शनिवार वाडा - पुण्याची ओळख

बाजीराव पेशवे हे शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान. त्यांचे निवासस्थान म्हणजे पुण्याचा शनिवार वाडा. शनिवार वाडा हे नाव उच्चरले की पुणेकरांचा उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही कारण या वाड्याची महतीच तशी आहे.

शनिवार वाडा - पुण्याची ओळख
शनिवार वाडा

छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांचे राज्य संपूर्ण भारतभर विस्तारले व या विस्तारात अनेक मुसद्दी वीरांनी त्यांना साथ दिली. असेच एक मुसद्दी म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव पेशवे हे शाहू महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान. त्यांचे निवासस्थान म्हणजे पुण्याचा शनिवार वाडा. शनिवार वाडा हे नाव उच्चरले की पुणेकरांचा उर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही कारण या वाड्याची महतीच तशी आहे.

वाडा बांधण्याची कल्पना बाजीराव पेशव्यांना कशी सुचली याविषयी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. एक दिवस बाजीराव पेशवे आपल्या घोड्यावरून या ठिकाणावरून प्रवास करत होते, अचानक त्यांच्या नजरेस एक विलक्षण दृश्य दिसले. एक कुत्रा आपला जीव वाचवत पळत होता व त्याच्या मागे कोणी वाघ नाही तर एक ससा लागला होता.

ससा हा स्वभावाने भित्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि कुत्र्याने सशाच्या मागे लागावे तर येथे नेमके उलटेच चित्र होते. एवढे धाडस सशाच्या अंगी आले तरी कसे असा विचार बाजीरावांच्या मनात आला व एकदम त्यांनी विचार केला की कदाचित या जागेचा तर हा गुण नसावा? जर या जागेत ससा सुद्धा कुत्र्याला जेरीस आणू शकतो तर या ठिकाणी राहिल्यास आपणही मोठं मोठ्या शत्रुंना जेरीस का आणू शकणार नाही? 

बाजीरावांनी विचार केल्याप्रमाणेच शनिवार वाडा बांधल्यावर मराठ्यांनी उत्तरेत मोठ्या प्रमाणात मजला मारल्या. १७३२ साली वाड्याची वास्तुशांती व प्रवेश समारंभ झाला. सुरुवातीस शनिवार वाडा हा दुमजली व तीन चौकी होता व तो बांधण्यास अदमासे १६११० रुपये इतका खर्च आला होता. असे म्हणतात की हा वाडा बांधण्याचे काम शनिवारी झाले व वाड्याचा प्रवेश समारंभ सुद्धा शनिवारीच झाला त्यामुळे वाड्यास शनिवार वाडा असे नाव पडले यानंतर वाड्याच्या मागील बाजूस जी वसाहत झाली तिला सुद्धा शनिवार पेठ असे नाव दिले गेले.

मुळात बाजीराव पेशवे यांनी बांधलेला शनिवार वाडा हा सध्याइतका भव्य नव्हता. फक्त वाड्याच्या दिवाणखान्यात सुंदर असे नक्षीकाम होते. त्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी सध्या आपल्या नजरेस जो वाडा दिसतो तो बांधला. नानासाहेब हे सौंदर्यदृष्टी असलेले राज्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्याच्या काळात पुण्याचे सौंदर्य खुलले. त्याच्या याच सौंदर्य दृष्टीस अनुसरून त्यांनी अतिशय भव्य असा शनिवार वाडा बांधला. पुढे सवाई माधवराव यांच्या काळात त्यांनी व नाना फडणवीस यांनी वाड्यात अनेक मनोरे, कारंजी तसेच महाल व गच्च्या बांधल्या.

सवाई माधवराव यांच्या काळात शनिवार वाड्यास एकूण सहा मजले होते त्यामुळे पुण्यातील सर्वात उंच इमारत तीच होती. शेवटच्या मजल्यावरून आळंदी येथील मंदिराचा कळस दिसत असे यावरून वाड्याच्या उंचीची कल्पना येईल. सवाई माधवरावांना आकाशातील तारे व नक्षत्र पाहण्याची आवड होती त्यामुळे ते वाड्याचा सर्वोच्च भाग मेघडंबरी येथून चालर्स मॅलेट याने दिलेल्या दुर्बिणीतून सृष्टी सौंदर्याचे देखावे बघत.

१८१८ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे पुणे सोडून ब्रह्मावर्तास गेले आणि वाड्याचे वाईट दिवस सुरु झाले. वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला त्यानंतर वाड्याचा वापर कचेरी किंवा कैदखाना म्हणून केला गेला. १८२७ साली वाड्यास भीषण आग लागली व वाडा तब्बल १ आठवडा जळतच होता. लाकडी असल्याने संपूर्ण वाडा जळून खाक झाला व फक्त आईने महाल नावाचा एक भाग वाचला पण तो सुद्धा कालांतराने नष्ट झाला. 

तेव्हाच्या मुंबई इलाख्याचे गव्हर्नर जॉर्ज लॉइड यांनी या वाड्याची दुरावस्था पाहून सर्व वाड्याचे संवर्धन केले त्यामुळे सध्या वाड्याचे जे काही अवशेष शाबूत आहेत ते आपण पाहू शकतो. शनिवार वाड्याचे मूळ बांधकाम आता नष्ट झाले असले तरी वाड्याची तटबंदी व आतील भव्य जोते व काही इतर बांधकामे आजही पाहता येतात. वाड्याच्या तटबंदीस एकूण पाच दरवाजे होते ज्यांची नवे अनुक्रमे दिल्ली दरवाजा, गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा व जांभूळ दरवाजा अशी आहेत.

तटबंदीस एकूण चार भिंती आहेत त्यापैकी दोन भिंती २०० फूट लांब तर दोन भिंती १५० फूट लांब आहेत. तटाची उंची २० फूट आहे व तटास एकूण ९ बुरुज आहेत. पूर्वी तटबंदीवर एकूण २७५ शिपाई खडा पहारा देत असत. वाड्यास पूर्वी एकूण चार चौक होते याशिवाय काही दिवाणखाने सुद्धा होते ज्यांची नावे गणपती रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, आरसे महाल, जुना आरसे महाल, दादा साहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रावांचा दिवाणखाना, नारायण रावांचा महाल व हस्तिदंती महाल अशी आहेत याशिवाय कुटुंबातील विविध व्यक्तींची स्वतंत्र दालने, कोठ्या, दफ्तरे, जवाहिरखाना, पुस्तक दालन असे अनेक विभाग होते. 

१८१८ सालानंतर शनिवार वाड्याचा वापर प्रथम सैनिकांचे इस्पितळ म्हणून केला गेला, काही काळ येथे दिवाणी कोर्ट व कैदखाना सुद्धा होता. शनिवार वाड्याने अशी अनेक स्थित्यंतरे पहिली मात्र आजही एकेकाळी भारताचे केंद्रस्थान बनलेल्या या वाड्याचे दर्शन उर अभिमानाने भारावणारे असते कारण सध्या नवी दिल्लीतील संसदेचे महत्व एकेकाळी या वाड्यास होते. शनिवार वाडा हा खऱ्या अर्थी पुण्याची ओळख व अभिमान आहे.