पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास

चिंचवडमधील मुख्य देवस्थान मोरया गोसावींनी स्थापित केलेले श्री गणेश देवस्थान हे असून ते गावाच्या दक्षिण दिशेस आहे. त्यास पूर्वी 'वाडा' या नावानेही ओळखले जात असे.

पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास

पुणे जिल्ह्यातील एक प्रगत व औद्योगिक महानगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर प्रसिद्ध आहे. पुणे शहरानंतर लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक दोन वर असलेल्या या जुळ्या शहराचा इतिहासही तितकाच वैभवशाली आहे व याचे कारण म्हणजे चिंचवडचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व. आज चिंचवड शहराचे पुरातन रूप शहरीकरणात हरवून गेले असले तरी या शहराचा इतिहास ऐकून आजही त्या काळात जाण्याची इच्छा जागृत होते.

पुण्यातील प्रसिद्ध अशा पवना नदीच्या तीरावर चिंचवड वसले असून पूर्वी चिंचवडास चिंचवाडी या नावानेही ओळखले जात असे. या गावास चिंचवड हे नावं पाडण्याचे कारण म्हणजे पूर्वी येथे चिंचेची व वडाची झाडे अत्यंत विपुल प्रमाणात होती व गावाभोवती अत्यंत घनदाट अरण्य होते.

चिंचवड हे गाव मावळ प्रांतात येत असल्याने गावाची जमीन ही अत्यंत सुपीक अशी होती व गावाच्या सभोवतालचा प्रदेश थोडा डोंगराळ तर थोडा सपाट असल्याने कृषीसाठी हा प्रदेश अत्यंत दर्जेदार होता व या गावाची जीवन वाहिनी पवना नदी ही गावालाच वळसा घालून गेली असल्याने तिचे अमृततुल्य पाणी या परिसरातील नागरिक शेतीसाठी व पिण्यासाठी वापरत.

काही शे वर्षांपूर्वी चिंचवड हे त्या परिसरातील गावांसाठी एक प्रमुख शहर होते त्यामुळे विविध जाती धर्माचे लोक चिंचवड येथे कालानुरूप येऊन स्थायिक झाले व चिंचवडची वस्ती उत्तरोत्तर वाढत गेली व मूळ गावाच्या वेशीबाहेर सुद्धा लोकवस्ती होऊन त्या ठिकाणी एकमोठी बाजारपेठ निर्माण झाली.  गावाभोवती पूर्वी एक तटबंदी होती व काही वर्षांमागे या तटबंदीचे अवशेष पाहावयास मिळायचे.

मध्ययुगात चिंचवडचे धार्मिक महत्व वाढण्याचे कारण म्हणजे सोळाव्या शतकातील एक मोठे गणेशभक्त संत श्री मोरया गोसावी यांचा चिंचवड क्षेत्री झालेला कायमस्वरूपी निवास. मोरया गोसावी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे झाला होता व मोरगाव येथे अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेल्या मयूरेश्वराची स्थापना ही मोरया गोसावी यांनीच केली होती.

मोरया गोसावींनी आपला जीवनकाल मोरगाव येथेच  गणेशभक्तीमध्ये व्यतीत केल्यावर त्यांच्या वार्धक्यकाळी एके दिवशी त्यांना श्रीगणेशाने दर्शन दिले व म्हणाले की तुझी वारी आता मला पावली, तुझा वृद्धापकाळ झाल्याने माझी वारी करताना तुझे खूप हाल होतात ते मला पाहवत नाहीत त्यामुळे आता मीच तुझ्या घरी येऊन राहतो. उद्या सकाळी कऱ्हा नदीतील गणेशकुंडात स्नान करीत असताना तुला जो प्रसाद प्राप्त होईल ते माझे स्वरूपच आहे त्यामुळे तू त्यास घेऊन मागे न पाहता थेट चिंचवड येथे जा, असे बोलून श्रीगणेश अंतर्धान पावले.

दुसऱ्या मोरया गोसावी कऱ्हानदीवर नित्य स्नानासाठी गेले त्यावेळी गणेशकुंडात डुबकी मारून वर येत असताना त्यांच्या ओंजळीत तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती आली व यानंतर त्यांनी चिंचवडला प्रस्थान केले. चिंचवड येथे आल्यावर नागरिकांनी मोरया गोसावींचे मोठे स्वागत केले व यानंतर गणेशाच्या प्रसादमूर्तीची स्थापना मोरया गोसावींनी चिंचवड येथे केली व तिची नित्य पूजा करू लागले. शके १४८१ मध्ये मोरया गोसावी यांनी चिंचवड येथेच संजीवन समाधी घेतली. मोरया गोसावी संस्थानामुळे चिंचवड हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. गणेशोत्सवात आपण जे 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष आजही करतो त्यातील मोरया म्हणजे मोरया गोसावी हेच होत.

चिंचवडमधील मुख्य देवस्थान मोरया गोसावींनी स्थापित केलेले श्री गणेश देवस्थान हे असून ते चिंचवडच्या दक्षिण दिशेस आहे. त्यास पूर्वी 'वाडा' या नावानेही ओळखले जात असे. त्याकाळी या देवस्थानास संस्थानाचा दर्जा असून वाड्यातच संस्थानाची कचेरी होती. मंदिरासमोर पवना नदीच्या पात्रात मोरया गोसावी व त्यांच्या पुढील सात वंशजांची समाधी स्थाने आहेत. मंदिराच्या सभोवताली पाषाणाचा एक भक्कम तट असून मंदिराच्या दक्षिणेस आणि उत्तरेस पूर्वी मोठी पटांगणे होती. गणपती देवालयाच्या मागे पवना नदीच्या तीरावर भाविकांसाठी घाटांची निर्मिती करण्यात आली होती व हा परिसर सदासर्वदा गणेशभक्तांनी फुललेला असे.

गणेश मंदिराव्यतिरिक्त चिंचवड मध्ये पूर्वी देवतांची विपुल देवालये होती व त्यामध्ये श्री मारुती व श्री भैरवनाथ ही देवालये प्रख्यात होती. या मंदिराच्या उत्सवास पूर्वी मोरया गोसावी संस्थानातून देणगी देण्याची परंपरा होती. श्री गणेश मंदिराच्या उत्तर दिशेस दोन ऐतिहासिक खडक आहेत ज्यांना राजबिंडा या नावाने ओळखले जात असे व या खडकांचे महत्व म्हणजे या ठिकाणी मोरया गोसावी यांचे वंशज धरणीधर महाराज देव आणि छत्रपती शाहू महाराज (सातारा) यांची भेट झाली होती. चिंचवड येथे श्री मोरया गोसावी यांचे वंशज चिंतामणी देव त्यांची व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची ऐतिहासिक भेटही झाली होती.

चिंचवड येथे पूर्वी जकात नाके असून नाणे पाडण्याची एक टांकसाळ सुद्धा होती व या टांकसाळेत तयार होणाऱ्या नेण्यास चिंचवडी रुपया असे नाव होते. तर असे हे श्री मोरया गोसावींच्या वास्तव्याने पावन झालेले तीर्थक्षेत्र चिंचवड आज आधुनिक काळात आपली जुनी ओळख हरवून बसले असले तरी आजही या शहराच्या अंतरंगात डोकावून पहिले असता चिंचवडच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला जुन्या काळात घेऊन जातात.