सदाशिवराव पेशवे यांच्या तोतयाचे बंड

पानिपत युद्धास अदमासे १५ वर्षे लोटली आणि एक दिवस पानिपतावर गर्दीत हरवलेले सदाशिवराव हे पुन्हा आले आहेत अशी बातमी थेट पुण्याच्या शनिवार वाड्यापर्यंत येऊन धडकली.

सदाशिवराव पेशवे यांच्या तोतयाचे बंड
सदाशिवराव भाऊ यांचे चित्र

१४ जानेवारी १७६० हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस. याच दिवशी अफगाण व मराठे यांच्यात घडलेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी अनेक माणसे गमावली. स्वतः युद्धाची जबाबदारी असलेले सदाशिवराव चिमाजी पेशवे उर्फ भाऊसाहेब त्यांचा पुतण्या विश्वासराव अनपेक्षित रीत्या युद्धात मृत्यू पावल्यामुळे बिथरले आणि 'गिलच्या खाशासुद्धा ठार करिन तरच पुण्यास जाईन' अशी प्रतिज्ञा केली आणि हाती तलवार घेऊन थेट युद्धाच्या गर्दीत घुसले. ते आत गेले ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत. विश्वासराव व भाऊसाहेब दोघेही अंबारीत न दिसल्याने मराठ्यांचा धीर खचला व हाती आलेला विजय निसटला. 

या घटनेस अदमासे १५ वर्षे लोटली आणि एक दिवस पानिपतावर गर्दीत हरवलेले सदाशिवराव हे पुन्हा आले आहेत अशी बातमी थेट पुण्याच्या शनिवार वाड्यापर्यंत येऊन धडकली. सगळेच हैराण झाले. भाऊसाहेब खरंच जिवंत असतील तर याहून आनंदाची गोष्ट नव्हती पण ते भाऊसाहेब नसून जर कोणी भलतेच असेल तर कठीण परिस्थिती येणार होती कारण भाऊसाहेबांची पत्नी पार्वतीबाई यांना भाऊसाहेब गेले आहेत यावर विश्वास नव्हता. भाऊसाहेबांचा मृतदेह त्यांनी डोळ्याने पहिला नसल्याने त्यांनी अखेरपर्यंत सौभाग्य लेणे उतरवले नव्हते.

तर भाऊसाहेब हे परत आले आहेत अशी बातमी पुण्यास समजली तेव्हा नानासाहेब पेशवे यांचे द्वितीय पुत्र थोरले माधवराव पेशवे यांची कारकीर्द सुरु होती. कालांतराने स्वतःस सदाशिवराव म्हणवून घेणारा मनुष्य पुण्यास आला व त्याची प्रथम चौकशी झाली. चौकशी अंती हा खरा नसून तोतया आहे हे लक्षात आले व या गुन्ह्याकरिता त्यास रत्नागिरीच्या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले.

यावेळी रत्नागिरीचा मामलेदार रामचंद्रनाईक परांजपे हा असून तो पेशव्यांच्या नातेसंबंधातील एक मोठा सावकार सुद्धा होता. त्याकाळी मराठी फौजा गुजरात व कर्नाटकातील मोहिमांमध्ये गुंतल्या होत्या त्यामुळे राज्यात तशी धामधुमच उडाली होती याचा फायदा उचलून लाभ करून घ्यावा अशी इच्छा त्याची झाली आणि त्याने तोतयाची रत्नागिरीच्या तुरुंगातून मुक्तता करून त्याच्या नावाची द्वाही सदाशिवराव भाऊ म्हणून फिरवली.

कैदेतून सुटका झाल्यावर बघता बघता अनेक जण तोतयावर विश्वास टाकू लागले आणि खूप मोठे सैन्य व अगदी आरमारातील सैन्य सुद्धा त्याला सामील झाले आणि त्याने सुवर्णदुर्ग ते मुंबईपर्यंत खूप मोठा प्रांत स्वतःच्या ताब्यात घेतला. तोतयाचे वाढते बंड पाहून मराठ्यांचे शत्रू असलेले हैदर व इंग्रज यांनी सुद्धा तोतयास कुमक पुरवली.

