फत्तेसिंग भोसले - अक्कलकोट संस्थानाचे संस्थापक

छत्रपती शाहू महाराज फत्तेसिंग यांना पुत्र मानत असल्याने शाहूकालीन कागदपत्रांमध्ये फत्तेसिंग यांचा उल्लेख चिरंजीव असाच येतो.

फत्तेसिंग भोसले - अक्कलकोट संस्थानाचे संस्थापक
फत्तेसिंग भोसले

महाराष्ट्र राज्यातील अक्कलकोट संस्थानाचे संस्थापक म्हणून फत्तेसिंग भोसले यांचे नाव घेतले जाते. या लेखाच्या माध्यमातून आपण फत्तेसिंग भोसले यांच्या जीवन चरित्राची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

१७०७ साली छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात आले त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुलुखात आपला अमल बसवण्यास सुरुवात केली. या काळात औरंगाबाद जिल्ह्यातील परगणे शिवणे येथील पारद या गावाचे पाटील सयाजी लोखंडे यांनी शाहू महाराजांना विरोध केला कारण त्यावेळी हा परिसर मोगलांकडे होता.

यानंतर छत्रपती शाहू महाराज व सयाजी लोखंडे यांच्या सैन्यात लढाई होऊन सयाजी पाटील मारले गेले. यावेळी सयाजी पाटील यांची पत्नी आपले लहान मूल घेऊन शाहू महाराजांच्या घोड्याजवळ गेली आणि ते मूल त्यांच्या पायावर ठेऊन शाहू महाराजांना म्हणाली की, या बालकास वाचवावे, हे मूल आपल्या चरणी वाहिले आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा या निरागस बालकाचा स्वीकार केला आणि या लढाईत विजय अर्थात फत्ते मिळाला म्हणून या बालकाचे नाव फत्तेसिंग असे ठेऊन त्यास आपला मानसपुत्र मानले.

फत्तेसिंग यांचे बालपण सातारा येथेच गेले व वीरूबाई यांनी त्यांचे आईप्रमाणे पालनपोषण केले. वीरूबाई यांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी त्यांची उत्तरक्रिया फत्तेसिंग यांनीच केली.

वीरूबाई यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या खर्चाकरिता नेमलेला अक्कलकोट परगणा फत्तेसिंग यांना दिला. 

छत्रपती शाहू महाराज फत्तेसिंग यांना पुत्र मानत असल्याने शाहूकालीन कागदपत्रांमध्ये फत्तेसिंग यांचा उल्लेख चिरंजीव असाच येतो.

१७१५ साली शाहू महाराजांनी पारद हे फत्तेसिंग भोसले यांचे मूळ गाव त्यांच्या भावास इनाम म्हणून दिले. 

फत्तेसिंग भोसले यांनी आपल्या कार्यकाळात बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे या तीन पेशव्यांच्या कारकीर्दी पहिल्या. 

अनेक मोहिमांमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे व इतर सरदारांच्या साथीने शौर्य गाजवून स्वराज्याची सेवा केली.

कोल्हापूर, कर्नाटक, भागानगर, बुंदेलखंड त्रिचनापल्ली आदी प्रांतांवर फत्तेसिंग भोसले यांनी स्वाऱ्या केल्याचे उल्लेख कागदोपत्री आढळतात.

छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाल्यानंतर फत्तेसिंग भोसले अत्यंत दुःखी झाले व त्यांनी खूप शोक केला.

१७६० साली फत्तेसिंग भोसले यांचा मृत्यू अक्कलकोट येथे झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांनी अक्कलकोट संस्थानाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली.