हरिहर क्षेत्र – ओडिशा

बोधच्या जवळ आहे ‘हरिहरक्षेत्र’. अर्थात हे नाव स्थानिकांनी दिलेले आहे. बोध पासून १५ कि.मी. वर असलेल्या ‘गंधराडी’ गावात दोन प्राचीन मंदिरे शेजारी शेजारी उभी आहेत. एक आहे विष्णूचे आणि एक आहे शिवाचे. - आशुतोष बापट

हरिहर क्षेत्र – ओडिशा
हरिहर क्षेत्र

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात निवांत पाय सोडून बसलेला ओडिशा. कोणार्क, जगन्नाथपुरी, भुवनेश्वर सारखी दिग्गज वारसास्थळे आपल्या अंगावर लेवून बसलेला ओडिशा. पिपली, रघुराजपूर सारखी कलाक्षेत्रे सांभाळून असलेला ओडिशा. प्रत्येक वेळी ओडिशा आपले एखादे तरी नवीन रूप दाखवतो. मग ते कधी बिन दाराचे गाव असलेले सियालिया असेल नाहीतर कधी चौरासीचे बाराही मंदिर असेल. ओडिशाच्या प्रत्येक भेटीत काहीना काही नवीन गवसतेच. असेच एकदा आड वाटेवरचा ओडिशा हिंडताना बोध या गावी जायचा योग आला. बोध हा ओडिशामधला नवीनच झालेला जिल्हा आहे. संबळपूरच्या जवळ असलेले हे ठिकाण. गौतम बुद्धाच्या दोन सुरेख मूर्ती या गावात बघायला मिळतात. त्यावरूनच याचे नाव बोध पडले. बोध गावात जाताना मुद्दाम रात्री जावे. महानदी ओलांडून गावात जावे लागते. त्या नदीवर असलेल्या पुलाचे खांब दिव्याच्या माळांनी सजवतात. इतका अफलातून पूल मी तरी कुठे बघितला नाही.

या बोधच्या जवळ आहे ‘हरिहरक्षेत्र’. अर्थात हे नाव स्थानिकांनी दिलेले आहे. बोध पासून १५ कि.मी. वर असलेल्या ‘गंधराडी’ गावात दोन प्राचीन मंदिरे शेजारी शेजारी उभी आहेत. एक आहे विष्णूचे आणि एक आहे शिवाचे. या ठिकाणी विष्णूचे नाव आहे ‘नीलमाधव’ आणि शिवाचे नाव आहे ‘सिद्धेश्वर’. इ.स.च्या १०-११ व्या शतकात बांधलेली ही मंदिरे. ही दोन्ही मंदिरे एकाच चौथऱ्यावर बांधलेली आहेत. विष्णू मंदिराच्या शिखरावर चक्र आहे तर शिवमंदिराच्या शिखरावर शाळुंका आहे. बाजूचा परिसर अतिशय शांत आणि सुंदर आहे. हा सगळा परिसर पुरातत्त्व खात्याने उत्तम राखलाय. दोन्ही मंदिरांचे स्थापत्य अगदी एकसारखे. जगमोहन म्हणजे सभामंडप आणि मग गाभारा असे याचे स्वरूप. जगमोहनाच्या बाहेर दोन स्तंभांवर नाग-नागीचे सुंदर शिल्प. शिवमंदिरात आतमध्ये आधी ३-४ नंदी आणि गाभाऱ्यात शिवपिंड. तर विष्णू मंदिराच्या गाभाऱ्यात विष्णूची सुंदर मूर्ती दिसते. देवाच्या पायाशी भूदेवी आणि श्रीदेवी. देवाचे हात भग्न झाल्याने आयुधे समजत नाहीत. मात्र त्रिवलयांकित गळा, दंडातील, गळ्यातील दागिने उत्तम. चेहरा तर फारच सुरेख. दोन्ही मंदिरांच्या सभामंडपाला दोन्ही बाजूंनी जालवातायन. एकंदरीत सोपा आणि सुटसुटीत कारभार. मंदिराच्या पार्श्वदेवतांचे कोनाडे रिकामे आहेत. बाहेरून काही शिल्पकला नाही. पण मंदिरे दिसतात फारच देखणी.

शेजारी शेजारी शिव-विष्णूची अशी मंदिरे फारशी कुठे दिसत नाहीत. हरीहराची मूर्ती दिसते मात्र अशी शेजारी शेजारी मंदिरे अगदीच दुर्मीळ. या बोध गावात अजून काही मंदिरे आहेत. त्याबद्दल नंतर बघू. ही दोन मंदिरे मात्र फारच अप्रतिम आहेत. शांत रम्य परिसर, आजूबाजूला पुरातनवृक्ष आणि चौथऱ्यावर हे आगळेवेगळे हरिहर. ओडिशा खरंच आपले अंतरंग असे हळूहळू उलगडून दाखवतो. खूप वेळा इथे यायला हवे तर काहीतरी आपल्याला गवसले आहे असे वाटेल. हे इतके सुंदर देखणे स्थापत्य बघायला मिळाले. देवाक काळजी दुसरं काय !!

- आशुतोष बापट