कान्होजी जेधे - स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे शिलेदार
शिवाजी महाराजांनी ज्या सहकाऱ्यांसहित रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासहित कान्होजी जेधे सुद्धा हजर होते.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
इतिहासात आपल्या एकनिष्ठतेने आदरास प्राप्त झालेल्या अनेक व्यक्ती आहेत. शिवकालीन इतिहासात तर अनेक व्यक्तींनी आपल्या एकनिष्ठतेने मानाचे स्थान प्राप्त केले आहे. स्वतःकडे पद, प्रतिष्ठा व वतन असूनही केवळ एका वचना खातर सर्व ऐश्वर्यावर पाणी सोडून स्वराज्य निर्मितीत मोलाची कामगिरी करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कान्होजी जेधे. मोसे खोऱ्याचे देशमुख बाजी पासलकर हे कान्होजी जेधे यांचे सासरे. यांचे वास्तव्य भोर तालुक्यातील कारी येथे होते.
कान्होजी जेधे हे मावळ प्रदेशातील एक प्रमुख देशमुख असून शिवरायांनी स्वराज्य कार्य सुरु करण्यापूर्वी मावळ प्रांतात आदिलशाही अमल असता ते आदिलशाही राज्यात अधिकारी पदावर होते. कान्होजी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आदिलशाही सरदार रणदुल्लाखान याचा सहाय्यक म्हणून केली. कान्होजी जेधे यांच्या कर्तबगारीने शहाजी राजे यांचे लक्ष त्यांच्यावर गेले व त्यांनी कान्होजी जेधे यांना आपल्याकडे मागून घेतले. शहाजी राजे व रणदुल्लाखान यांच्यात कान्होजी जेधे यांच्यामुळे सलोखा निर्माण झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्यविरोधात बंड उभारून स्वराज्यनिर्मितीस सुरुवात केली त्यावेळी आदिलशहाने कान्होजी जेधे व त्यांचे कुलकर्णी दादाजी नरस प्रभू यांना महाराजांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा हुकूम दिला होता मात्र केवळ शहाजी महाराजांसोबत असलेल्या एकनिष्ठतेमुळे त्यांनी आदिलशाही हुकूमास केराची टोपली दाखवली.
शिवाजी महाराजांनी ज्या सहकाऱ्यांसहित रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासहित कान्होजी जेधे सुद्धा हजर होते. शिवाजी महाराजांनी केलेल्या बंडात त्यांना शहाजी राजे यांची साथ असावी असा आरोप ठेवून त्यांना कैद करण्यात आले यावेळी कान्होजी जेधे यांना सुद्धा कैद झाली होती, कालांतराने त्यांची मुक्तता झाल्यावर त्यांनी कान्होजी जेधे यांच्याकडून बेलरोटीवर शपथ घेतली की तुम्ही शिवरायांस सामील व्हावे आणि कोणीही शत्रू चालून आला तर त्याचा पराभव करावा.
कान्होजी जेधे यांनी शिवाजी महाराजांना जावळीच्या मोरे यांच्याविरोधातील मोहिमेत उत्तम साथ दिली होती. अफजलखानाने जेव्हा जावळीवर स्वारी केली तेव्हा आदिलशहाने कान्होजी जेधे यांना आपल्या जमावासहित अफजलखानास मिळावे असा आदेश दिला होता. यावेळी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची नुकतीच सुरुवात होती अशावेळी बलाढ्य आदिलशाही सैन्यासमोर आपला निभाव लागेल की नाही याचा विचार न करता कान्होजी यांनी शिवरायांना साथ देण्याचे ठरवले व आदिलशाही फर्मान घेऊन आपल्या पाच पुत्रसंहित शिवरायांची भेट घेतली.
यावेळी शिवराय कान्होजी यांना म्हणाले की आपले शेजारी केदारजी आणि खंडोजी खोपडे अफजलखानाकडे गेले, तुम्ही पातशाही हुकूम मोडलात तर तुमचे वतन जप्त होईल, कदाचित तुमच्या जीवावरही बेतेल तेव्हा तुम्ही सुद्धा खानाकडे जाणे. यावेळी कान्होजी म्हणाले की तुम्हास कायम सहकार्य करण्याची शपथ मी शहाजी राजे यांना दिली आहे. ही शपथ मी मोडणार नाही मग माझ्या वतनाचे काहीही होवो. आणि हातावर पाणी घेऊन ते त्यांनी वतनावर सोडले.
यानंतर कान्होजी यांनी मावळातल्या इतर देशमुखांची बैठक घेतली व त्यांना सांगितले की शहाजीराजे यांचे पुत्र जे कार्य करीत आहेत त्यांच्या कार्यात मी पूर्णपणे सहभागी असून त्यासाठी मी वतनावर पाणी सोडले आहे. मी व माझी मुले शिवरायांसाठी प्राण देण्यासही तयार आहोत. आदिलशहाचा काही भरवसा नाही, त्यांचे काम झाल्यावर कुठलेतरी निमित्त काढून आपला नाश करेल. हे महाराष्ट्र राज्य आहे, सर्वांनी हिम्मत करून एकनिष्ठतेने सेवा करावी. यावेळी मावळातले बांदल, शिळीमकर, पासलकर, मारणे, ढमाले, मरळ, डोहर इत्यादी देशमुख शिवरायांना मिळाले.
कान्होजी जेधे यांच्या शब्दाखातर मावळातील सर्व ताकद शिवरायांच्या पाठी उभी राहिल्याने शिवाजी महाराजांची बाजू अतिशय बळकट झाली. प्रतापगडावर अफजलखानाचा वध झाल्यावर जे युद्ध झाले त्यावेळी कान्होजी जेधे सुद्धा हजर होते. कान्होजी जेधे हे शहाजी राजांचे समकालीन असून त्यांचे वयही शहाजी राजांइतके असावे. १६६० साली कान्होजी जेधे यांचा मृत्यू झाला. त्यांचे गाव कारी येथे त्यांची समाधी व वाडा असून आजही अनेक शिवभक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास येत असतात.
कान्होजी यांचे पुत्र बाजी जेधे सुद्धा शिवरायांचे सोबत असून शिवरायांनी त्यांना सर्जेराव अशी पदवी दिली होती. खळदबेलसर येथील युद्धात बाजी जेधे यांनी चांगला पराक्रम गाजवला होता. शिवरायांना स्वराज्यकार्यात खूप एकनिष्ठ व पराक्रमी माणसांची साथ लाभली, कान्होजी जेधे हे त्यापैकीच एक. स्वराज्याच्या या एकनिष्ठ सरदारास मानाचा मुजरा.