खंडेराव गुजर - स्वामीनिष्ठ शिलेदार

शाहूराजांचे धर्मांतर रोखण्याचा हाच एक उपाय असे समजून सहकाऱ्यांपैकी एकाने सर्वप्रथम हात पुढे केला व शाहूराजांऐवजी तुम्ही माझे धर्मांतर करा असे औरंगजेबास सांगितले व ते होते स्वामिनिष्ठ खंडेराव गुजर.

खंडेराव गुजर - स्वामीनिष्ठ शिलेदार

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माणात पिता शहाजी महाराज व माता जिजाऊ यांचे आशीर्वाद व जीवास जीव देणाऱ्या शिलेदारांची साथ लाभली. स्वराज्यकार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या शिलेदारांची परंपरा शिवकाळापासून पुढेही सुरूच राहिली व अशाच असंख्य शिलेदारांपैकी एक म्हणजे खंडेराव गुजर. 

खंडेराव गुजर हे वीर प्रतापराव गुजर यांचे थोरले पुत्र. राजधानीचे स्थळ रायगड असताना प्रतापराव गुजर यांचे वास्तव्य रायगडाच्या आसमंतातील ताम्हाणे तर्फ गोरेगाव येथे असल्याचे उल्लेख आढळतात. रायगड जिल्हा गॅझेटिअर मध्ये ताम्हाणे तर्फ गोरेगाव हे प्रतापराव गुजर यांचे जन्मस्थान असल्याची नोंद आहे.

१६८९ साली मोगलांनी भेद करून रायगड किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी महाराणी येसूबाई, राजपुत्र शाहू महाराज यांच्यासहित अनेक मातब्बर मंडळींच्या कुटुंबियांना सुद्धा कैद करण्यात आले व त्यांना मोगलांच्या छावणीत कैद पत्करावी लागली यावेळी प्रतापराव गुजर यांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. 

अशाप्रकारे स्वराज्याची अस्मिता मोगलांच्या कैदखान्यात सापडली असताना औरंगजेबाच्या मनात सर्वांचे धर्मांतर करावे अशी इच्छा वेळोवेळी येत असे मात्र औरंगजेबाची कन्या त्यास हे कृत्य करण्यास कायम विरोध करत असे व कन्येच्या इच्छेपुढे औरंगजेबाचे काही चालत नसे.

मात्र मुलीने कितीही समजावले तरी औरंगजेबाच्या मनात सर्वांचे धर्मांतर करण्याची इच्छा घर करून होतीच व एके दिवशी त्याने सर्वांचा सल्ला नाकारून शाहू राजे यांचे धर्मांतर करण्याचा निश्चय केला. यावेळी सर्वांनी औरंगजेबास खूप विरोध केला मात्र औरंगजेबाचा इरादा पक्का झाल्याने तो कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

मोगलांच्या अफाट सैन्यात कैदेत असलेल्यांची संख्या खूप कमी असल्याने औरंगजेबास थेट विरोध करणे म्हणजे मृत्यूस कवटाळण्यासारखे होते त्यामुळे येसूबाईंसहित सर्वच चिंतेत पडले. यावेळी औरंगजेबाच्या मुलीने त्यास रोकण्याचा अखेरचा पर्याय म्हणून औरंगजेबास असे सांगितले की जर तुम्ही शाहू राजांचे व मराठ्यांचे जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न केलात तर मी माझा जीव देईन.

हे ऐकून औरंगजेब थोडा शांत झाला व शाहू राजांचे धर्मांतर करण्याचा बेत त्याने रद्द केला मात्र त्याने मुलीस असेही सांगितले की शाहू नाही तर आज त्याच्या सहकाऱ्यांपैकी एकाचे तरी धर्मांतर केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि त्यांच्यापैकी एकानेही जर धर्मांतर करण्यास नकार दिला तर नाईलाजाने मला शाहूंचे धर्मांतर करणे भाग आहे.

शाहूराजांचे धर्मांतर रोखण्याचा हाच एक उपाय असे समजून सहकाऱ्यांपैकी एकाने सर्वप्रथम हात पुढे केला व शाहूराजांऐवजी तुम्ही माझे धर्मांतर करा असे औरंगजेबास सांगितले व ते होते स्वामिनिष्ठ खंडेराव गुजर. राजासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी असायला हवी असा आदर्श त्यांनी या कृतीतून जगापुढे ठेवला. यानंतर खंडेराव गुजर यांचे धर्मांतर करण्यात आले व पुढे औरंगजेबानेही मराठ्यांपैकी कुणाचेही धर्मांतर करण्याचा विचारच सोडून दिला.

पुढील काळात औरंगजेबाचा मृत्यू झाला व शाहूराजांनी आणि सहकाऱ्यांची कैदेतून सुटका झाली आणि कालांतराने शाहू महाराजांनी आपले राज्य प्राप्त केल्यावर खंडेराव गुजर यांनी केलेल्या त्यागाचे बक्षीस म्हणून त्यांना सातारा जिल्ह्यातील परळी येथील साठ गावांचे देशमुखीचे वतन दिले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी जी स्वामीनिष्ठा वेळोवेळी दाखवली ती छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा कायम राहिली.