संत कबीर - कबीर पंथाचे प्रणेते

कबीर हे एक उत्तम लेखक व कवी असून त्यांनी शुकविधान नामक एक ग्रंथ लिहिला व याव्यतिरिक्त त्यांनी लिहिलेले अनेक दोहरे आणि काव्ये आजही प्रसिद्ध आहेत.

संत कबीर - कबीर पंथाचे प्रणेते
संत कबीर

भारतीय संस्कृतीस जी महान संतपरंपरा लाभली आहे त्यामधील एक महान विभूती म्हणजे संत कबीर. संत कबीर यांच्या मूळ मात्या पित्यांचे नाव आढळत नसले तरी अगदी लहान असताना त्यांचा सांभाळ एका मुस्लिम दाम्पत्याने केला व त्यांचे कबीर असे नामकरण केले. संत कबीरांच्या जन्माविषयी जी कथा सर्वात प्रख्यात आहे त्यानुसार निमा नामक एक मोमीन सूत धुण्यास भागीरथी नदीवर गेले असता या नदीतून एक नवजात बालक वाहत येत असताना त्यास दिसले व निमाने त्या बालकाचा सांभाळ करून त्यास कबीर असे नाव ठेवले.

संत कबीर यांचे पालक हे व्यवसायाने कोष्टी असल्याने सुरुवातीस कबीर हाच व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत मात्र लहानपणापासूनच संत कबीर हे रामाचे मोठे भक्त होते. वयात आल्यावर त्यांचे लग्न झाले व त्यांस कमाल नामक एक पुत्र झाला व मोठा झाल्यावर हा पुत्र देखील मोठा रामभक्त म्हणून प्रसिद्ध पावला.

संत कबीरांना ज्या माहात्म्याकडून अनुग्रह प्राप्त झाला ते म्हणजे रामानंद स्वामी. रामानंद स्वामींनी संत कबीरांना पूर्ण ब्रह्म विद्येचा अनुग्रह केल्याचे उल्लेख आढळतात. 

कबीर हे एक उत्तम लेखक व कवी असून त्यांनी शुकविधान नामक एक ग्रंथ लिहिला व याव्यतिरिक्त त्यांनी लिहिलेले अनेक दोहरे आणि काव्ये आजही प्रसिद्ध आहेत. कबीरांच्या सर्व कविता हिंदुस्थानी भाषेत असून काव्याची सुरुवात कहेकबीर, कहतकबीर, दासकबीर अशी करून शेवटाली त्यांचे नाव असे.

संत कबीरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणापासून काही अंतरावरील चौडा या ठिकाणी संत कबीरांच्या कवितांचा पूर्ण संग्रह आढळला होता. संत कबीरांच्या प्रभावाने त्यांचे अनेक अनुयायी झाले हे अनुयायी ज्या संप्रदायाचा अनुयाय करीत त्यास कबीर संप्रदाय अथवा कबीर पंथ असे नाव मिळाले.

कबीर पंथाचे देशात विविध ठिकाणी मठ होते व आजही आहेत व पूर्वी त्यांच्या मठाची ओळख म्हणजे मठाच्या सभोवती शहामृगाची अंडी टांगण्यात येत आणि ज्या ठिकाणी कीर्तन असे त्या मैदानाच्या चोहोबाजूस पांढऱ्या पताका लावण्यात येत.

संत कबीर यांच्या कार्यामुळे त्यांस हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील अनुयायी मिळाले होते व ज्यावेळी त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचा अंत्यविधी कसा केला जावा यावरून हिंदू व मुस्लिम अनुयायांत वाद निर्माण झाला मात्र हा वाद सुरु असताना एक चमत्कार झाला व तो म्हणजे त्यांच्या अर्ध्या देहाची तुळस आणि अर्ध्या देहाचा सब्जा झाला.

मुस्लिम अनुयायांनी मग हा सब्जा गोरखपूर येथील मगर नामक गावी दफन केला आणि तेथे मशिदीचे निर्माण केले आणि त्यांच्या देहापासून निर्माण झालेल्या तुळशीस वीरसिंह या राजाने काशीस नेऊन अंत्यसंस्कार केले आणि त्यास्थळी मोठे वृंदावन निर्माण केले.

संत कबीर यांच्या आयुष्यकाळा विषयी असे सांगण्यात येते की ते तब्बल तीनशे वर्षे हयात होते कारण त्यांच्याविषयी एक प्रसिद्ध दोहरा आहे त्यामध्ये त्यांचे आयुष्यमान तीनशे वर्षांचे होते असा स्पष्ट उल्लेख आहे. संत ज्ञानेश्वर यांचे वडील, खुद्द संत ज्ञानेश्वर, गुरु नानक आदी महान लोक व संत कबीर यांचा काळ एक होता.

संत कबीरांनी निर्माण केलेल्या कबीर पंथात धर्मभेद विसरून सर्वांनी एकमेकांच्या श्रद्धास्थानांचा आदर करण्याची शिकवण दिली गेली व ही शिकवण आजच्या युगातही अनुकरणीय आहे.