छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व

एका अस्सल संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची अनेक वैशिट्ये आढळतात जी इतर कुठल्याच ऐतिहासिक साधनांत सहसा आढळत नाहीत आणि लेखाच्या विषयानुसार याच ग्रंथात संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे व त्यांच्या व्यायामाच्या आवडीचे अतिशय उपयुक्त असे वर्णन आले आहे ते या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व
छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रीय जनतेच्या मनात ज्यांच्याविषयी नितांत प्रेम व आदर आहे ते म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. १६८१ ते १६८९ या अवघ्या नऊ वर्षांच्या काळात  त्यांनी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती म्हणून जे अद्वितीय कार्य केले ते आजही प्रेरणा घेण्यासारखेच आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा ३२ वर्षांचा काळ हा खऱ्या अर्थी एक भारावलेला काळ होता व या काळात घडलेल्या विविध प्रसंगांत शंभूराजांनी आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमाने एक आदर्श निर्माण केला.

शंभूराजांचा प्रभाव यामुळेच आजही तरुण पिढीवर प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेण्यास अनेक जण सदैव उत्सुक असतात मात्र शंभूराजे हे आपल्याला इतिहासाच्या साधनांतून दिसण्यापेक्षा सत्यास कल्पनांची जोड असलेल्या कादंबऱ्या, मालिका, चित्रपट यातूनच जास्त दिसल्याने त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी सत्याऐवजी आख्यायिकाच अधिक प्रचलित असलेल्या दिसून येतात.

छत्रपती संभाजी महाराजांची शरीरयष्टी कशी होती अथवा ते नियमित व्यायाम करायचे का यावर समाज माध्यमांवर अनेक लेख येत असतात मात्र जर या लेखांना संदर्भाची जोड लाभली तर संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थी जनमानसात कोरले जाईल व यावर कुठल्याच आक्षेपांना स्थान राहणार नाही.

याकरिता आम्ही इतिहासाच्या एका अस्सल अशा साधनातून शंभू महाराजांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि त्यांची व्यायामाची आवड यांस दुजोरा देणारा एक उल्लेख या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.

शिवरायांच्या समकालीन असलेले कवींद्र परमानंद नेवासकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर श्री शिवभारत हे शिवछत्रपतींचे संस्कृत चरित्र लिहिले जे शिवचरित्राचे एक अस्सल साधन मानले जाते. कवींद्र परमानंद हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील असले तरी पुढे त्यांचे वास्तव्य हे त्यांच्या मृत्यूपर्यंत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झाले.

कवींद्र परमानंद यांना देवदत्त परमानंद नावाचे एक पुत्र होते व त्यांनीही आपल्या पित्याचा लिखाणाचा वारसा घेतला होता आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचे समकालीन होते. छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या वडिलांप्रमाणेच कलेस राजाश्रय देणारे असल्याने त्यांच्या सूचनेनुसार देवदत्त यांनी अनुपुराण हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्राचे कथन करणारा संस्कृत ग्रंथ लिहिला जो पुढे देवदत्त यांचे पुत्र गोविंद परमानंद यांनी पूर्ण केला.

अनुपुराण या संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची अनेक वैशिट्ये आढळतात जी इतर कुठल्याच ऐतिहासिक साधनांत सहसा आढळत नाहीत आणि लेखाच्या विषयानुसार याच ग्रंथात संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे व त्यांच्या व्यायामाच्या आवडीचे अतिशय उपयुक्त असे वर्णन आले आहे ते पुढे जाणून घेऊ.

तर ही घटना आहे शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेस प्रस्थान करण्यापूर्वीची. या मोहिमेची तयारी करण्यासाठी महाराजांनी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर दरबाराचे आयोजन केले होते व या दरबारास राज्याच्या विविध भागातून अनेक जण उपस्थित होते. या दरबाराची सुरुवात नुकतीच झाली होती आणि त्याच वेळी आपल्या वडिलांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने युवराज शंभूराजे दरबाराच्या दिशेने आले व या प्रसंगाचे वर्णन अनुपुराणात खालीलप्रमाणे आहे. 

व्यायामभवनात्सद्यो विनिर्यातो जितश्रमः । प्रसादमधुरस्मेरवदनो मदनोपमः ।। १६ पाणिना चापमेकेन शरान्पञ्चापरेण च । कलयन्वलयं भूमे: सद्योऽवितुमिवोद्यत: ।। १७ अररव्यायतोरस्क:प्रोच्चस्कन्ध: सलोचनः । विचक्षणः क्षमाशाली महासत्त्वःसुलक्षण: ।। १८ अतृप्तानामिवोपेत्य भूयो भूयो प्रपश्यताम । आददानो दगन्तेन समन्तान्नमता नताः ।। १९ अतीव विनयोपेतैः सवयोभिः स्मयोज्झितैः । सुवेषैः पञ्चषैः सम्यगनुयातो महामनाः ।।

वरील मूळ संस्कृत भाषेतील श्लोकाचे मराठीतील भाषांतर हे पुढीलप्रमाणे आहे..

"इतक्यात व्यायामशाळेतून परिश्रम केलेले मधुर हसऱ्या चेहऱ्याचे, मदनाप्रमाणे सुंदर असे शंभूराजे आले. त्यांच्या एका हातात धनुष्य आणि दुसऱ्या हातात पाच बाण होते. हातातील वळे खेळवीत ते जणू भूमीचे रक्षण करण्यास उद्युक्त झाले होते. कपाटाप्रमाणे भक्कम छाती असलेले, उंच खांदे व सुंदर डोळे असलेले अत्यंत हुशार, क्षमाशाली, महाधीराचे, सुलक्षणी असे ते (शंभूराजे) सर्व बाजुंनी मिळणाऱ्या नमस्कारांचा आपल्या कटाक्षाने स्वीकार करत होते व त्या मोठ्या मनाच्या शंभूराजांच्या मागून सुवेश धारण केलेले शिस्तबद्ध, विनयशील, निगर्वी असे त्यांचे मित्र येत होते."

या ओळींमधून छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कसे होते हे प्रत्यक्षात आपल्या डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लौकिक अर्थाने सर्वांसमोर यावे यासाठी ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दुर्मिळ कांगोरे शोधणे हे समस्त मराठी इतिहासप्रेमींचे व अभ्यासकांचे आद्य कर्तव्य आहे.