अफजलखान वधास कारणीभूत त्याचाच इतिहास
शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अतिशय महत्वाचा प्रसंग म्हणजे अफजलखानाचा वध. आजही हा प्रसंग वाचताना आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

अफजलखानाचा वध हा आदिलशाहीची प्रचंड हानी करणारा होता. गेली अनेक वर्षे इतिहास अभ्यासक या प्रसंगाची वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा करीत आले आहेत. यामध्ये विरोधाभासी लिखाण प्रचंड दिसून येते. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीप्रसंगी झालेला हा प्रसंग, त्यामागील कारणे, त्याचे भविष्यातील परिणाम असे विविध प्रकारचे लिखाण या विषयावर झाले आहे. मात्र अफजलखानाचा यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास शिवाजी महाराजांनी जे केले ते बिलकुल योग्यच होते हे आपल्याला समजून येते.
या लेखात आपण अफजलखान वधाच्या प्रसंगावर फार चर्चा ना करता अफजलखानाच्या चरित्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू. कारण त्याच्या चरित्रातच त्याच्या वधाची पार्श्वभूमी आहे. अफजलखानाचे कुटुंब आदिलशाही भटारखान्यात कार्यरत होते. अफजलखानाचे वडील आदिलशाहच्या मुदपाकखान्याचे देखरेखीचे काम पहात.
शरीरयष्टीने अतिशय धिप्पाड असा अफजलखान आदिलशाही काळात खूप नावारूपास आला. आदिलशाहच्या अव्वल दर्जाच्या सरदारांमध्ये अफजलखानाची गणना होत असे. १६४४ साली वाईचा सुभेदार रणदुल्लाखान याचा मृत्यू झाला यानंतर वाईची सुभेदारी अफजलखानाकडे आली. त्यापूर्वी तो चौल येथेही मोठ्या पदावर होता असे उल्लेख सापडतात. म्हणजेच कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीबद्दल अफझलखानास विपुल अशी माहिती होती. वाईची सुभेदारी करीत असताना वेगवेगळ्या देवस्थानांची उत्पन्ने चालवण्याबद्दल याची पत्रे मिळून येतात. एखाद्या भागाची धार्मिक अथवा सांस्कृतिक पार्श्वभूमी ओळखुन आपले कार्य करून घेणे ही कला अफलखानास चांगली अवगत असावी.
मात्र याबरोबर त्याच्या अंगी असणारा एक अवगुण म्हणजे समोरच्याला दिलेले वचन मोडून अचानक घात करणे. त्याच्या या कारनाम्यांमुळे आदिलशाही दरबारातही तो कुख्यात होता व इतर सरदार त्याच्याशी सलगी करण्यास कचरत. १६३८ सालची एक घटना त्यास कारणीभूत ठरली. त्याकाळी मुहम्मद आदिलशहाची कारकीर्द सुरु होती व कर्नाटक मोहीम सुरु होती. मुख्य सेनापती रणदुल्लाखान असून त्याच्या साथीस अफजलखान आणि शहाजी महाराज होते. मोहीम सुरु झाल्यावर रणदुल्लाखान याने अफझलखानास शिरे येथे पाठविले. शिरे हा नायक सरदार कस्तुरीजंग याचा मजबूत प्रदेश असून एका बळकट किल्ल्याच्या आश्रयाने ते आदिलशाही सैन्यासोबत लढत होते. अफजलखानाने किल्ल्यास वेढा घालून कस्तुरीजंग याची नाकेबंदी केली यामुळे कस्तुरीजंग संकटात सापडून त्याने अफजलखानाकडे तहाची बोलणी सुरु केली. अफजलखानाने त्यास अभय वचन देऊन भेटण्यास किल्ल्याखाली बोलावून घेतले. त्याच्यावर विश्वास ठेवून नायक त्यास किल्ल्याबाहेर येऊन भेटला आणि अफजलखानाने दग्यानें त्याचा शिरच्छेद करून त्याची सारी संपत्ती घेऊन पुढील मोहिमेस प्रयाण केले. त्याने केलेली ही कृती आदिलशाही दरबारातही अनेकांना आवडली नाही मात्र याबद्दल कुणी काही म्हटले नाही कारण अफजलखान याने आदिलशाही सत्तेस विजय मिळवून दिला होता.
पुढे एकदा मीरजुमला, मुस्तफाखान, असदखान, रुस्तुमेजमा आणि शहाजी राजे हे जिंजीवर चाल करून गेले असताना तेथे मुस्तफाखान याच्या काही धोरणांस इतर सरदारांनी विरोध केला. यानंतर शाहजी महाराजांनी कुतुबशाह सोबत बोलणी चालू केली हे मुस्तफाखान याला कळले आणि त्याने आदिलशाही दरबारातून शहाजी महाराजांना अटक करण्याचा हुकूम मागवून घेतला. १६४८ साली शहाजी महाराजांना अटक करून अफजलखानाच्या देखरेखीखाली विजापूरला रवाना करण्यात आले.
पुढे कानकगिरीचं पाळेगार सरदार आपाखान याने आदिलशाहीविरोधात बंडखोरी केली म्हणून आदिलशाही दरबारातून अफजलखान व शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजे यांना पाठविण्यात आले. यावेळी कनकगिरीवर हल्ला केला असता अफजलखानाने लबाडीने संभाजी राजे यांना पुढे पाठवून पाठपुरावा केला नाही आणि भर लढाईत तोफेचा गोळा लागून संभाजी राजे यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे शहाजी महाराज अफजलखानावर प्रचंड संतापले.
अफलखानाची ही सर्व प्रकरणे शहाजी महाराजांनी फार जवळून पाहिल्याने शिवाजी महाराजांनाही त्यांनी खानाच्या बाबतीत सावध केले असावे आणि त्याचा पूर्वीचा इतिहास पाहता प्रतापगडाच्या अरण्यात शिवाजी महाराजांनी केलेला त्याचा वध म्हणजे त्याच्या पूर्वकर्माचे फळ होता असेच म्हणावे लागेल.