महायोद्धा येसाजी कंक यांची हत्तीशी झुंज

एक दिवस शिवाजी महाराज व गोवळकोंड्याचा बादशाह यांची चर्चा सुरु असताना कुतुबशहाने महाराजांना सहज विचारले की, आपल्या सैन्यात किती हत्ती आहेत? यावर महाराज म्हणाले की माझ्याकडे सध्या अकरा हत्ती आहेत.

महायोद्धा येसाजी कंक यांची हत्तीशी झुंज

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा हा एका हत्तीच्या बरोबरीचा होता ही उपमा आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. खरं तर हत्ती हा प्राणी मनुष्याहून वजनाने, आकाराने आणि शक्तीनेही कित्येक पटींनी अधिक आहे मात्र शिवरायांच्या मावळ्यांकडे जे गुण होते त्यांच्या बळावर ते हत्तीशीही बरोबरी करू शकत व ते गुण होते बुद्धी व धाडस!

शिवरायांच्या सहकाऱ्यांच्या धाडसाची प्रचिती शिवचरित्राच्या पानापानांत वाचावयास मिळते मात्र शिवरायांचे बालपणीचे सवंगडी असलेल्या येसाजी कंक यांनी परराज्यात गाजवलेला एक पराक्रम आजही लोककथांमधून जिवंत आहे.

६ जून १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. यानंतर १६७७ साली त्यांनी अत्यंत महत्वाकांक्षी अशा दक्षिण दिग्विजय मोहिमेस सुरुवात केली. मोहिमेच्या सुरुवातीस त्यांनी भाग्यनगरच्या कुतुबशाहाची भेट मिळवून त्याचा पाठिंबा मिळवला. या भेटी दरम्यान एक घटना घडली ज्यामुळे कुतुबशाहास शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या ताकदीची प्रचिती आली.

झाले असे की एक दिवस शिवाजी महाराज व गोवळकोंड्याचा बादशाह यांची चर्चा सुरु असताना कुतुबशहाने महाराजांना सहज विचारले की, आपल्या सैन्यात किती हत्ती आहेत? यावर महाराज म्हणाले की माझ्याकडे सध्या अकरा हत्ती आहेत. 

कुतुबशहा महाराजांचे उत्तर ऐकून म्हणाला की आपला एखादा हत्ती आमच्या हत्तीसोबत लढू शकेल का?

यावेळी महाराज म्हणाले, खात्रीने लढू शकेल!

यानंतर कुतुबशहाने एक मोठा हत्ती महालाच्या चौकासमोर आणला. महाराजांनी डोळ्यांनीच येसाजी कंक यांना खुणावले आणि येसाजी एका हातात वाघनखे आणि एका हातात पट्टा घेऊन तयार झाले आणि महाराजांना व बादशहास मुजरा करून त्यांनी चौकात सिंहासारखी उडी मारून प्रवेश केला. 

अचानक समोर हत्यारबंद माणूस आल्याचे पाहून मदमस्त हत्ती चवताळून उठला आणि येसाजींच्या अंगावर धावून गेला. हत्ती एकदम जवळ आला त्यावेळी येसाजी अत्यंत चपळाईने हत्तीच्या पोटाखाली शिरले आणि हत्तीच्या वळवळणाऱ्या सोंडेवर वाघनखांचा एक वार केला आणि तेवढ्याच चपळाईने हत्तीच्या खालून बाहेर निघून हत्तीच्या समोर पुन्हा उभे राहिले.

सोंडेवर झालेल्या वाराने अधिकच चवताळलेला हत्ती पुन्हा येसाजींच्या अंगावर धावून गेला. मात्र यावेळीही येसाजींनी पुन्हा एकदा हत्तीच्या खाली शिरून त्याच्या सोंडेवर वाघनखांचा वार केला. असे सलग तीन वेळा झाल्यावर हत्ती चिर्रर्र असा आवाज करून बाजूला झाला.

यानंतर हत्तीच्या सोंडेस दांडपट्टा बांधण्यात आला व यानंतर हत्तीने येसाजींच्या शरीरावर दांडपट्ट्याचे वार करण्याचे प्रयत्न सुरु केले. येसाजींनी अतिशय वेगाने हत्तीचे हे सर्व वार चुकवले आणि हत्तीची शेपूट पकडून त्यांनी हत्तीच्या पाठीवर चढून त्याच्या मानेवर जाऊन उभे राहिले.

हत्तीच्या मानेवर चढून त्यांनी वाघनखांनी हत्तीस बेजार करणे सुरु केले आणि आपल्या हातातील दांडपट्ट्याचा एकच वार हत्तीच्या सोंडेवर केला आणि हत्तीची सोंड तुटून खाली पडली.  येसाजींचा पराक्रम पाहून कुतुबशहा व दरबारातील सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले व शिवाजी महाराजांच्या माणसांच्या पराक्रमाबद्दल जे ऐकून होतो ते खरे आहे याची खात्री सर्वांस झाली.

कुतुबशाह सुद्धा येसाजींच्या पराक्रमाने अत्यंत चकित होऊन त्याने येसाजींना सोन्याचे कडे, तोडे आणि गळ्यातील गोफ भेट दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या मुलुखातील पाच हजार रुपये उत्पन्नाचा एक गाव येसाजींना इनाम देण्याचीही त्याने घोषणा केली मात्र येसाजी बादशहास म्हणाले की, मी महाराजांचे अन्न खात आहे त्यातच मी आनंदी व समाधानी आहे. 

त्यांच्या आज्ञेने मी येथे येऊन माझी करामत आपणास दाखवली तरी आपले हे बक्षीस मी घेऊ शकत नाही. माझ्या महाराजांनी आम्हास काय कमी पडू दिले आहे की मी आपले बक्षीस घेऊन माझा निर्वाह करावा? आपले बक्षीस घेऊन माझी बुद्धी भ्रष्ट झाली तर महाराजांच्या सेवेत अंतर पडेल यासाठी जे काही द्यावयाचे आहे ते महाराजांकडेच द्यावे. ते धनी आहेत व चाकरी करणे आमचा धर्म आहे.

येसाजींची स्वामीनिष्ठा व निस्पृहपणा पाहून कुतुबशाह अतिशय खुश झाला आणि त्याने शिवाजी महाराजांना कर्नाटक मोहिमेच्या शुभेच्छा दिल्या व खूप मोठा सन्मान करून त्यांना निरोप दिला. शिवाजी महाराजांनी शून्यातून जे स्वराज्य उभे केले त्यामध्ये त्यांना येसाजींसारखे असंख्य सहकारी लाभले हीच स्वराज्याची खरीखुरी दौलत होती.