एके दिवशी तर तोतयाने तब्बल २० हजाराची फौज घेऊन बोरघाट चढून राजमाची हा किल्ला ताब्यात घेतला व तेथून त्याने थेट पुण्यावर हल्ला करण्याचा बेत केला. यावेळी सिंहगडावरील माणसेही तोतयास मिळण्याची शक्यता दिसू लागली. पेशव्यांच्या अगदी जवळची माणसे म्हणजे व्यंकट राव घोरपडे, रघुनाथ कोल्हटकर, नारोशंकर हे सुद्धा तोतयास सदाशिवराव भाऊ समजू लागले. खुद्द पार्वतीबाई या सुद्धा आपले जवळचे आप्तेष्ट विशेषतः अनुबाई घोरपडे या सुद्धा तोतयास खरा मानू लागल्याने हा तोतया नसून खरोखर आपले पती सदाशिवराव तर नाहीत ना असा विचार करू लागल्या.

असे असले तरी सदाशिव राव भाऊंच्या मृत्यूनंतर अब्दालीस खंडणी देऊन सदाशिवराव भाऊंचे पार्थिव मिळवल्याचा वृत्तांत मराठ्यांचा सुजाउद्दौला याच्याकडील वकील काशीराज शिवदेव याने पेशव्यांना पूर्वीच कळवला असल्याने हे खरे भाऊसाहेब नसून त्यांचा तोतया आहे याची खात्री पेशव्यांची झाली होती. 

तरी आता मात्र या तोतयाचा कायमचा बंदोबस्त करणे ही पेशव्यांसाठी काळाची गरज होऊन बसली. भिवराव पानसे हे तोफखान्याचे कारभारी होते त्यांनी सोबत पाच हजाराची फौज व तोफखाना घेऊन तोतयाच्या सैन्यावर हल्ला केला व पानसेंच्या तोफखान्याने तोतयाचे कंबरडे बरेच मोडले. शेवटच्या लढाईत तर तोतयाची खूपच वाताहत झाली व त्याच्यासोबतची सर्वच फौज पूर्णपणे पांगली. युद्धात पराभव व मिळवलेला मुलुख ताब्यातून गेल्याने तोतया पलायन करण्याचा विचार करून समुद्रमार्गे मुंबईस जाऊ लागला मात्र रघुजी आंग्रे यांनी त्यास समुद्रातच धरले आणि पुण्यास पाठवले.

तोतया पुण्यास आल्यावर त्याची कठोर चौकशी झाली या चौकशी मध्ये तो म्हणाला की,

"माझे खरे नाव सुखलाल, छत्रपूरजवळ कन्नोल नावाचे हे गाव आहे मी त्याच गावाचा. माझ्या वडिलांचे नाव महानंद, आईचे नाव अन्नपूर्णा आणि आजीचे नाव मन्मथा. माझी जात कनौज ब्राह्मण"

झाले, तोतयाचा खेळ संपला आता वेळ होती शिक्षेची, तोतयाने स्वतःस सदाशिवराव भाऊ म्हणावयाचा गुन्हा केला होताच मात्र याच्याही पुढे जाऊन त्याने बंड उभारून मुलुख ताब्यात घेऊन पुण्यावर हल्ला करण्याचा कट सुद्धा केला होता त्यामुळे शिक्षा एकच, ती म्हणजे मृत्युदंड!

मग त्याला गाड्यावर बसवून शहरात त्याची धिंड काढण्यात आली, त्याला ज्यांना ज्यांना दाखवायचे राहिले होते त्यांना त्यांना दाखवला आणि मग एका उंटावर बसवून पुन्हा फिरवला आणि मेखसूने (ही रुंद माथ्याच्या लोखंडी छिन्या ठोकण्याची लाकडी ठोकणी असते व हिला दांडा असतो) डोके फोडून त्याचा अंत करण्यात आला.

सुखलालचा अंत झाल्यावर त्याला मदत करणाऱ्या अनेकांचे पारिपत्य करण्याचे कार्य नाना फडणवीस यांनी केले कारण एक साधा तोतया सुद्धा मनात आल्यास सत्ताधीशांना एवढा घाम फोडू शकतो तर प्रबळ शत्रू असल्यास काय गत होईल त्यामुळे अशी बंडे भविष्यात होऊ नयेत म्हणून बंडात सामील असलेल्यानां कुठलीही माया न दाखवता कठोर दंड करण्यात आले व तोतयाचे हे बंड संपुष्टात आणण्यात आले.