शहाजी महाराजांवरील एक बिकट प्रसंग

त्याकाळी राजमाता जिजाबाई व युवराज संभाजी राजे आणि शिवाजी राजे यांचा मुक्काम शिवनेरी गडावर होता मात्र मोगलांनी व आदिलशहाने आपली सर्व शक्ती एकवटल्याने हा परिसर कधीही शत्रूच्या ताब्यात जाऊ शकतो अशी चिंता शहाजी महाराजांना वाटू लागली.

शहाजी महाराजांवरील एक बिकट प्रसंग

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे संकल्पक म्हणून त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांचे नाव घेतले जाते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा मार्ग निश्चितच सोपा नव्हता दक्षिणेत त्याकाळी निजामशाही, आदिलशाही या सत्ता प्रबळ होत्याच मात्र उत्तरेतील मोगल साम्राज्याचाही प्रभाव हळूहळू दक्षिणेत पसरत असल्याने या तिन्ही सत्तांविरोधात बंड उभारून स्वराज्याचे निर्माण करणे हे साक्षात मृत्यूस आमंत्रण देण्यासारखेच होते.

मात्र या प्रबळ सत्तांना प्रथम विरोध सुरु केला तो शहाजी महाराजांनी. निजामशाही दरबाराची सूत्रे नंतरच्या काळात ज्यापाशी आली त्या फत्तेखानाने मोगलांसोबत तह करून मोगलांकडून शहाजी महाराजांची जहागीरी बरखास्त करून घेतली त्यावेळी शहाजी महाराजांनी मोगलांविरोधात बंड पुकारून निजामशाहीची नव्याने स्थापना केली आणि १६३२ साली नाशिक, जुन्नर, संगमनेर हे भाग ताब्यात घेऊन पेमगिरी येथे आपल्या नावे अमल सुरु केला. 

विजापूर दरबारातील एक मोठा सरदार मुरार जगदेव याने या राज्यास मान्यता दिली मात्र पुढे मुरार जगदेव व खवासखान या शहाजी महाराजांना सहकार्य करणाऱ्या सरदारांचा पक्ष कमकुवत झाला आणि मुस्तफाखान या सरदाराची शक्ती वाढली आणि त्याने मोगलांसोबत हातमिळवणी करून शहाजी महाराजांच्या अखत्यारीत असलेल्या निजामशाही राज्याचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरु केला. यानंतर मोगल व आदिलशाही या प्रबळ सत्ता शहाजी महाराजांच्या विरोधात एकत्र झाल्या व शहाजी महाराजांची या सत्तांना टक्कर देण्याची धामधूम सुरु झाली. हे सर्व सुरु असताना आपल्या कुटुंबाची चिंता शहाजी महाराजांना होतीच. 

त्याकाळी राजमाता जिजाबाई व युवराज संभाजी राजे आणि शिवाजी राजे यांचा मुक्काम शिवनेरी गडावर होता मात्र मोगलांनी व आदिलशहाने आपली सर्व शक्ती एकवटल्याने हा परिसर कधीही शत्रूच्या ताब्यात जाऊ शकतो अशी चिंता शहाजी महाराजांना वाटू लागली. शहाजी महाराजांनी या काळी ठाणे जिल्ह्यातील बळकट अशा माहुली किल्ल्यावरून दोन्ही सत्तांविरोधात लढा सुरु ठेवला मात्र हे करताना ते कायम आपल्या कुटुंबाच्या चिंतेत असत व या परिस्थितीत आपले कुटुंब कुठेतरी काही काळ सुरक्षित राहावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु होता.

पोर्तुगीजांशी शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. त्यामुळे आपल्या कुटुंबास चौल येथे काही काळ ठेवले तर आपण येथे आदिलशाह व मोगल यांच्याविरोधात लढा देऊ तोपर्यंत कुटुंब सुरक्षित राहील हा विचार करून त्यांनी गोव्याच्या पोर्तुगीज व्हाईसरॉयला संदेश पाठवला की..

निजामशाहीचा मालक अकरा वर्षांचा आमच्यापाशी असून त्याचे वास्तव्य त्रिंगलवाडी किल्ल्यावर आहे. तीन वर्षे झाली त्याच्या नावे आम्ही स्वतंत्र कारभार सुरु केला आहे. परंतु मोगल बादशाह व आदिलशाह हे दोन प्रबळ शत्रू आमच्यावर चालून आल्याने  आपण आमच्या कुटुंबीयास व मुलांस चौल येथील किल्ल्यात सुरक्षित राहण्याची सोय करून द्यावी.

पोर्तुगीज व्हाईसरॉय हे पत्र पाहून गडबडला कारण आदिलशाह व मोगल या बलाढ्य सत्ता एकाच वेळी शहाजी महाराजांविरोधात चालून आल्या आहेत त्या अर्थी जर आपण शहाजी महाराजांना मदत केली आणि हे दोघांना कळले तर या सत्ता आपल्यावरही तुटून पडायला मागेपुढे पाहणार नाहीत अशावेळी तटस्थ धोरण अवलंबणे हेच योग्य असे वाटून पोर्तुगीज व्हाईसरॉयने चौल ला संदेश पाठवला की

चौल येथे आपल्या हद्दीत राहण्याकरिता शहाजी राजाचा संदेश आला आहे. शहाजी राजास आता बाहेरील आधार राहिला नाही म्हणून प्रसंग पडल्यास चौलच्या किल्ल्यात कुटुंबियांना ठेवण्याचा त्याचा विचार आहे. व या सहकार्याबद्दल तो निजामशाहीतील काही प्रदेश आपल्यास देण्यास तयार आहे असा निरोप शहाजी कडील एका दूताने आणला आहे. त्यावर गोवा येथील कौन्सिलने असे ठरवले की ज्याअर्थी दोन बलाढ्य सत्तांचे शाहजीवर आक्रमण झाले आहे त्याअर्थी आपण उघड उघड मदत करणे शक्य नाही. त्यामुळे शहाजीस चौलच्या किल्ल्यात आश्रय देऊ नये. मात्र दंडा येथील तटबंदीच्या ठिकाणी तो व त्याचे कुटुंब राहतील तर चौलवरून त्यांना दंडा येथे पोहोचवण्यास गुप्त मदत करावी मात्र दंडा येथील किल्ला जरी शहाजीने आपल्या हवाली केला तरी त्यास चौल येथे आश्रय देऊ नये.

हे वाचून वाचकांच्या लक्षात येईल की शहाजी महाराज त्याकाळी किती कठीण प्रसंगातून जात होते मात्र यानंतरही त्यांनी अतिशय हुशारीने मोगल व आदिलशाह सोबत तह करून आपल्या कुटुंबियांचे रक्षण केले आणि कालांतराने स्वराज्यनिर्माणाचे स्वप्न आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी वातावरण निर्मिती करून पूर्ण केले.