कठीण काम वाटते. अर्थात ही माझी वैयक्तिक भावना व्यक्त केली. प्राचीन जन्मदात्री ही आपल्या मुलासाठी दिव्य करण्यास सिद्ध असल्याची अनेक सापडतात. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामाचा चौदा वर्षांचा वनवासन अपत्य मोहाचे फळित नव्हते काय? पुत्रप्रेम हे मातेला अशा सारासार विचारशक्तीपासून अलग करते.
 

तोरस्कर हे पेशाने हाडाचे शिक्षक, त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयाने ज्ञान दिलेले, या कादंबरीच्या पानापानांत, प्रसंगात त्यांनी वापरलेले मराठी भाषेतील सौंदर्य असणारे शब्दप्रयोग एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. दोन पात्रांतील संवादांत मानवी मनांचे व विचारांचे अनेक कंगोरे अभ्यासले असल्याचे दृष्टिस येते. समृद्ध शब्दकोश परिणामकारक मांडणी वाचकांना नक्कीच उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी होईल. ही कादंबरी म्हणजे त्यांनी समाजातील अनेक व्यक्तींचा सूक्ष्मपणे केलेल्या निरीक्षणांचा परिपाक होय. शिवपत्नी पट्टराणी सोयराबाईही कादंबरी वाचकांना ऐतिहासिक वाचनास गोडी निर्माण करू शकेल तर तोरस्करांना आणखी साहित्यिक उर्जा देईल अशी सदिच्छा व्यक्त करून विराम देतो. बहुत । काय लिहिणे!

- सुरेश नारायण शिंदे (भोर)