बाजीराव पेशवे - एक अपराजित योद्धा
थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म दि. १८ ऑगस्ट १७०० रोजी राधाबाई पेशवे त्यांच्या उदरी झाला. त्यांचे वडील म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवे पदावर स्थानापन्न झालेले बाळाजी विश्वनाथ.
थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म दि. १८ ऑगस्ट १७०० रोजी राधाबाई पेशवे त्यांच्या उदरी झाला. त्यांचे वडील म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवे पदावर स्थानापन्न झालेले बाळाजी विश्वनाथ.
बाजीरावांच्या नावाबद्दल एक हकीकत अशी सांगण्यात येते की बाळाजी विश्वनाथ यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील काही बखरी वाचल्या होत्या व त्या बखरींतील बाजी या नावाच्या पुरुषांच्या पराक्रमाच्या हकीकती त्याना अतिशय भावल्या होत्या आणि अशीच एक बखर वाचत असताना त्यांना आपल्याला पुत्र झाल्याची बातमी समजली त्यांनी आपल्या पुत्राचे नावही बाजी असे ठेवले. बाजीराव यांचे पाळण्यातील नाव होते विश्वनाथ मात्र बाजी या नावाचे त्यांनी आपल्या पित्याच्या इच्छेनुसार आपल्या भविष्यातील पराक्रमाने खऱ्या अर्थी सार्थक केले.
बाळाजी विश्वनाथ हे त्याकाळी पेशवे पदावर असल्याने बाजीरावांना लष्करी व इतर सर्व शिक्षण लहानपणी मिळाले होते मात्र बाजीरावांना लष्करी पेशात जास्त रस असे. त्यांची उंची अदमासे ६ फूट असल्याने घोडेस्वारी करण्यात ते लवकरच तरबेज झाले व वडिलांसोबत मुलूखगिरीवरही जाऊ लागले.
१७२० साली बाजीराव यांचे वय २० वर्षे असताना त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. बाळाजी विश्वनाथ यांची उत्तरकार्ये पार पडल्यावर शाहू महाराजांनी कराडजवळ दरबार भरवून पेशवाईची वस्त्रे बाजीराव यांना दिली.
बाजीराव यांना पेशवाई देण्यास दरबारातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी व इतर काहींचा ठाम विरोध होता मात्र शाहू महाराजांनी या विरोधास फारसे महत्व न देता बाजीराव यांनाच पंतप्रधानपदाची वस्त्रे दिली.
पुण्यास येण्यापूर्वी पेशवे कुटुंब हे सासवड येथे राहत असत मात्र बाजीरावांनी पुण्यास आपली कर्मभूमी करण्याचा निश्चय केला व पुण्यास स्थलांतर केले. सुरुवातीस शनिवार वाडा नसल्याने त्यांनी धडफळे यांच्या वाड्यात काही दिवस मुक्काम केला. पुण्यात कारभारासाठी वाडा बांधण्याची सूचना शाहू महाराजांनी सुद्धा केली होती.
तुम्ही आपल्यास राहावयास जागा पेशवाईचे कारभाराजोगी मध्यदेशी पाहून तेथे वाडा बांधून, शहर वसवून तयार करावी असे शाहू महाराज बाजीराव यांना म्हणाले तेव्हा बाजीराव म्हणाले 'महाराज, पुणे जागा मध्यदेश आहे, आज्ञा झाल्यास तेथे रहावयाची जागा करू.'
१७२८ सालच्या पालखेडच्या लढाईत बाजीरावांनी तेथील निजामाचा पराभव केला. १७२९ साली बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांनी महंमदखान बंगश यांच्याविरोधात शाहू महाराजांकडे मदत मागितली तेव्हा बाजीराव स्वतः तेथे जाऊन त्यांनी बंगशचा पराभव करून छत्रसालाचे राज्य वाचवले. या कार्याने खुश होऊन छत्रसालाने आपली कन्या मस्तानी बाजीराव यांना दिली.
पुढे बाजीरावांनी कोकण, कर्नाटक, गुजरात, राजपुताना अशा चढाया करून विजयाची परंपरा राखली व अवघ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४० लढायांमध्ये विजयश्री प्राप्त केली. यामध्ये त्यांना त्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांची उत्तम साथ लागली. इतिहासात ही जोडी राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली गेली.
बाजीराव यांची एकूण दोन लग्ने झाले व पहिल्या पतीचे नाव काशीबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव मस्तानी असे होते. काशीबाई यांच्याकडून बाजीराव यांना नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथ व जनार्दन असे चार पुत्र झाले मात्र दोनच पुत्र दीर्घायुषी ठरले व मस्तानी कडून त्याना समशेरसिंग उर्फ कृष्णराव हा पुत्र झाला.
आपल्या लष्करी बाण्याने शत्रुंना सळो की पळो करून सोडणारे बाजीराव कौटुंबिक जीवनात मात्र फारसे सुखी नव्हते कारण मस्तानीस त्यांच्या घरातील व समाजातील अनेकांचा विरोध होता त्यामुळे या निराशेने त्यांना पुढील काळात खूप मनस्ताप झाला व त्यांचे प्रकृतीकडे खूपच दुर्लक्ष होऊ लागले. मदिरापान इत्यादींसारखी व्यसनेही त्यांना त्यामुळे जडली.
समशेरबहाद्दर यांची मुंज होऊन त्यास हिंदू म्हणून ओळखले जावे अशी त्यांची इच्छा होती मात्र या मुंजीसही प्रचंड विरोध झाला. पुढे १७४० साली बाजीराव स्वारीवर गेले असता शनिवारवाड्यात कट होऊन मस्तानीस अटक करण्यात आली. बाजीरावांना हा बातमी समजली मात्र त्यांना स्वारी अर्धवट सोडून मागे फिरणे अशक्य होते. यातच त्यांची प्रकृती ढासळली. ३० मार्चला ते बुऱ्हाणपुरास आले व ५ एप्रिलला रावेर येथील खरगोण येथे मुक्कामास असताना त्यांची तब्येत प्रचंड खालावली.
एकीकडे ढासळलेली प्रकृती व दुसरीकडे कौटुंबिक अडचणी या पेचात त्यांनी नेहमीप्रमाणे थंड पाण्याने आंघोळ करण्याचा हट्ट सोडला नाही व हा ज्वर जीवघेणा ठरून २८ एप्रिल १७४० साली वयाच्या ४० व्या वर्षी बाजीराव यांचे नर्मदेच्या काठावर दुःखद निधन झाले.
इतिहासकार ग्रांट डफ ने बाजीरावांबद्दल पुढील उद्गार काढले आहेत
'तो शूर असून मोठा युक्तिबाज होता. रूपाने तो देखणा होता. त्याचे वागणे प्रतिष्ठित सरदारासारखे नसून एखाद्या रांगड्या शिपायासारखे असे. स्वारीवर असला की त्याची घोड्यावरील मांड कधीच सुटत नसे. एकदा निजामाने त्याच्या चित्रकाराला बाजीरावाचे चित्र तो जसा असेल त्याच पद्धतीत काढून आणायला सांगितले. चित्रकार गेला त्यावेळी बाजीराव घोड्यावर बसला होता. घोड्याची आनिन मानेवर होती व एक पाय घोड्यावर आडवा टाकलेला होता. एखाद्या सध्या शिपायाप्रमाणे भाला बाजीरावाच्या खांद्यांवर लोंबत होता आणि आपल्या हाताने कणसे चोळून बाजीराव त्यातील दाणे खात होता.'