छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक

शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले व हे कार्य करीत असताना त्यांच्या जीवास वेळोवेळी धोका उत्पन्न होण्याच्या शक्यता असत. अशावेळी विश्वासू अंगरक्षकांचा एक समूह कायम त्यांच्या आजूबाजूस प्रामुख्याने मोहिमेच्या वेळी सज्ज असे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हा विषय शिवचरित्राचा अभ्यास करणाऱ्यांचा औत्सुक्याचा विषय. प्राचीन काळापासून राजाच्या जीवास विविध कारणांपासुन धोका संभावित असायचा. त्यामुळे सोबत अत्यंत विश्वासू अशी माणसे कायम राजाच्या रक्षणासाठी तैनात असायची ज्यांना अंगरक्षक असे म्हटले जाई.

शिवरायांनी तर शून्यातून स्वराज्य निर्माण केले व हे कार्य करीत असताना त्यांच्या जीवास वेळोवेळी धोका उत्पन्न होण्याच्या शक्यता असत. अशावेळी विश्वासू अंगरक्षकांचा एक समूह कायम त्यांच्या आजूबाजूस प्रामुख्याने मोहिमेच्या वेळी सज्ज असे.

शिवरायांचे हे विश्वासू अंगरक्षक कोण होते या प्रश्नाचे एकच उत्तर खरे तर अवघड कारण शिवरायांच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीत त्यांच्यासोबत विविध अंगरक्षक असणे साहजिक होते मात्र तरीही अफजलखान भेटीच्यावेळी शिवाजी महाराजांसोबत जे अंगरक्षक होते त्यांची नावे आपण ठामपणे ऐतिहासिक साधनांवरून सांगू शकतो. 

या भेटीप्रसंगी दगाफटका होण्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजुंनी अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली होती. दोन्ही बाजूचे सैन्य शामियान्यापासून लांब ठेवून अफजलखान व शिवाजी महाराज दोघांनीच शस्त्रसज्ज होऊन निघावे आणि सोबत फक्त दोन अथवा तीन माणसे घ्यावीत असे या भेटीचे नियम ठरले होते. यावेळी शिवाजी महाराज व अफजलखान या दोघांचे जे दहा अंगरक्षक आहेत त्यांनी बाणाच्या टप्प्यावर उभे राहावे असे ठरले होते.

यावरून शिवाजी महाराजांसोबत दहा अंगरक्षक होते हे समजते. हे दहा अंगरक्षक कोण हे जाणून घेऊ.

  • संभाजी कावजी
  • काताजी इंगळे
  • कोंडाजी कंक
  • येसाजी कंक
  • कृष्णाजी गायकवाड
  • सूर्याजी काटके
  • जिवाजी महाले 
  • विसाजी मुरुंबकर
  • संभाजी करवर
  • सिद्दी इब्राहिम

ही सर्व नावे शिवभारत या ग्रंथात आढळतात. शिवभारत हा शिवरायांच्या समकालीन ग्रंथ मानला जातो त्यामुळे ही नावे अधिक विश्वासार्ह मानली जातात.

या भेटीवेळी जेव्हा अफजलखानाने डाव्या हाताने शिवरायांची मान पकडून आपली कट्यार उजव्या हाताने जेव्हा शिवरायांच्या कुशीत खुपसली तेव्हा अंगरख्याच्या आत चिलखत असल्याने शिवरायांना घातक इजा झाली नाही मात्र तात्काळ शिवरायांनी आपली मान अफजलखानाच्या हातून सोडवून घेतली आणि अंगराख्यातील तलवार काढून ती अफझलखानाच्या पोटात घुसवली आणि जेव्हा ती बाहेर काढली तेव्हा अफजलखानाचा कोथळा बाहेर आला.

अफजलखान वध प्रसंगी शिवाजी महाराजांनी वाघनखे, बिचवा की तलवार वापरली होती याविषयी ऐतिहासिक साधनांत वेगवेगळी माहिती आढळते मात्र शिवभारतात तलवारीचा उल्लेख आला आहे.

यानंतर कृष्णाजी भास्कर या अफजलखानाच्या वकिलाने शिवरायांवर तलवारीचा हल्ला केला मात्र शिवाजी महाराजांनी तो वार आपल्या तलवारीने अडवला आणि दुसऱ्या हातात असलेल्या दांडपट्ट्याने अफजलखानाच्या डोक्यावर वार केला.

हे पाहून अफजलखानाचे अंगरक्षक ज्यांची नावे अब्दुल सय्यद, बडा सय्यद, पुतण्या रहिमखान, पहिलवानखान, पिलाजी, शंकराजी अशी होती, यांच्यासहित आणखी काही माणसे महाराजांवर धावून गेली. यावेळी महाराजांनी आपल्या दांड पट्ट्याचे वलय आपलय भोवती निर्माण करून सर्वांना काही काळ रोखुन धरले.

याच वेळी या शिवराज रक्षक अशा दहा महावीरांनी गर्जना करून आपल्या म्यानातून तलवारी उपसून पर्वतांनी जसे वायूस अडवावे तसे अफजलखानाच्या अंगरक्षकांना पाणी पाजले. श्री शिवभारत या ग्रंथात शिवरायांच्या दहा अंगरक्षकांचा उल्लेख हा 'शिवराजाभिरक्षीण' असा आला आहे. अशा या दहा महावीरांना मानाचा मुजरा!