पौड खोऱ्यातील कोरीगड
फाल्गुन वद्य चतुर्थीला सिंदोळ्यावर हिंदोळा घेऊन आल्यावर सह्याद्रीत पाऊल ठेवलंच नव्हतं. ठरवलेले अनेक प्लान्स अनेकांनी मोडीत काढले. शेवटी आमच्या सर्वांच्या खास CA दर्शना राऊत यांनी सोप्या ट्रेकचा प्रस्ताव मांडला. वाळवंटात मरूद्यान दिसावं असा काहीसा प्रस्ताव लगेच सर्वानुमते पास करण्यात आला. अनेक ठिकाणं धूंडाळल्यावर १मेच्या शुभ मुहुर्तावर लोणावळ्याच्या कोरीगडवर जाण्यासाठी मी, कमलेश, सायली, दर्शना सज्ज झालो.

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा
१ मेच्या पहाटे-पहाटे ‘इंद्रायणी’तून आधी सर केलेले सोनगिरी व राजमाचीचे बालेकिल्ले पाहत लोणावळा गाठले. लोणावळा स्थानकात स्वागतासाठी दीपक आधीपासूनच हजर होता.पण दीपकच्या क्लासमुळे त्याच्याशिवायच कोरीगड पाहावा लागणार होता :(. सर्वांची दीपक सरांशी ओळख करुन दीपकच्या घरी गेलो. दीपकच्या आई-काकूंनी दिलेला चहा त्यांच्या प्रेमामुळे खूपच चविष्ट झाला होता. शेवटी पुस्तकांची अदलाबदल केली(आम्ही याचसाठी ट्रेक करतो.). दीपक व काकूंचा निरोप घेऊन ९च्या भांबुर्डे ST ने कोरीगडला स्वारी निघाली. लोणावळा शहर, धरण, भुशी डॅम, घुसळखांब, INS शिवाजी, lion point मागे टाकत ST ने पेठ शहापूर गावात उतरवले पेठ शहापूर गावात उतरल्यावर समोरच कोरीगड उभा ठाकलेला होता.
पौड खोऱ्यातील या गडाच्या नावाचा कोराई, कोरी, कुवारी, कोर्हा, कोरा असा उल्लेख कागदपत्रातून येतो. बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे या सत्ता या गडावर नांदल्या व अखेरीस इतर गडांप्रमाणेच हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७१-७२च्या अंदाजपत्रकात कोरीगडसाठी ३००० होन इतकी तरतूद करण्यात आली होती. यावरून शिवकाळात कोरीगडला किती महत्त्व होते हे लक्षात येते.
गडाच्या वाटेची विचारपूस केली नि कोरीगडच्या वाटेला लागलो. वाट तशी स्पष्टच आहे. साधारण बैलगाडीची वाट गडाच्या नव्या बांधीव पायऱ्यांपर्यन्त नेऊन पोहोचवते. पण सरळ वाटेचा आम्हाला त्रास असल्याने उजवीकडील रानात शिरलो नि गर्द वेलींच्या आच्छादनातून व कोरीगडच्या सावलीतून सीमेंटच्या पायऱ्या जवळ केल्या.
पायऱ्यांवरुन मार्गक्रमण करत वाटेतील माकडांच्या आक्रमक हावभावाला हातातील काठीचा धाक दाखवून प्रत्युत्तर देऊन थोड्याच वेळात दुघई लेण्यांकडे येऊन पोहोचलो. इथेही काही माकडांचे खेळ चालू होते. या लेण्यांच्या बाजूला श्रीगणेशाची कोरीव मूर्ती आहे. लेण्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. आत एक प्रशस्त खोली व कोनाडे आहेत.
श्रीगणेशाचे दर्शन घेऊन पाऊले पुढे चालू लागली. गडाची वाट ही बरोबर बुरुजांच्या माऱ्यात होती. कडक उन्हात सायलीने आणलेलं थंडगार कोकम सरबताची चव चाखत एका आडवाटेवरील खोलीजवळ गेलो. प्रथमदर्शनी इथल्या अंधारामुळे काहीच दिसत नाही. पण नीट पाहिल्यास एक पाण्याचे टाकं दिसतं आणि या पाण्याची चव तर एकदम झ्याकच… थंडगार व चविष्ट पाणी पिऊन नव्या जोमाने गडी पुन्हा मार्गस्थ झाले. इथून थोड्याच अंतरावरील एक गुहेजवळ पोहोचलो. सभोवतालचे इथून सुंदर दर्शन होते. गुहापाहून पुढे निघालो नि गडाच्या गणेश प्रवेशद्वारात पोहोचलो. सर्व अस्मानि संकटांना व मानवी दुष्कृत्यांना तोंड देत हा गणेश दरवाजा आजही गतवैभवाची साक्ष देत उभा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस वर्तुळाकार पुष्पाकृती कोरलेली आहे. प्रवेशद्वाराची भव्यता डोळ्यात नि मोबाईल मध्ये साठवत गडप्रवेश केला.
दरवाजालगत उजव्या बाजूला पहारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठी छोट्या खोल्या बांधलेल्या आहेत. दरवाजातून पुढे उंचीवर आल्यास गडाचा एकूण घेरा लक्षात येतो. तर समोरच मंदिराचे दर्शन होते. गडप्रवेश करुन डावीकडील तटबंदीवरून गडफेरीस सुरुवात केली. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आढळतात. या तटबंदीच्या बुरुजावरुन गडाची वाट बरोबर माऱ्यात येते.
