शिवराज्याभिषेक सोहळा - ब्रिटिशांच्या नजरेतून

ब्रिटिश लोकांना रोजनिशी (डायरी) लिहिण्याची एक चांगली सवय होती त्यामुळे हेन्रीने शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार या नात्याने त्याच्या रोजनिशीत सोहळ्याच्या ज्या नोंदी केल्या त्या अतिशय महत्वाच्या होत्या.

शिवराज्याभिषेक सोहळा - ब्रिटिशांच्या नजरेतून

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

ज्येष्ठ शुद्ध १२, शुक्रवार घटी २१, पळे ३४, विश्कम्भ ३८, घटिका ४०, पळे सि ४३, तीन घटिका रात्र उरली अर्थात शनिवार सूर्योदयापूर्वी तास सव्वातास अगोदर स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्टीत झाले. हा सोहळा शिवराज्याभिषेक म्हणून आजही मराठी जनांच्या हृदयात विराजमान आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची इंग्रजी तारीख होती ६ जून १६७४. मात्र शिवराज्याभिषेक काही एक दिवसीय सोहळा नसून ३० मे पासूनच राज्याभिषेक सोहळ्यास खऱ्या अर्थी सुरुवात झाली होती.

या राज्याभिषेकाचे साक्षीदार होण्यासाठी स्वराज्यातील जनताच नव्हे तर समस्त भारतखंड व परदेशातूनही अनेक लोक रायगडावर आले होते. या लोकांमध्ये एक ब्रिटिश अधिकारी हेन्री ऑक्झेन्डन हा सुद्धा तहाची बोलणी करावयास रायगडावर मुंबईहून आला होता. ब्रिटिश लोकांना रोजनिशी (डायरी) लिहिण्याची एक चांगली सवय होती त्यामुळे हेन्रीने शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार या नात्याने त्याच्या रोजनिशीत सोहळ्याच्या ज्या नोंदी केल्या त्या अतिशय महत्वाच्या होत्या.

या रोजनिशीत हेन्रीने राज्याभिषेकाबद्दल जी रोमांचक माहिती दिली आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

हेन्रीच्या रोजनिशीप्रमाणे १९ मे रोजी हेन्री जेव्हा मुंबईहून रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे दाखल झाला त्यावेळी त्यास असे समजले की महाराज भवानी मातेच्या दर्शनास प्रतापगडास गेले आहेत. यावेळी त्यांनी देवीस अर्पण करण्यासाठी सव्वा मण वजनाचे सुवर्ण छत्र नेले होते. २९ मे रोजी महाराजांची तुळा करण्यात आली. या तुळेचे वजन १६००० होन एवढे झाले. सदर होनांत आणखी १ लाख होनांची भर घालून ते दान करण्यात आले. ५ जून रोजी निराजी रावजी यांनी हेन्रीस दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक दिनास येण्याचे आमंत्रण देऊन राजांना मुजरा व नजर करण्यासाठी येण्याचे सांगितले. येण्याची वेळ ही ६ जून रोजी सकाळी ७-८ ची होती. 

६ जून रोजी हेन्री राज्याभिषेक सोहळ्यास दरबारात हजर झाला आणि त्याने शिवाजी महाराजांना एका भव्य सिंहासनावर आरूढ झालेले पहिले. यावेळी महाराजांच्या अष्टप्रधानांनी परिधान केलेला पोशाख अत्यंत मूल्यवान असल्याचे हेन्री म्हणतो. सिंहासनावर बसलेले महाराज हे अष्टप्रधानांनी वेष्टित असे होते. महाराजांच्या बाजूस युवराज संभाजीराजे, मोरोपंत पिंगळे व एक श्रेष्ठ ब्राह्मण (गागाभट्ट?) असे तिघे जण होते असे हेन्री पुढे लिहितो.

सेनाध्यक्ष आणि इतर प्रधान बाजूला आदराने उभे होते. हेन्रीने महाराजांना मुजरा केला आणि सोबत असलेल्या नारायण शेणवी याने महाराजांना नजर करण्यासाठी आणलेली अंगठी वर धरली. या अंगठीमध्ये सूर्यकिरणे गेल्याने त्यातून प्रकाश निर्माण होऊन शिवाजी महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी दोघांना सिंहासनाजवळ बोलावून घेतले आणि दोघांना पोशाख देऊन निरोप दिला.

अगदी थोडा वेळ हेन्री सिंहासनाजवळ होता मात्र त्याने या वेळेत सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्यावर अनेक अधिकारदर्शक आणि राजसत्तेची प्रतीके असलेली चिन्हे पहिली. सिंहासनाच्या उजव्या बाजूस दोन मोठी मोठ्या दातांच्या माशांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हातास अनेक अश्व पुच्छे आणि एका मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूच्या पारडी ही न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.

यावेळी हेनरीने शिवाजी महाराजांच्या स्वरूपाचे सुद्धा वर्णन लिहून ठेवले जे आजही शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कसे होते हे समजण्यासाठी महत्वाचे आहे.

"राजाचा चेहरा सुंदर व पाणीदार, इतर मराठ्यांच्या मानाने वर्ण गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब, बांकदार व थोडेसे खाली आलेले, दाढी कापून हनुवटीच्या वर टोकदार केलेली आहे. मिशी बारीक व मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा, जागरूकता हे गुण स्पष्ट दिसून येतात."

महाराजांचा निरोप घेऊन जेव्हा हेन्री राजवाड्याच्या दाराजवळ आला तेव्हा त्यास दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजूस उभे केलेले दिसले. याशिवाय दोन सुंदर आणि पांढरे घोडे श्रुंगारलेले बाहेर उभे होते. हे पाहून हेन्री चकित झाला आणि असा विचार त्याच्या मनात आला की गडाचा मार्ग एवढा बिकट असून हे प्राणी वर आणले तरी कसे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन अनेक एतद्देशीय लेखकांनी केले आहे मात्र ज्यास आपल्या संस्कृतीविषयी काहीच माहिती नाही अशा परदेशी माणसाच्या अनभिज्ञ नजरेतून पहिला गेलेला व रोजनिशीत उतरलेला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जाणून घेणे आजही एक सुंदर अनुभव असतो.