दुर्ग स्थापत्यातील बदल
साधारणपणे सातवाहन काळ हा गिरिदुर्ग बांधणीच्या सुरुवातीचा काळ होता असं आपण म्हणू शकतो. या काळात गिरिदुर्ग बांधणी सुरु झाली मात्र ती अगदीच प्राथमिक स्वरूपात होती.
मागील भागात आपण दुर्गबांधणी कशी करावी याचे काही प्राचीन संदर्भ पाहिले. या भागात आपण मौर्यकाळ ते मध्ययुग (इ.स. पूर्व ४ थे शतक ते ई. स. १८००) या काळात तिच्यात कसा बदल झाला ते समजावून घेऊयात. वेदकाळात किंवा सिंधू संस्कृतीच्या काळात दुर्गबांधणी प्रगत अवस्थेत होती. मात्र तिचे स्वरूप वेगळे होते. बहुतांश दुर्ग हे स्थलदुर्ग वर्गात मोडणारे होते. दुर्गबांधणी व नगररचना यांचा सुरेख मेळ घालून एक वेगळीच मिश्र शैली विकसित झाली होती. दुर्ग अगदी परिपूर्ण व निर्धोक कसा करता होईल याकडे विशेष कटाक्ष असे. मात्र असे असले तरी या काळात गिरिदुर्ग बांधणी कितपत विकसित झाली होती याबद्दल ठोस विधान करणे पुरेशा पुराव्यांअभावी आज तरी शक्य नाही. जरी प्राचीन साहित्यात दुर्गाचे गिरिदुर्गासह विविध प्रकार सांगितले असले तरी आज जसे सिंधुकालीन हडप्पा, मोहेंजोदारो, तर पुराणकाळातील हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, द्वारिका, श्रावस्ती, वैशाली, अहिच्छत्र, पाटलीपुत्र, महास्थानगड, उज्जयिनी, असे अनेक तटबंदीयुक्त स्थलदुर्ग व जलदुर्ग उत्खननात सापडतात तसे गिरिदुर्ग व त्यांचे उल्लेखही मिळत नाहीत. हरिश्चंद्रगडा सारख्या एखाद्या अपवादात्मक अतिप्राचीन गिरीदुर्गाचे उल्लेख मिळतात मात्र अशा एखाद दुसऱ्या उदाहरणावरून काही ठोस निष्कर्ष काढता येत नाही.
साधारणपणे सातवाहन काळ हा गिरिदुर्ग बांधणीच्या सुरुवातीचा काळ होता असं आपण म्हणू शकतो. या काळात गिरिदुर्ग बांधणी सुरु झाली मात्र ती अगदीच प्राथमिक स्वरूपात होती. कालांतराने ती हळू हळू विकसित होत गेली आणि यादव व शिलाहार काळात ती अतिशय विकसित स्वरूपात साकार झालेली दिसते. सातवाहन काळात मुख्यतः व्यापारी मार्गांचे रक्षण करन्याच्या अनुषंगाने दुर्गनिर्मिती झाली असे दिसते. लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी गिरीदुर्गनिर्मिती हि संकल्पना या काळात फारशी रुजलेली नव्हती. काही प्रमाणात गिरिदुर्ग उभारले गेले असले तरी बहुतांश सत्तांचे सामर्थ्य हे गिरिदुर्गांशी निगडित नव्हते. बलदंड स्थलदुर्ग व त्यांच्या संरक्षणासाठी केलेल्या विविध योजना हाच लष्करी संरचनेचा गाभा होता. गिरिदुर्ग हे टेहळणीची स्थाने व तात्पुरत्या स्वरूपाच्या लष्करी चौक्या याच स्वरूपात होते. म्हणूनच प्लिनीच्या वृत्तांतात सातवाहनांच्या ३० तटबंदीयुक्त शहरांचा उल्लेख येतो मात्र असा विशेष उल्लेख गिरिदुर्गांबद्दल मिळत नाही.
याशिवाय अजून एक महत्वाचा घटक आपणास गिरिदुर्गांच्या संबंधाने पाहावं लागतो तो म्हणजे मौर्य ते राष्ट्रकूट या काळात खोदल्या गेलेल्या प्रचुर अशा लेण्या. जरी संपूर्ण भारतभर पाषाण लेण्या खोदण्यात आल्या असल्या तरी महाराष्ट्रा इतक्या संख्येने व वैध्यपूर्ण लेण्या भारताच्या इतर कोणत्याच प्रदेशात खोदल्या गेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळातील बहुसंख्य गिरिदुर्ग हे या लेण्यांच्या अनुषंगानेच उभारलेले दिसतात. या लेण्यांची खोदण्याची पद्धत व रतनगडाचा कोकण दरवाजा, रामसेजचे प्रवेशावर, हडसरचा कातळ खोदीव प्रवेशमार्ग, त्र्यंबकचा व भंडारदुर्गचा कातळातील प्रवेशमार्ग यांच्या खोदण्याच्या पद्धतीत विलक्षण साम्य दिसते. कातळावर एकाच प्रकारे छिन्नी चालवलेली आपण सहज पाहू शकतो. संपूर्ण दख्खन पठारावर अशा पद्धतीने लेण्या व दुर्ग निर्मिती झालेली दिसून येते. राष्ट्रकूट काळात हि लेणी खोदण्याची कला तिच्या परम शिखरावर होती आणि त्यातूनच वेरूळचे कैलास लेणे हा अद्भुत चमत्कार निर्माण झाला. संपूर्ण भारतभर या कालावधीत असंख्य कातळ लेण्या खोदल्या गेल्या. देवगिरीच्या रूपाने दुर्गबांधणीतील एक अद्भुत चमत्कार साकार झाला. पुढे यादव व शिलाहार काळात गिरिदुर्ग बांधणीला उत्तेजन मिळाले व अनेक गिरिदुर्ग बांधण्यात आले. शिलाहार राजा भोज याच्याकडे अनेक गिरीदुर्ग बांधण्याचे श्रेय दिले जाते. यांची राजधानी देखील एक गिरीदुर्गच (पन्हाळा) होती.
