कर्नाळा किल्ला व अभयारण्य

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असलेले व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्याला खेटूनच गेला आहे असे महाराष्ट्रातले एकमेव पक्षी अभयारण्य तसेच कर्नाळा किल्ला सर्वांच्याच परिचयाचे आहेत. या परिसरामध्ये येत असताना अगदी ३० कि.मी. च्या परिघातून या किल्ल्याचा सुळका आपल्या थम्ब्स अप या कंपनीच्या लोगोप्रमाणे आपला अंगठा दाखवून पर्यटकांना व पर्यावरणप्रेमींना खुणावत असतो.

कर्नाळा किल्ला व अभयारण्य
कर्नाळा किल्ला (सौजन्य - विकीमेडीया कॉमन्स)

कर्नाळा किल्ल्याची उंची आहे ४५० मीटर त्यामुळे हा किला चढणे फारसे अवघड काम नाही. कर्नाळा किल्ल्याच्या पश्चिमेकडून जाणार्‍या वाटेने थोडे चढल्यावर एक खडक लागतो. खडक चढून गेल्यावर एक दरवाजा लागतो. आत शिरल्यावर इमारतीच्या पडक्या भिंती व सुळका दिसुन येतो. या सुळक्यात १२-१३ व्या शतकामध्ये खोदलेली चार दान्य कोठारे तसेच पाण्याच्या टाक्या आहेत.

या ठिकाणी फारसी व मराठी शिलालेखही आढळतात यातल्या फारसी शिलालेखात ‘सय्यद नुरुद्दीन मुहम्मदखान, हिजरी ११४७’ असे लिहिले आहे तर मराठी शिलालेखात ‘शके १५९२ संवस्तर आषाढ शु.१४ कर्नाळा घेतला’ असे लिहिले आहे.

माथ्यावर असलेला ह ५० मिटर उंचीचा सुळका प्रथमदर्शनीच छातीत धडकी भरवितो. परंतू हा सुळका गिर्यारोहकांचा लाडका आहे. पश्चिमेच कलत्या असलेल्या या सुळक्यावर मधमाशांचे पोळे आहेत आणि या पोळ्यातल्या मधासाठी परिसरातील ठाकरांनी काही पायर्‍या खोदल्या आहेत परंतू सामान्य पर्यटकाला त्यावर चढता येणे कठीण आहे. कर्नाळा किल्ल्यावरुन पश्चिमेकडे मुंबई, घारापुरी बेट, माणिकगड, सह्याद्री रांगेत नागफणी, राजमाची व माथेरान दिसून येते.

गडावर पुर्वी देवगिरीचे यादव राज्य करित असत. सन १५४० मध्ये कर्नाळा किल्ला अहमदनगरच्या ताब्यात गेला, नंतर गुजरात सुलतानने पोर्तुगिजांची मदत घेऊन कर्नाळा किल्ला ताब्यात घेतला, कालांतराने शिवाजी महाराजांनी किल्ला त्यांच्या राज्यात आणला.

कर्नाळा किल्ला परिसरात दाट जंगल असून येथे विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात म्हणुन शासनाने येथे २ ऑक्टोबर १९६९ साली ४.५० चौ.कि.मी. क्षेत्रात कर्नाळा पक्षी अभयारण्य निर्माण केले. या अभयारण्यात १५० जातींचे विविध पक्षी आढळतात.तसेच ४० जातिंचे विविध पक्षी स्थालांतर करुन विविध हंगामात येथे येतात. निरिक्षण केल्यास आपल्याआ खंड्या, पंचरंगी पोपट, हिरवा तांबट, मोर, कालशिर्ष कांचन, ससाणा इत्यादी तसेच इतर अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडू शकते. येथे पक्षांसाठी ११ पक्षीघरे असून स्थानिक नसलेले दुर्मिळ पक्षी या ठिकाणि पहावयास मिळतात.

पक्षीनिरिक्षणाचा छंद सध्या बराच लोकप्रिय होत चालला आहे. गळ्यात दुर्बिण अडकावून दाट जंगलात पक्ष्यांचा मागोवा घेत भटकणे, दिसलेल्या सुंदर पक्ष्याचे छायाचित्र कॅमेर्‍यात बंदिस्त करणे, दुरवर असलेल्या गोड पक्ष्याच्या गोड गाण्यात आपलिही एखादी तान मिसळवणे, परिसरात पडलेली पक्ष्यांची रंगिबेरंगी पिसे जमवणे यातली मजा काही औरच आहे. म्हणतात ना ‘हा छंद जिवाला लावी पिसे!’ परंतु हे सर्व त्या बिचार्‍यांना त्रास न देताच करा.