मुहम्मद बिन तुघलक - तुघलकी फर्मान या म्हणीचा निर्माता

मुहम्मद बिन तुघलक हा दिल्लीचा बादशाह घियासुद्दीन तुघलकाचा मुलगा. मोगलांच्या २०० वर्षांपूर्वी तुघलक राज्याची निर्मिती ही घियासुद्दीन याने केली.

मुहम्मद बिन तुघलक - तुघलकी फर्मान या म्हणीचा निर्माता

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

तुघलकी निर्णय हा शब्द आपण वारंवार ऐकत असतो. मागचा पुढचा विचार न करता घेतलेल्या निर्णयास तुघलकी निर्णय अथवा तुघलकी आदेश म्हणायचा प्रघात आजही आहे. मात्र हा शब्द ज्याच्यामुळे निर्माण झाला त्या दिल्लीच्या बादशाह अर्थात मुहम्मद बिन तुघलकाने असे कोणते निर्णय घेतले ज्यामुळे काही फायदा होण्याऐवजी तोटाच झाला ते जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. 

मुहम्मद बिन तुघलक हा दिल्लीचा बादशाह घियासुद्दीन तुघलकाचा मुलगा. मोगलांच्या २०० वर्षांपूर्वी तुघलक राज्याची निर्मिती ही घियासुद्दीन याने केली. तुघलकांच्या राज्यापूर्वी उत्तर भारताची सत्ता ही खिलजी वंशाकडे होती. 

मुहम्मद बिन तुघलक तरुण असताना घियासुद्दीन याने त्यास उलूघखान हा किताब प्रदान केला मात्र मुहम्मदला लवकरात लवकर गादीवर येण्याची घाई असल्याने त्याने १३२० साली गादी मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न फसला तरीही १३२५ मध्ये घियासुद्दीन बंगालच्या मोहिमेवरून परतत असताना त्याचा व मुहम्मदच्या लहान भावाचा मृत्यू झाल्याने त्याची दिल्लीच्या गादीवर बसण्याची इच्छा पूर्ण झाली.

१३२६ साली मुहम्मदच्या बहिणीचा पुत्र बहाउद्दीन गुरुशास्प याने मध्यप्रदेशातील सागर येथे बंड उभारले त्यामुळे मोहम्मदने त्याचे सरदार तेथे पाठवून बहाउद्दीनचे बंड मोडले व बहाउद्दीन ला अटक करून त्यास मृत्युदंड दिला.

मात्र या बंडामुळे तुघलकी निर्णयांची जी परंपरा सुरु झाली ती अगदी याच्या मृत्यूपर्यंत कायम होती. दिल्ली शहर उत्तरेकडे असल्याने दक्षिण भागातून बंडे उभी राहिल्यास राज्याचे रक्षण करणे कठीण होईल त्यामुळे राजधानी ही मध्यवर्ती ठिकाणी असणे योग्य असा विचार करून याने संपूर्ण राजधानीच दिल्लीवरून हलवून देवगिरी येथे हलवण्याचे फर्मान काढले आणि सर्व लोकांना बळजबरी तेथे राहण्यास नेले. देवगिरीचे दौलताबाद असे नामकरणही यानेच केले.

मुहम्मद तुघलकाचा दुसरा तुघलकी निर्णय म्हणजे खजिन्यातील पैशाची तूट भरून काढण्यासाठी त्याने सोन्याची नाणी एकाएकी रद्द केली आणि त्या ऐवजी तांब्याची नाणी पाडली मात्र त्यामुळे काही फायदा न होता खजिन्यात फक्त तांब्याच्या नाण्यांचे डोंगर साठले आणि परदेशात तांब्याच्या नाण्यांची किंमत नसल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळली.

तुघलकाचा तिसरा फासलेला निर्णय म्हणजे एके काळी राज्यात प्रचंड दुष्काळ पडला त्यामुळे राज्यातील अनेक लोक अन्न पाण्याविना मरू लागले त्यावेळी त्याने दुष्काळाचे निवारण करण्यासाठी एक योजना अमलात आणली व त्यावर एक अधिकारी नेमला व त्यास आमिर ई कुही असे नाव दिले. या योजनेनुसार सर्व राज्याचे १८०० चौरस मैलाचा एक असे अनेक विभाग पाडून त्यातील एक वितभरही जागा नापीक राहू न देता सक्तीने अथवा लोकांची समजूत काढून ती कसावयाची आणि तिथे सुद्धा दरवर्षी एकच पीक न घेता दरवर्षी वेगवेगळे पीकच घ्यायचे. मात्र एवढे प्रयत्न करूनही ही योजना काही यशस्वी झाली नाही. 

मुहम्मद तुघलकाने चीन वर स्वारी करण्यासाठी तब्बल एक लाख सैन्य धाडले मात्र बर्फाळ प्रदेशातील प्रचंड थंडीमुळे या एक लाख सैन्यापैकी फक्त दहा लोकच परत आले.

या व अशा अनेक चुकलेल्या निर्णयांमुळे याच्या कारकिर्दीत लोकांना खूपच त्रास सहन करावा लागला. राज्यात सुधारणा व्हावी म्हणूनच तुघलक प्रयत्न करीत असे मात्र ते करताना योजना त्वरित अमलात आल्या नाहीत की हा लोकांचे खूपच हाल करीत असे. 

१३५१ साली सिंधच्या स्वारीवर जात असताना सोंडा येथे मुहम्मद बिन तुघलक याचा मृत्यू झाला. राज्य सुधारणेची इच्छा मात्र अर्धवट ज्ञान यामुळे लोक यास अचाट कल्पनांचा पुरुष असेही म्हणत.