खंडेराव दाभाडे - मराठा साम्राज्याचे सरसेनापती

१७१७ साली छत्रपती शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सेनापती पद बहाल केले व हे पद खंडेराव दाभाडे यांच्यापासून त्यांच्या घराण्यात कायमस्वरूपी झाले.

खंडेराव दाभाडे - मराठा साम्राज्याचे सरसेनापती
खंडेराव दाभाडे

मराठा साम्राज्यातील अनेक कर्तबगार पुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमाने इतिहासात आपले नाव अजरामर केले आहे त्यापैकी एक म्हणजे सरसेनापती खंडेराव दाभाडे.

खंडेराव दाभाडे हे येसाजी दाभाडे यांचे ज्येष्ठ पुत्र. येसाजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत खंडेराव दाभाडे हे स्वराज्यकार्यात सामील झाले मात्र त्यांचा थेट उल्लेख १६९१ साली छत्रपती राजाराम महाराज यांनी ज्यावेळी जिंजीस प्रस्थान केले त्यावेळी आढळतो कारण खंडेराव दाभाडे हे अगदी सुरुवातीपासून छत्रपती राजाराम महाराजांबरोबर इतर सहकाऱ्यांसहित जिंजीच्या प्रवासात होते व या प्रवासात खंडेराव यांनी राजाराम महाराजांना मोलाची साथ दिली.

१६९६ साली खंडेराव दाभाडे यांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान पाहून छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना तळेगाव दाभाडे जवळील इंदुरी हे गाव इनाम म्हणून दिले आणि १६९८ साली खंडेराव यांना जुन्नर व इतर विभागांची सर पाटीलकी प्राप्त झाली.

छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून परत आल्यावर त्यांनी खंडेराव दाभाडे यांना सेनाधुरंधर हे पद आणि पोशाख, निशाण आणि जरीपटका प्रदान करून गुजरात व बागलाण प्रांतावर मोहिमेस पाठवले.

कालांतराने खंडेराव दाभाडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी पुणे, अकोले आणि जावळे या महालांची सरपाटीलकी आणि इतर काही प्रांतांची सरदेशमुखी प्रदान केली.

छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून स्वराज्यात पुन्हा आल्यावर स्वराज्याचे वारस या नात्याने खंडेराव दाभाडे छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात सामील झाले. खंडेराव दाभाडे यांनी ताराराणींच्या पक्षात पुन्हा यावे यासाठी चंद्रसेन जाधव यांनी पुष्कळ प्रयत्न केले मात्र त्यांना यामध्ये यश आले नाही.

१७१७ साली छत्रपती शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सेनापती पद बहाल केले व हे पद खंडेराव दाभाडे यांच्यापासून त्यांच्या घराण्यात कायमस्वरूपी झाले. 

दिल्लीच्या बादशहाने दक्खनचे सुभेदार सय्यद बंधूंमधील हुसेनअली याच्या विरोधात छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागितली त्यावेळी शाहू महाराजांनी ही जबाबदारी खंडेराव दाभाडे यांच्याकडे सोपवली त्यानुसार खंडेराव यांनी खानदेश आणि गुजरातवर स्वाऱ्या करून हुसेनअलीचा रस्ता अडवून धरला. हुसेनअली ने खंडेराव यांच्यावर फौज पाठवली असता खंडेराव यांनी आपल्या सैन्यासहित हुसेनअलीच्या सैन्यास एका ठिकाणी गाठून कापून काढले.

२४ एप्रिल १७१७ साली हुसेनअलीने पुन्हा आपले सैन्य तयार करून खंडेराव यांच्यावर पाठवली त्यावेळी खंडेराव यांनी निंबाळकर आणि सोमवंशी या सरदारांच्या मदतीने हुसेनअलीचा कायमचा बंदोबस्त केला.

सय्यद बंधूंचा हस्तक असलेल्या अमलअली आणि निजाम यांच्यामध्ये १७२० साली बाळापूर येथे लढाई झाली त्यावेळी सय्यदांनी छत्रपती शाहू महाराजांकडे मदत मागितली त्यावेळी सुद्धा खंडेराव दाभाडे या मोहिमेवर गेले होते. १७२५ व १७२६ या वर्षांदरम्यान कर्नाटक येथे झालेल्या स्वारीत फत्तेसिंग भोसले यांच्यासहित खंडेराव दाभाडे सहभागी झाले होते.

खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने वसई ते सुरत हा कोकणातील प्रदेश काबीज केला होता. एका पत्रात खंडेराव यांच्याबद्दल शाहू महाराजांनी 'बडे सरदार मातब्बर, कामकरी हुशार होते' असा उल्लेख केला आहे.

खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याच्या वाढीत मोलाचा हातभार लावल्याने छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या माणसांमध्ये त्यांची गणना होत असे. खंडेराव दाभाडे एकदा आजारी असताना स्वतः शाहू महाराज त्यांना भेटण्यास गेले होते. 

खंडेराव दाभाडे यांचे १७२९ साली वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे त्यांच्या वीर पत्नी उमाबाई दाभाडे आणि त्रिंबकराव, यशवंतराव आणि बाबुराव हे तीन पुत्र होते. खंडेराव यांचे त्रिंबकराव हे पुत्र सुद्धा वडिलांप्रमाणेच पराक्रमी होते.

खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याची अमूल्य सेवा केल्याने छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना त्यांच्या कार्याचे वेळोवेळी योग्य इनाम दिले. खंडेराव यांनी स्वकर्तृत्वावर तब्बल ३९५ गावांची सरपाटीलकी म्हणजे ७०० गावांची सरदेशमुखी प्राप्त केली होती व एवढी इनामे क्वचितच कुणा वतनदारांना प्राप्त झाली असावीत.