मात्र मुस्लिम आक्रमकांच्या दक्षिणेतील सत्ताप्रवेशाने गिरिदुर्गांचे महत्व टप्या- टप्याने वाढत गेले. बहमनींची सत्ता लयास जाऊन तिची ५ शकले झाली. यातील ४ सत्तांच्या राजधान्या या मैदानी भागात होत्या (गोवळकोंडा याला अपवाद होती, तसेच निजामशाहीची राजधानी सुरुवातीला अगदी अल्पकाळासाठी जुन्नर होती). मात्र तोफांचा शोध हा गिरिदुर्गांचे महत्व वाढविणारा एक निर्णायक घटक होता. तोफांच्या योगे अगदी मजबूत तटबंदी देखील फोडणे शक्य झाल्याने गिरिदुर्ग अधिक महत्व पावते झाले. याचे प्रतिबिंब आपणास दुर्गांवर लिहिल्या जाणाऱ्या साहित्यात सुद्धा पडलेले दिसते. शुक्रनीति, मनुस्मृती ते अगदी तिसरा चालुक्य सम्राट सोमेश्वर रचित अभिलाषितार्थचिंतामणि असो यात दुर्गांचे अनेक प्रकार दिलेले आहेत ज्यात गिरिदुर्ग हा सुद्धा एक प्रकार आहे. मात्र सोळाव्या शतकात रचलेल्या ‘आकाशभैरवकल्प, या ग्रंथात केवळ गिरीदुर्गाचेच ८ प्रकार सांगितले आहेत (भद्रदुर्ग, अतिभद्रदुर्ग, चंद्रदुर्ग, अर्धचंद्रदुर्ग, नाभदुर्ग, सुनाभदुर्ग, रुचीरदुर्ग व वर्धमानदुर्ग).
प्रसिद्ध बहामनी सरदार मलिक उत्तुजार याला शिर्के व शंकरराव मोरे यांनी त्याच्या ५ हजार फौजेसह खेळण्याच्या (विशाळगड) आसमंतात तेथील अरण्य व दुर्गमतेचा फायदा घेऊन कापून काढले हे तर बहुतेक सारे जाणतातच. पुढे शिवकाळात तर मराठ्यांचे सारे लष्करी बळ हे या गिरिदुर्गांवरचा अवलंबून होते. मनूने सांगितलेले 'दुर्गाच्या आश्रयाने १०० योद्धे १० हजार जणांशी लढू शकतात' हे तत्व मराठ्यानी शिवकाल ते राजाराम काळात अनेक वेळा सिद्ध केले. या गिरिदुर्गांचे महत्व खऱ्या अर्थाने जाणले ते छत्रपती शिवरायांनी. त्यामुळेच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अनेक गिरीदुर्ग दुरुस्त केले तर कैक नव्याने बांधले. त्यांची राजधानी आधी राजगड व नंतर रायगड अशी गिरिदुर्गांवरच होती. राजगड हा तर गिरिदुर्ग बांधणीचा जगातील एक सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो. तर रायगड हा यावच्चन्द्रो दिवाकरो विलसत राहील अशी ग्वाही हिरोजी देतात. मात्र पुढे मराठे अतिशय प्रबळ झाले व हे गिरिदुर्ग आपले महत्व गमावून बसले आणि बहुतेक करून यांचा वापर हा बंदिखाने म्हणून होऊ लागला. पुढे ब्रिटिश काळात लांब पल्य्याच्या तोफानी गिरीदुर्गाची तटबंदी देखील दुर्लंघ्य राहिली नाही व मराठ्यांच्या अस्ताबरोबरच हे दुर्ग देखील आपले सामर्थ्य गमावून बसले. पुढे इंग्रजानी सत्ता हाती येताच अनेक गिरिदुर्ग उद्धवस्त केले. बऱ्याच गिरिदुर्गांच्या वाटा सुरुंगाने उडवून दिल्या व ते दुष्कर करून टाकले. आणि एकेकाळी साऱ्या भारतवर्षाला ज्या गिरिदुर्गांचा भरवसा वाटायचा व ज्याच्या योगे त्याचा स्वामी दुर्गम व्हायचा ते गिरिदुर्ग स्वतःच निराश्रित झाले.
पुढील भागात मध्ययुगात गिरीदुर्गाच्या बांधणीत झालेलं विविध प्रयोग पाहुयात.
क्रमशः
- संतोष विष्णू जाधव (पुणे)