कल्याण स्वामी - समर्थ रामदासांचे शिष्य

समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रमुख शिष्यांमधील उद्धव गोसावी, कल्याण गोसावी ही नावे आपल्या ऐकण्यात येतात व यापैकी कल्याण गोसावी यांची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

कल्याण स्वामी - समर्थ रामदासांचे शिष्य

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्रास लाभलेल्या महान संतपरंपरेतील एक थोर संत म्हणून श्री रामदास स्वामी सर्वांनाच परिचित आहेत. समर्थांनी त्यांच्या काळात जो संप्रदाय सुरु झाला त्यास रामदासी संप्रदाय म्हणून ओळखले जाते व हा संप्रदायास महाराष्ट्राच्या व भारताच्या विविध भागांतून अनुयायी लाभले. 

समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रमुख शिष्यांमधील उद्धव गोसावी, कल्याण गोसावी ही नावे आपल्या ऐकण्यात येतात व यापैकी कल्याण गोसावी यांची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

कल्याण गोसावी यांचे मूळ गाव बानाशिक जिल्ह्यातील बाभुळगाव हे असून हे गाव गोदावरी नदीच्या तीरावरील एक सुंदर असे स्थान आहे. कल्याण गोसावी यांच्या वडिलांचे नाव कृष्णाजीपंत असे असून त्यांचे घराणे आश्वलायनशाखी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण व कौशिक गोत्रीय होते.

काही संदर्भसाधनांत त्यांचा जन्म शके १५४० सालातील अर्थात इसवी सन १६१८ मधील असल्याचे नमूद आहे मात्र काहींच्या मते त्यांचा जन्म १६३६ सालातील होता.

कल्याण स्वामी यांचे मूळ नाव अंबाजी असे होते. लहान असतानाच त्यांचे वडील कृष्णाजीपंत काशीयात्रेस गेले आणि त्यानतंर कल्याणस्वामी हे आपल्या बंधूंसोबत कोल्हापूर येथे राहावयास आले.

कोल्हापूर हे कल्याणस्वामी यांचे आजोळ असून या ठिकाणी त्यांचे मामा पिराजीपंत राहत असत. पिराजीपंत यांनी सुद्धा कल्याणस्वामी आणि त्यांचे बंधू यांचा उत्तम रित्या सांभाळ करून त्यांना चांगले शिक्षण दिले. 

थोड्याच कालावधीत समर्थ रामदास स्वामी यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले असता तेथील अनेकांनी रामदासी पंथाचा अनुग्रह घेतला व कल्याण स्वामी उर्फ अंबाजी यांचे मामा पिराजीपंत यांचा सुद्धा अनुग्रह घेणाऱ्यांमध्ये समावेश होता.

एके दिवशी समर्थ रामदास स्वामी यांना पिराजीपंतांनी भोजनाकरिता आमंत्रित केले होते व यावेळी भोजनाची सर्व व्यवस्था अंबाजी उर्फ कल्याण स्वामी यांनी केली होती व हे भोजन आणि व्यवस्था रामदास स्वामींना खूप आवडून त्यांनी पिराजीपंत यांच्याकडे अंबाजीस माझ्या सेवेत ठेवा अशी मागणी केली. अंबाजी यांच्या आईने होकार दिल्यावर पिराजीपंत यांनी कल्याण स्वामींना रामदास स्वामींच्या सेवेत दाखल केले.

अंबाजी उर्फ कल्याण स्वामी हे रामदास स्वामी यांच्या सेवेत दाखल झाल्यावर रामदास स्वामींनी त्यांना उत्तम शिक्षण दिले आणि लेखन आणि वाचन शिकवले. मुळातच हुशार असल्याने खूप लवकर कल्याणस्वामी हे समर्थांच्या मुख्य शिष्यगणांतील एक झाले.

एकदा एका वाटेवरून समर्थांचा छबिना जाणार होता व त्या वाटेत एका झाडाची फांदी आडवी आली होती व या फांदीच्या खाली एक विहीर होती. छबिना सुरळीत जावा यासाठी अंबाजी उर्फ कल्याणस्वामी फांदी तोडत असताना ते खालील विहिरीत पडले आणि विहीर खोल असल्याने व बाजूस कोणीच नसल्याने बराच काळ कल्याण स्वामींना त्या विहिरीत राहावे लागले.

ज्यावेळी रामदास स्वामींना ही बातमी कळली ते त्या विहिरीजवळ आले आणि त्यांनी अंबाजीस हाक मारली त्यावेळी अंबाजी यांनी आतून ओ दिला. यावेळी रामदास स्वामींनी त्यांस विचारले की, कल्याण आहेस का? म्हणजे ठीक आहेस का? यावेळी अंबाजी आतून म्हणाले की हो समर्थ मी कल्याण आहे. यानंतर त्यांचे अंबाजी हे मूळ नाव बाजूला राहून त्यांस कल्याण हे नाव मिळाले. इतक्या खोल विहिरीत पडून जखमी होऊनही सुखरूप येणे म्हणजे खऱ्या अर्थी त्यांचा पुनर्जन्मच होता.

कल्याण स्वामींचे अत्यंत मोठे कार्य म्हणजे त्यांच्या हस्ते दासबोधाचे आणि इतर ग्रंथांचे लेखन झाले आहे म्हणजे रामदास स्वामी हे आपल्या मुखातून जे सांगत ते कल्याण स्वामी लिहीत यामुळे रामदास स्वामींचे मुख्य लेखनिक म्हणून कल्याण स्वामी ओळखले जातात.

कल्याणस्वामी हे स्वतः सुद्धा एक उत्तम लेखक असून त्यांनी लिहिलेली काव्ये व पदे प्रसिद्ध आहेत. कविवर्य मोरोपंत यांनी कल्याणस्वामींना गुरुभक्त आणि भारताचे अवतार ही विशेषणे दिली आहेत. 

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिह्यातील डोमगाव येथे कल्याणस्वामींनी रामदासी मठाची स्थापना केली होती व त्यांच्या हस्ते लिखाण झालेल्या दासबोधाची प्रत या ठिकाणी आहे. कल्याण स्वामी हे आजन्म ब्रह्मचारी असून शक्ती पूजक असल्याने त्यांच्या ताकदीच्या व शक्तीच्या अनेक कथा आजही प्रचलित आहेत.

१७१४ साली कल्याणस्वामी यांनी डोमगाव येथे समाधी घेतली. समर्थांच्या शिष्यपरंपरेतील कल्याणस्वामी हे खऱ्या अर्थी एक शिष्योत्तम होते.