महाराष्ट्रातील विशेषतः सह्याद्रीतील मोजक्याच गिरीदुर्गांची बहुतांश तटबंदी सुस्थितित आहे. त्यापैकी एक नशीबवान हा कोरीगड. तटबंदी उतरत जवळ असलेल्या वास्तुच्या अवशेषांकडे गेलो. एखाद दूसरी भिंत व चौथरा वगळता संपूर्ण वास्तू धासळली आहे. हे सर्व पाहून दक्षिणेकडील बुरुजाकडे निघालो. दक्षिणेकडील बुरुजाकडे जाताना वाटेत काही वास्तुंची जोती लागतात. तर उजव्या हाताला एक खळगा व त्यापलीकडे कोराई देवीचे मंदिर लागते. कोराई देवीला लांबूनच नमस्कार करून पुढे निघालो.
बुरुजाच्या अलीकडे एक मोठी तोफ दुरावस्थेत पडलेली आहे. बुरुजावर वीजेचे खांब नि त्याचे नियंत्रण करणारी मशीन बसवलेली आहे. या बुरुजावरुन संपूर्ण Ambey Valley व मुळशीचे विहंगमदृश्य दिसते. तर खाली उजव्या बाजूला संरक्षणासाठी केलेले बांधकाम दिसते. बुरुजाच्या डाव्या तटबंदीला लागून वाटचाल चालू होती. या वाटेवरही एक तोफ पडलेली दिसते व इथून गडाच्या आंबवणे कडील दरवाजाने दर्शन दिले. मग याच प्रशस्त तटबंदीची साथ करून मागील दरवाजाजवळ पोहोचलो. गणेश दरवाजापेक्षा याची ऊंची कमी आहे. इथून येण्या-जाण्याची वाटही बिकट आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस पुष्पाकृती कोरलेल्या आहेत.
या दरवाजाच्या तटबंदीला जोडून असलेल्या पायऱ्या चढून कोराई देवीच्या दर्शनासाठी आमच्या दर्शना सोबत दाखल झालो. श्री कोराई/कुवारी देवी म्हणजे कोराईगडाची गडदेवता. चार हातांची कोराई देवी दैत्यांचा विनाश करण्यासाठी शस्त्र धारण करून लढायला सज्ज आहे. इसवी सन १८१८मध्ये जेव्हा इंग्रजांनी कोरीगड काबीज केला, तेव्हा कोराई देवीच्या अंगावर खरेखुरे दागिने होते. ते इंग्रजांनी काढून आणून मुंबईच्या श्री मुंबादेवीला दिले. त्यावेळी त्यांची किंमत ५० पाउंड किंवा ५०० रुपये इतकी होती. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ व काही शिल्प आहेत.
देवीचे दर्शन घेऊन सर्वांनी घरुन आणलेली व काकींनी दिलेली शिदोरी संपवली नि तिथेच क्षणभर विश्रांती घेतली. आराम हराम है! हे आठवलं नि आवरतं घेत पुढील गडफेरीसाठी निघालो. मंदिरापासून काही अंतरावर एक तोफ आहे. या तोफेला लक्ष्मी तोफ म्हणतात. या तटबंदीत काही ठराविक अंतरावर शौचकूप आहेत. तसेच ठिकठिकाणी जंग्याही आहेत. पुढे चालत चालत तळ्यापाशी पोहोचलो. गडावर दोन मोठी तळी आहेत व त्यात पाणीही विपुल प्रमाणात आहे. एका तलावाला पाणी साठवण्यासाठी(?) भिंतीचे बांधकाम केलेले आढळते.
तलावाच्या पुढे थोड्याच अंतरावर पश्चिमेच्या कड्याजवळ उत्तरेला तटबंदीच्या आतील बाजूस तीन खांबटाकी आहेत. त्यापैकी एकाला गणेश टाकं असं नाव दिलेलं आहे. इथून पुढील तटबंदी उत्तर बुरुजाकडे नेते. या बुरुजावरून पेठ शहापूर, पश्चिमेला कोकण, पूर्वेला मोरगिरीची रांगेचे विहंगम दृश्य व गडाचा एकंदर घेरा दिसून येतो.
उत्तर बुरुजावरुन निरीक्षण करून व फोटोसेशन वगैरे पार पाडून पुन्हा तटबंदी वरून गणेश दरवाजाच्या अलीकडे तटप्रदक्षिणा पूर्ण केली व पुन्हा गडाच्या पठारावर उतरलो इथेही अनेक वास्तुंची जोती आहेत. तर एक महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात नंदी महाराज व दोन तोफा आहेत. इथूनच पुढील वाटेवर दोन बाजूला समान अंतरावर वास्तुंचे अवशेष आहेत. हे सर्व पाहून पुन्हा गणेश दरवाजात आलो व गड उतरायला सुरुवात केली. आल्या वाटेवरील टाक्यातील थंड पाणी पुन्हा पिऊन जीव शांत केला. वानरसेनेच्या हल्ल्यापासून रक्षण करून सुखरूपपणे गडफेरी झाल्याबद्दल दुघई लेण्याबाजूच्या बाप्पाला हात जोडले नि लगेच गड पायथ्याला आलो. कच्च्या रस्त्यापासून सायलीने लावलेल्या दर्दभऱ्या गाण्यांच्या नक्की अर्थ काय! यावर चर्चा करत पेठ शहापूरला आलो व थोड्याच वेळात आलेल्या जीपने लोणावळ्याकडे मार्गस्थ झालो.
– अमित म्हाडेश्वर